रेवतीच्या घरात घडलेला पुढील प्रसंग कृपया नीट समजून घ्या. यात अनेक गंभीर गोष्टी दडलेल्या आहेत, त्या आपण नंतर पाहू. रेवती आज शाळेतून जरा उशिराच घरी आली. जरा म्हणजे अगदी दहाच मिनिटं..घरी आल्या-आल्या तिनं पाठीवरचं ओझं खुर्चीत टाकलं आणि आनंदानं दोन्ही हात उंचावत म्हणाली, ‘आई.. आई, आज शाळेत जाम धमाल आली. शाळेत शेवटच्या तासाला बाईंनी आमची अंताक्षरी घेतली. आम्ही असे कठीण कठीण शब्द शोधले ना.. की मुलांची सॉलिड पंचाइतच झाली! दोन मार्कांनी आम्ही जिंकलो.. कारण..’.पुढे रेवतीला काही एक बोलू न देता आई पदर खोचत म्हणाली, ‘शाळेत अंताक्षरी? ही तुमची शाळा आहे, की टीव्हीचा चॅनेल? दोन मार्कांनी जिकल्याचं कौतुक काय सांगतेस? आधी मला सांग, तुला यायला उशीर का झाला? काय करत होतीस? कुठे गेली होतीस? बरोबर कोण होतं? आता तू काही लहान नाहीस, इयत्ता पाचवीत आहेस तू!’हे सर्व ऐकल्यावरसुद्धा मोठ्या धीरानं आणि प्रचंड आशेनं रेवती म्हणाली, ‘अगं आई, शाळा सुटली ना, तरी आमची अंताक्षरी सुरूच होती. अगं टीव्हीवर असते तशी ही काही गाण्यांची अंताक्षरी नव्हती काही..’.‘गप्प बैस! मला नको शिकवूस! मला माहितीये सगळं. मला सांग आज काय अभ्यास दिलाय? स्पेलिंग पाठ झाली का? चल आता पटापटा खाऊन घे, क्लासला उशीर होतोय. आणि लक्षात ठेव, उद्यापासून शाळा सुटली की तडक घरीच यायचं, कळलं?’ आईनं स्पेशल खरमरीत आवाजात रेवतीला फटकारलं.हिरमुसल्या तोंडाने रेवती कामाला लागली. आई खूश झाली. मग रेवती क्लासला जाईल. तिचा अभ्यास करेल. अभ्यासच कसा महत्त्वाचा असतो, याबाबत आईचा उपदेश ऐकेल. मग थोड्याशा ब्रेकनंतर पुन्हा शाळा-क्लास-अभ्यास या चक्रात अडकेल. मात्र, तिचं मन कोमेजून जाईल. तिचं भावविश्व पार विस्कटून जाईल..ती आतल्या आत कुढत राहील. कुठलीही नवीन गोष्ट, मस्त गंमत उत्साहानं आईला सांगण्याची आता तिची हिंमतच होणार नाही. आपल्या भावविश्वात, गमती-जमतीत आईला काडीइतकाही रस नाही याची आता तिला खात्री पटल्यानं ती घरात गप्प गप्पच राहील.रेवतीचं घरातलं बोलणं कमी झाल्याने आईला वाटेल, ‘रेवतीला आता फालतू गोष्टी बोलण्यात इंटरेस्ट नाही. कारण ती आता अभ्यासात रमली आहे. बरं झालं तिला वेळीच झापलं ते. आता कसं अभ्यास एके अभ्यास सुरू झालं!’.पण आईला हे ठाऊक नाही की, रेवती आता मानसिकदृष्ट्या खचली आहे!तुमच्या लक्षात येतंय का, ‘गप्प बैस! मला माहितीये सगळं.’ या दोन वाक्यांमुळेच हा सगळा गोंधळ झाला आहे. पालक स्वत:ला शहाणे, सर्वज्ञानी किंवा ब्रह्मदेव समजायला लागले, की त्यांच्या मुलांची गोची झालीच म्हणून समजा. कारण मुलांचं काही ऐकून घेणं, त्यांच्याकडून काही समजून घेणं यापेक्षा त्या पालकांना, मुलांना उपदेशामृत पाजणं, ज्ञानामृतानं आंघोळ घालणं आणि मग खरबरीत सूचनांनी त्यांना घासून पुसून काढणं यातच समाधान वाटतं..मात्र, यामुळेच आपण आपल्या प्रिय मुलांपासून नकळत तुटत चाललो आहोत याची त्या परमपूज्य पालकांना जाणीवही होत नाही.आईनं नीट ऐकून घेतलं असतं, तर तिला कळलं असतं की, शाळेत बाईंनी गाण्यांची नव्हे, तर इंग्रजी स्पेलिंगची अंताक्षरी घेतली होती आणि रेवतीचा गट जिंकला होता कारण तिनंच सांगितलेला एक शब्द खूप महत्त्वाचा ठरला होता. त्याबद्दल बाईंनी तिला शाबासकी दिली होती. सगळ्या मुलींनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं होतं..हा आनंद, ही मजा तिला आईसोबत वाटून घ्यायची होती; पण रेवतीच्या आईला मुलीच्या आनंदात आपला आनंद शोधता आला नाही. किंबहुना मुलीच्या आनंदात आणि यशात आईला सहभागी होता आलं नाही.. कारण.. ‘तिला सर्व माहितीये!’आता तुम्हाला कळलंच असेल की, मुलांच्या कुठल्याही अनुभवाला किरकोळ समजू नका. मुलांचा प्रत्येक अनुभव जाणून घेण्याचा मनापासून प्रयत्न करा. ‘ज्या पालकांना आपल्या मुलाच्या आनंदातच आपला आनंद गवसतो, त्यांनाच निखळ निरागस आनंदाचा साक्षात्कार होतो’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.