आईपणाचा मनमुराद आनंद

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा ‘चेकमेट’ या चित्रपटाचं प्रमोशनल गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं. त्यावेळी मी खूप आनंदित होते.
Sonali Khare
Sonali Kharesakal

- सोनाली खरे

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा ‘चेकमेट’ या चित्रपटाचं प्रमोशनल गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं. त्यावेळी मी खूप आनंदित होते. गाणं चित्रीत करताना मला तापही होता. त्यावेळी मी साडेतीन-चार महिन्यांची प्रेग्नंट होते. मात्र, आम्ही ते गाणं अतिशय व्यवस्थितरित्या चित्रीत केलं.

त्यावेळी मला करिअरबाबत तडजोड करावी लागली नाही. कारण मी ठरवून निश्चित निर्णय घेतलेला होता, की आता आपण आई होणार आहोत, तर सध्या जे काही प्रोजेक्ट सुरू आहेत, ते पूर्ण करायचे. त्यावेळी देवाच्या कृपेनं मला काम करावंच लागणार होतं, घर चालवावंच लागणार होतं, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी आई होण्याचा निर्णय घेतला.

पूर्ण वेळ माझ्या बाळाला आणि नवीन जबाबदारीला द्यायचा, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला करिअरमध्ये तडजोड करावी लागली नाही. आई होण्याचा निर्णय माझा होता आणि तो मी मोठ्या आनंदाने स्वीकारला होता. मी आईपणाच्या फेजला प्रचंड एंजॉय केलं. प्रत्येक क्षण डोळ्यात, मनात अन् हृदयात साठवून ठेवला. त्यामुळे अभिनयातील माझा ब्रेक जवळपास सहा ते सात वर्षांचा झाला.

आईपणाचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर मी पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचं ठरवलं. इतक्या वर्षांचा ब्रेक झाल्यानंतर मी स्वतःला कम्प्लीटली कटऑफ केलेल होतं. त्यामुळे पुन्हा स्वतःसाठी प्रोजेक्ट निर्माण करणं किंवा निर्माते आणि दिग्दर्शकांपर्यंत पोचणं, सगळ्या जुन्या मित्र-मैत्रिणींना सांगितलं, की मी आता काम करायला सुरुवात झाली केली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मला चित्रीकरणासाठी मुलीला सोडून जावं लागलं, तेव्हा ते खूप जड वाटत असे.

कारण इतकी वर्षं मी तिच्यासमवेत घालवली होती. प्रत्येकवेळ आणि प्रत्येक क्षण तिच्याबरोबर घालवला होता. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मनाची चलबिचल होत असे. आमच्या दोघींमध्ये पडलेला दुरावा खूप कठीण गेला होता. मात्र, अभिनय क्षेत्रामध्ये पुन्हा काम मिळवण्यासाठी किंवा स्वतःची ओळख नव्यानं प्रस्थापित करण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली.

आई झाल्यानंतर करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच थोडा बदलला. कारण, मी आई होण्यापूर्वी महिन्याचे तीस दिवस नव्हे, तर चाळीस दिवस म्हटलं तरी चालेल, इतकं काम केलं. एका- एका दिवशी दोन ते तीन मालिकांचं चित्रीकरण केलं होतं; पण आई झाल्यानंतर पुन्हा करिअर सुरू करताना मी कटाक्षानं पाळलं, की एका वेळी एकाच प्रोजेक्ट करायचं.

जेणेकरून आपल्याला पंधरा-वीस दिवस कामात काढता येतील आणि उरलेले काही दिवस घरीही देता येतील. त्यामुळे पुन्हा करिअर करताना मला मोजून आणि सिलेक्टिव्ह काम करण्याची तडजोड करावी लागली आणि त्यामध्येही मी प्रचंड आनंदी आणि समाधानी आहे.

माझ्या खऱ्या आणि अभिनय क्षेत्रातील आयुष्यात एक महत्त्वाची गोष्ट नुकतीच घडली. ‘मायलेक’ या चित्रपटात मी आणि माझी मुलगी सनाया हिनं एकत्र काम केले. विशेष म्हणजे आम्हाला दोघींना मायलेकीचीच भूमिका मिळाली आहे. आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, खऱ्याखुऱ्या आयुष्यातही आम्ही अशाच आहोत.

विशेष म्हणजे आईला कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, याची जाणीव या चित्रपटाच्या निमित्तानं नकळतपणे माझ्या मुलीलाही झाली. विशेष म्हणजे सनाया खूप समंजस असून, तिनं मला वेळोवेळी पाठिंबाच दिला आहे. त्यामुळेच मी अभिनय क्षेत्रात चांगल्या प्रकारे कारकीर्द करू शकले. याच चित्रपटात आमच्या दोघींवर चित्रीत केलेल्या ‘नसताना तू’ या भावनिक गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा आनंदाचा ठेवा माझ्यासाठी खूप मोठा आहे.

करिअरिस्ट मुलींना टिप्स

  • तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुमच्या बाळाची काळजी आणि बाळाबरोबरच तुम्हालाही तितकंच महत्त्व द्या.

  • तुमच्या तुमची मुलं मोठी होत राहतात; पण कुठल्याही प्रकारे स्वतःला कमी लेखू नका.

  • स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण जर तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या स्ट्रॉंग असाल, तरच तुम्ही तुमच्या मुलांना स्ट्रॉंग बनवू शकता. कारण ती तुमच्याकडे बघूनच सगळं काही शिकणार आहेत.

  • तुम्ही आई होण्याचा निर्णय घेतला, तरीही तुम्ही इंडिपेंडंट राहा. तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी, त्यांना दाखवून द्या की, आपली आईसुद्धा स्वतःच्या पायावर उभी आहे आणि तिचं स्वतःचं काम आहे. ती कोणत्याही क्षेत्रात असू देत; पण तिची स्वतःची समाजात वेगळी ओळख आहे.

  • आपण काय करतोय, याबाबतची मुलांना जाणीव होण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. कारण मुलं तुमच्या या सगळ्या गोष्टींना फॉलो करतील आणि त्यामुळे त्यांचंही व्यक्तिमत्त्व चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी मदत होईल.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com