
नम्रता गायकवाड
आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणेच तिनं मला जपलं, अंगा-खांद्यावर घेऊन लहानाचं मोठं केलं. माझे सर्व हट्ट पुरवले. त्यामुळे तिचं महत्त्व काहीही केल्या मी नाकारू शकत नाही. खरंतर आई कलाप्रेमी आहे. तिच्यामुळेच मला अगदी लहानपणापासून कलेविषयीचा आदर, सन्मान आणि त्याविषयीची गोडी लागली. म्हणूनच मी अभिनय क्षेत्रात आले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माझे भाऊही क्रीडाप्रेमी आहेत. तिच्यामुळेच त्यांना खेळाची आवड लागली. आईला लहानपणापासून खेळाची आवड होती. हे गुण आमच्यातही उतरले. त्यामुळेच आम्हा तिघांचं संगोपन कला आणि क्रीडा क्षेत्रात छान झालं आहे. आता आम्ही तिघंही आमच्या क्षेत्रात यशस्वीपणे कामगिरी करत आहोत. या सर्व गोष्टींचं श्रेय आईला आणि तिने केलेल्या संस्कारांनाच जातं.