

अमृता देशमुख
आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तिचं मत आवर्जून घेते. कधी-कधी एकमत होत नसलं, तरी तिचं म्हणणं मात्र मी आवर्जून ऐकते. कारण ती कोणत्याही गोष्टीकडे कायम तटस्थपणेच पाहू शकते. तिला अनेक गोष्टींमधील सकारात्मक गोष्टी आवर्जून लक्षात येतात. तिनं माझा बालपणापासून ते करिअरपर्यंतचा सगळा प्रवास पाहिलेला आहे. माझ्यातील कलागुण कोणते आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत, मी काय करू शकते, एखादी गोष्ट माझ्यासाठी किती उपयोगाची आणि किती घातक याचा अंदाज तिला लगेच येतो. त्या दृष्टीने विचार करून ती मला नेहमीच सल्ला देत असते. कोणत्याही गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं, हे तिच्याकडूनच शिकण्यासारखं आहे.