- अनुष्का मर्चंडे, अभिनेत्रीमाझी आई माझा आधार आहे. माझी नेहमी पाठराखण करणारी आणि जिच्यावर मी कुठल्याही परिस्थितीत पूर्णपणे विसंबून राहू शकते अशी एकमेव व्यक्ती! माझे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी तिने खूप महत्त्वाची भूमिका बजावली..फक्त मला सल्ले देऊन नव्हे; तर ती ज्या पद्धतीने स्वतःचे आयुष्य जगते, त्यातून. प्रेमाने, ताकदीने आणि अथांग मायेने! ती फारसे बोलत नाही, पण तिचे असणे जाणवते. ती नेहमी लहान लहान गोष्टींमधून खात्री करत असे, की आम्ही सगळे ठीक आहोत ना?... तेव्हा ते जाणवलेही नव्हते! विशेषतः माझ्या अभिनयाच्या प्रवासात ती खंबीरपणे माझ्याबरोबर होती.ऑडिशन रूमच्या बाहेर माझ्याबरोबर बसण्यापासून छोटेसे यशही- उदा. एखादा कॉलबॅक मिळणे, साजरे करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ती होतीच. काही वेळा सेटवरही ती माझ्याबरोबर आली आहे. नुसते माझ्याबरोबर राहायला. मी वेळेवर खाल्ले आहे का, चित्रीकरणाच्या मध्ये विश्रांती घेतेय का किंवा मला भावनिक आधार मिळतोय का, हे पाहायला..मी सध्या ‘झी टीव्ही’वरील ‘सरू’ या मालिकेत अनिकाची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणानंतर घरी आल्यावर आईच्या हातचे गरम जेवण आणि तिच्याशी गप्पा हे म्हणजे माझ्यासाठी सगळं काही आहे! तिचा माझ्यावरचा विश्वास अढळ आहे. अभिनयक्षेत्रात अनेकदा अनिश्चितता आणि भावनिक आव्हाने असतात. अशा वेळी तिचे असणे हा माझ्यासाठी खऱ्या अर्थाने आधार होतो..ती शांत, पण ठाम आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी ती सगळ्यांना एकत्र जोडून ठेवते. तिला आयुष्यात खूप संघर्ष करावे लागले. पण तिने ते प्रसंग ज्या संयमाने, ताकदीने आणि शांत मनाने हाताळले. ते मला प्रेरणादायक वाटते.ती कधी कोणत्या गोष्टीत पुढे-पुढे करत नाहीत. कधी तक्रारही करत नाही. वैयक्तिक अडचणी असोत, घर सांभाळणे असो किंवा सगळ्यांना समजून घेऊन साथ देणे असो; तिने हे सगळं अत्यंत धीराने आणि ताकदीने पार पाडले. तिचे आयुष्य जगण्याचे भान, संयम आणि उद्दिष्टांवर ठाम राहण्याची वृत्ती बघून आमच्या संपूर्ण कुटुंबाची विचारसरणीच बदलली..संकटांमध्ये कसे टिकून राहायचे, प्रेमाने कसे नेतृत्व करायचे आणि रोजच्या दिवसाला कृतज्ञता आणि धैर्याने कसे सामोरे जायचे. हे तिने आम्हाला सहज शिकवले. ती फक्त आमची आई नाही, तर गुरु आहे. घराचे भावनिक केंद्र आहे. तिच्या असण्यानेच आमचे घर ‘घर’ वाटते.माझी आई एक उत्तम नृत्यांगना आहे. तिच्या नृत्यात लवचिकता, भावना आणि जिवंतपणा आहे. लहानपणी मी नेहमी तिचे नृत्य बघायचे. ती ज्या सहजपणे आणि आनंदाने नृत्य करायची, ते नैसर्गिक आणि मंत्रमुग्ध करणारे वाटायचे. तिच्यासाठी नृत्य म्हणजे फक्त एक छंद नव्हता..तो भावना व्यक्त करण्याचा, कथा सांगण्याचा आणि आयुष्य साजरे करण्याचा मार्ग होता. तिथूनच माझ्या नृत्यप्रेमाला सुरूवात झाली. तिला पाहूनच मला जाणवले, की नृत्य ही केवळ कला नसून एक ताकदवान असे कथाकथनाचे माध्यम आहे. हे नृत्यप्रेम माझ्या प्रत्येक गोष्टीत उतरले.मग ते पडद्यावर अभिनय करताना असो, आयुष्याच्या अडथळ्यांशी सामना करताना असो किंवा छोट्या-छोट्या यशांमध्ये आनंद शोधताना असो.तिने मला शिकवले, की जे काही करायचे ते पूर्ण मनापासून करायचे. ही शिकवण मी दररोज माझ्याबरोबर बाळगते..ती स्पष्ट विचार करते आणि सहानुभूती व सौम्यतेने मार्गदर्शन करते. तिचे दिशादर्शन, भावनिक स्थिरता आणि आयुष्याकडे पाहण्याची स्पष्टता, या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला.तिच्यातली निस्वार्थता हाही महत्त्वाचा गुण आहे.ती कुटुंबासाठी, मित्र-मैत्रिणींसाठी आणि अपरिचितांसाठीही खूप करते. विशेष म्हणजे त्या बदल्यात कधीच काही अपेक्षा ठेवत नाही. तिच्यात एक विनोदबुद्धी आहे. कितीही कठीण काळ असला, तरी एखादे हलकेफुलके वाक्य तिच्या तोंडून येते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. माझेही व्यक्तिमत्त्व असेच घडावे, अशी इच्छा आहे..मी तिला काही सांगितले नाही, तरी मला कधी तिची गरज आहे, हे तिला बरोबर कळते! माझ्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आले. ऑडिशनमधले अपयश, वैयक्तिक अडचणी... अशा वेळी मला स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती.पण दरवेळी कधी तिच्या शब्दांतून, कधी मिठीतून, तर नुसत्या शांत उपस्थितीतून ती ठामपणे माझ्याबरोबर उभी राहिली. मला आणि माझ्या बहिणींना सतत आधार देत राहिली. तिचे प्रेम छोट्या-छोट्या पण खूप अर्थपूर्ण कृतींतून सतत जाणवते. ते कधीच विसरता येणार नाही.(शब्दांकन : श्रुती भागवत).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.