
नदी सर्वांसाठी वाहते आणि तिच्या पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची वगैरे सोय करून घेतली की व्यक्तीला तेथपर्यंत पोचून नदीतील पाणी घेता येते व वैयक्तिक समाधान मिळू शकते.
Valentine Day : संस्कार प्रेमाचा
भारतीय परंपरेनुसार येणारा संक्रांत हा सण जसा सर्वांवर प्रेम करावे, सर्वांशी गोड संबंध असावेत, नेहमी सर्वांशी गोड बोलावे, कुठल्याही अपेक्षेशिवाय आपल्याला दुसऱ्याला काहीतरी देता यावे यासाठी योजलेला आहे, तसाच पाश्र्चिमात्य परंपरेतील एक सण आहे ‘व्हॅलेंटाइन डे’.
उत्सवप्रिय भारतीयांनी याही दिवसाचा स्वीकार केला यात मोठे आश्र्चर्य असे काही नाही. त्या निमित्ताने प्रेम व्यक्त करण्यात चुकीचेही काही नाही. मात्र व्हॅलेंटाइन डे या दिवशी व्यक्त केलेले प्रेम एका व्यक्तीपुरते सीमित न ठेवता हृदयात सर्वांप्रती प्रेमभावना असली आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करता आले तर ते आरोग्याच्या दृष्टीनेही सर्वोत्तम असते.
नदी सर्वांसाठी वाहते आणि तिच्या पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची वगैरे सोय करून घेतली की व्यक्तीला तेथपर्यंत पोचून नदीतील पाणी घेता येते व वैयक्तिक समाधान मिळू शकते. मुळात नदी कोरडी असली,
तिच्यात पाणी नसले तर तिच्यावर घाट बांधून पाताळापर्यंत गेले तरी कुठल्याच प्रकारची तहान भागू शकत नाही. प्रेमाचेही असेच आहे. निरागस, निर्मल हृदयात प्रेम वाहत राहते आणि ते सर्वांना जाणवते. त्या प्रेमाशी संबंध जोडण्यासाठी नातेसंबंधांचे व विशिष्ट भावनांचे घाट बांधावे लागतात.
सर्वव्यापी सर्वशक्तिमान, निर्गुण, निराकार, अनाकलनीय अशा परमेश्र्वराच्या प्रभावामुळे जीवन फुलते. सौंदर्य, शांती, सत्य, प्रेम, अहिंसा या अनुभूती आपल्याला काही प्रमाणात परमेश्र्वराचेच दर्शन घडवितात. त्यापैकी प्रेम हे सर्वांच्या अधिक परिचयाचे असते. मोहाला, मायेला. ममत्वाला, एका विशेष आकर्षणाला बहुधा ‘प्रेम’ म्हटले जाते.
परंतु खरे प्रेम सर्वव्यापी, सर्वांसाठी, कुठलेही अपेक्षा न ठेवणारे, निर्भेळ शक्तीचा स्रोत असल्यासारखे असते. मनुष्य जेव्हा स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच तो इतरांवरही प्रेम करू शकतो आणि स्वतःची, स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या आरोग्याची, स्वतःच्या तत्त्वांची काळजी घेऊ शकतो.
ज्यांना प्रेमाची अनुभूती घेता आली नाही किंवा ज्यांना प्रेम काय आहे ते कळलेले नाही, त्यांना प्रेम काय आहे ते कळावे, वैयक्तिक पातळीवर प्रेमाची अनुभूती व्यक्त करता यावी व प्रेमाचा अनुभव घेता यावा यासाठी हा एक दिवस ठरविलेला आहे.
जे प्रत्यक्ष बोलून सांगता येत नाही ते या दिवशी गुलाबाचे फूल देऊन मूक भाषेत सांगता येते. ही कल्पना छान आहे व ती भारताबाहेर उगम पावलेली असली तरी प्रेमाची, प्रेमसंबंधाची, प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळवून देते.
खरे तर कुठलाही उत्सव साजरा करण्यासाठी वा आनंद मिळविण्यासाठी निमित्त शोधताना माझे-तुमचे असे काही करण्याची गरज नाही, पण या अशा मंगल सुंदर दिवसाचे व कल्पनेचे बाजारीकरण होणेही चांगले नाही.
म्हणजे गुलाबाची फुले विकली जावीत वा त्या निमित्ताने भेटवस्तू, कार्ड्स वगैरे वस्तू विकल्या जाव्यात अशा हेतूने अशा संकल्पनांचा स्वीकार करता कामा नये, तसेच त्यात उत्शृंखलपणा असणेही कामाचे नाही.
नदीचे पाणी स्वच्छ व निर्मल असेल तरच त्या पाण्यापर्यंत जाऊन तहान भागवणे इष्ट असते. घाण, दूषित व गढूळ असलेले पाणी कोणी पीत नाही, तसेच कुणाला तरी गुलाबाचे फूल देऊन त्याची मानसिक कुचंबणा करवण्यात काही अर्थ नाही.
स्त्री-पुरुष या नात्याची सुरुवात खऱ्या निर्भेळ प्रेमापासून झाली तर तो सुरू झालेला जीवनाचा प्रवास व्यवस्थित पार पडतो. शब्दांनी, डोळ्यांमधील भावांनी, हस्तस्पर्शाने वा गुलाबाच्या स्पर्शाने अशा कुठल्याही मार्गाने सुरुवातीचे प्रेम व्यक्त केले गेले असले तरी ते नंतर उत्क्रांत होत जाणे आवश्यक असते.
ते ‘सत्यं शिवं सुंदरम्’ या व्याख्येत जाऊन बसले पाहिजे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ जे जीवनाची उत्क्रांती दाखवितात त्या मोक्षापर्यंत अनुभव घेणे अपेक्षित असते. अशी उत्क्रांती स्त्री व पुरुष दोघांनी मिळून करणे सोपे असते. पण त्या दोघांचा संबंध निखळ प्रेमाचा असणे आवश्यक असते.
स्त्री-पुरुषांचे आकर्षण, त्यांचे मिलन हे निसर्गाने योजना करून प्रत्येकाच्या रोमरोमात पेरलेले असते. या नैसर्गिक ओढीतून दोन शरीरे जवळ आली तरी पुढे त्यांनी जीवनाच्या जबाबदारीची जाणीव घ्यायलाच पाहिजे.
नंतर पुढे येणारी अवस्था म्हणजे एकमेकाला साथ देणे, एकमेकाची सेवा करणे, निसर्गचक्र चालू राहावे या हेतूने संततीला जन्म देणे. या वेळी नुसत्या शरीराकडे किंवा सुखसोयींकडे न पाहता संस्कारांना महत्त्व देणे आवश्यक असते.
त्यामुळेच भारतीय संस्कृतीने भर दिलेला आहे आयुर्वेदीय गर्भसंस्कारांवर. प्रेमबंधनात एकत्र आलेल्या दोन जिवांनी एकमेकांची ओळख व माहिती (नुसत्या वैयक्तिक पातळीवर नव्हे तर कौटुंबिक पातळीवर) करून घेणे आवश्यक आहे.
सर्वांचे आपापसांत प्रेम दृढ व्हावे, एकमेकांचे उणी-दुणी समजावून घेतल्यावरच विचारपूर्वक निर्णय घेऊन निसर्गाला दिलेले वचन पाळण्यासाठी, समाजाचे व निसर्गाचे देणे लागतो म्हणून आणि समाज घडविणाऱ्या एका चांगल्या संस्कारित व्यक्तीची समाजात भर पडावी या हेतूने अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न झाले व त्यासाठी योग्य गर्भसंस्कार केले गेले तर त्यातून येणारे अपत्य माता-पित्यांचे आपापसांतील प्रेम वाढवते.
दोघांपुरता मर्यादित असलेला प्रेमाचा खजिना मुलावर प्रेम करण्याच्या निमित्ताने मोकळा केला जातो व प्रेमाची व्याप्ती वाढत जाते. आपल्या अपत्यावर प्रेम करत असताना त्याच्या बोबड्या बोलांवर, त्याला आवडणाऱ्या अन्नावर, त्याच्या मित्रमंडळींवर माता-पित्यांचे प्रेम करता करता प्रेमवृद्धी होत राहते.
या सर्व जीवनप्रसंगांमधून जात असताना स्त्री व पुरुष यांची जोडी खरोखर एकरूप होत गेली आणि भौतिकापलीकडे असलेल्या व्यक्तिमत्त्वाची नीट ओळख करून घेऊन त्याप्रती प्रेमभाव वाढला आणि एकमेकाला सहवास, एकमेकाला आधार, एकमेकाला मदत करण्यासाठी दोघे जगू लागले तर मिळणाऱ्या समाधानालाच ‘मोक्ष’ म्हणायला हरकत नाही.
प्रेम ही शक्ती वैयक्तिक शारीरिक आरोग्य तर देतेच, पण मानसिक आरोग्याची प्रचितीही देते. हेच प्रेम जेव्हा जनताजनार्दनावर, सर्वव्यापी परमेश्र्वरावर बसते तेव्हा मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ सापडतो व तो खरा आनंद उपभोगतो.