Valentine Special: 'फिल माय लव्ह', आर्याची जादू आजही कायम!

Aarya
Aarya

पुणे : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन. प्रत्येक चित्रपटात हटके स्टाइल, फाइट सीन्स आणि डान्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अल्लूने कारकीर्दीच्या सुरवातीला आर्या नावाचा ब्लॉकबस्टर रोमँटिक चित्रपट दिला होता हे विशेष. 'फिल माय लव्ह' म्हणत इंडस्ट्रीत पाऊल टाकलेल्या अल्लूची आज आठवण येण्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेला व्हॅलेंटाइन वीक. वेड्यासारखं प्रेम करणारा आणि आपल्या प्रेमात पडायला लावणाऱ्या शुद्ध देसी आर्याबद्दल आपण जाणून घेऊया. 

अल्लूने आर्या नावाचे दोन चित्रपट केले आहेत. ७ मे २००४ रोजी आर्या-१, तर २७ नोव्हेंबर २००९ रोजी आर्या-२ प्रदर्शित करण्यात आला होता. आर्या-१ मध्ये अल्लू अर्जुनसोबत अनुराधा मेहता, शिवाजी बालाजी, राजन पी.देव, सुब्बाराजू, सुनील, सरव्या आणि वेणू महादेव ही स्टारकास्ट होती. तर आर्या-२ मध्ये अल्लू अर्जुनसोबत काजल अग्रवाल, नवदीप, ब्रम्हानंदन, श्रद्धा दास, मुकेश ऋषी, श्रीनिवास रेड्डी हे स्टार झळकले होते. आर्या-१ ला आयएमडीने ७.१ रेटिंग दिले आहेत. ४ कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर अशी २५ कोटींची कमाई केली होती. त्यावेळी रिलीज झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या टॉप-३ चित्रपटांमध्ये आर्याचा समावेश होता.

दुसरीकडे आर्या-२लाही आयएमडीने ७.३ रेटिंग दिले आहेत. १५ कोटींचा निर्मिती खर्च असणाऱ्या या चित्रपटाने ३५ कोटींचा गल्ला जमवला होता. सेमी-हिट ठरलेल्या या मूव्हीने रामचरणच्या मगधिरा आणि अनुष्का शेट्टीच्या अरुंधती यांना टक्कर दिली होती. 

आर्या-१ आणि २ हे दोन्ही रोमँटिक-अॅक्शन चित्रपट असून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत अनेक हिट चित्रपट देणाऱ्या सुकुमार यांनीच या दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. आर्या-१ हा सुकुमार यांचा पहिला चित्रपट ठरला, त्यानंतर सुकुमार यांनी एक का दम, फॅमिली डील आणि रंगस्थलम यांसारखे सुपरहिट चित्रपटही दिले आहेत. आणि आता पुन्हा एकदा सुकुमार आणि अल्लू अर्जुनची जोडी पुष्पा या आगामी चित्रपटासाठी एकत्र आली आहे. आर्या-१ दिल राजूने, तर आर्या-२ हा आदित्य बाबू यांनी प्रोड्यूस केला होता. देवी श्रीप्रसाद यांनी दिलेलं म्युझिक या दोन्ही चित्रपटांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन गेलं. 

आर्या-१ ज्यावेळी रिलीज झाला त्याअगोदर डर, कभी हा कभी ना असे बॉलिवूडमध्ये रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होऊन गेले होते. या चित्रपटांचा पॅटर्न एकसारखा वाटत असल्याने सुकुमार यांनी आपल्या चित्रपटाची सुरवातच हिरो-हिरॉईनला प्रपोज करतो अशा सीनने केली. आणि चित्रपटातील हा बदल नवा ट्रेंड सेट करून गेला. दिल हा सुपरहिट चित्रपट देणाऱ्या नितीनला प्रोडूसर दिल राजू यांनी ऑफर दिली होती, पण दुसऱ्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने नितीनने आर्याला नकार दिला. त्यानंतर रवी तेजा आणि प्रभास यांनाही विचारण्यात आलं होतं पण त्यांच्याकडून कोणताच सिग्नल न आल्याने अल्लू अर्जुनची त्याजागी वर्णी लागली. 

अल्लू अर्जुनने गंगोत्रीमधून डेब्यू केला होता आणि आर्या हा त्याचा दुसराच चित्रपट होता. ब्लॉकबस्टर ठरलेल्या आर्याचे एकूण ५ रिमेक बनवण्यात आले. तमिळमध्ये कट्टी (धनुष आणि श्रिया सरन), बंगालीमध्ये बाधा, उडियामध्ये पगला प्रेमी, श्रीलंकेत अधारे नमाने आणि उर्दूमध्ये प्यार मे पागल या नावांनी रिमेक बनवण्यात आले.   

देवी श्रीप्रसाद यांनी आर्यासाठी शान, केके आणि रवी वर्मा यांना घेऊन ६ गाणी बनवली होती आणि त्यातील आ आँटे हे गाणं पॅन इंडिया ब्लॉकबस्टर ठरलं. या गाण्याचे कन्नडमध्ये हवा आणि सोनू सूदच्या मॅक्झिमम या चित्रपटांसाठी रिमेक बनवण्यात आले होते. आर्याचं वैशिष्ट्य म्हणजे ८ थिटएर्समध्ये ४२० दिवस चालणारा चित्रपट असं एक वेगळं रेकॉर्ड आहे. १४ वेगवेगळे अॅवॉर्ड्सही आर्याला मिळालेले आहेत.

आर्या-१मध्ये लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला होता. तर आर्या-२ हा फ्रेंडशिप बेस्ड चित्रपट होता. तेलुगू आणि तमिळमध्ये सुरवातीला आर्या-२ रिलिज करण्यात आला होता. उडियामध्ये आय लव्ह यू गीता, तर हिंदीत आर्या एक दिवाना अशा नावाने डब करण्यात आला होता. तर बंगालीमध्ये या चित्रपटाचे दोन रिमेक बनवण्यात आले होते. देवी श्रीप्रसाद यांच्या म्यूझिकची जादू यावेळीही चालली. रिंगा रिंगा या गाण्याने पुन्हा एकदा आ आँटेची आठवण करून दिली. सलमान खानच्या रेडीमधील ढिंग चिका गाणं आठवतंय ना? हे गाणं रिंगा रिंगाचं रिमेक आहे. 

आर्या-२साठी अनुराधा मेहता, हंसिका मोटवानी यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेवटी काजल अग्रवालच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. २००९मध्ये काजलची पाच बोटं तुपात होती. कारण त्या वेळेस काजलने मोधी विल्याडू, गणेश जस्ट गणेश, मगधिरा आणि आर्या-२ असे सलग ४ हिट चित्रपट तिने दिले होते. मगधिरा आणि आर्या-२ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आंध्रप्रदेशमध्ये त्यावेळी तेलंगणावरून आंदोलनाची लाट पसरली होती, त्याचा फटकाही या चित्रपटांना बसला होता.

असं असलं तरी आर्या-१ आणि आर्या-२ची जादू आजही कायम आहे. एकतर्फी प्रेम करणारा, मैत्रीसाठी काहीपण करण्याची तयारी असणारा आणि आपल्या प्रेमाची जगजाहीर कबुली देणारा प्रेमवीर अल्लू अर्जुनने साकारला होता. माझ्यासारखे अनेक मराठी भाषिक मूव्ही लव्हर साउथ इंडियन चित्रपट पाहू लागले, त्याला कारण अल्लू अर्जुनचा आर्या आहे. आर्या-२ मध्ये अल्लूने साकारलेला क्रेझी मिस्टर परफेक्ट आजही हवाहवासा वाटतो. एदो प्रियारागम, ओ माय ब्रदरू, फिल माय लव्ह, उप्पेनन्था, बेबी ही लव्ह्ज यू या गाण्यांनी प्रेमात पाडलं. करिगे लोगानं डोळ्यात पाणी आणलं, तर आ आँटे, रिंगा रिंगा या गाण्यांनी वेड्यासारखं नाचवलंही. सध्या व्हॅलेंटाइन विक सुरू आहे, त्यामुळे आर्याची आठवण होणार नाही, असं कधीच होणार नाही.

(व्हिडिओ सौजन्य : Youtube)

- व्हॅलेंटाइन स्पेशल आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com