
कौटुंबिक नाते एकमेकांप्रती असलेले प्रेम व आपुलकीनुसार दृढ होत जाते. कुटुंब नात्यामध्ये एकमेकांसोबत राहण्यासह प्रत्येकाच्या मूलभूत गरजा व भावनिक आधारासाठीचे एकत्रीकरण असते.
नातीगोती : विश्वास, सामंजस्यानेच नाते दृढ
- विदिशा श्रीवास्तव
कौटुंबिक नाते एकमेकांप्रती असलेले प्रेम व आपुलकीनुसार दृढ होत जाते. कुटुंब नात्यामध्ये एकमेकांसोबत राहण्यासह प्रत्येकाच्या मूलभूत गरजा व भावनिक आधारासाठीचे एकत्रीकरण असते.
कुटुंबातील कोणता सदस्य खूप जवळचा आहे, या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे; कारण मी माझ्या कुटुंबातील सर्वांच्या खूप जवळ आहे. मी माझ्या कुटुंबाला माझे जीवन मानते. आम्ही एकत्र व्यतीत केलेला प्रत्येक क्षण माझ्या मनाला स्पर्श करतो. त्यांच्या दैनंदिन सहवासाने माझे मन आनंदाने भरून जाते.
माझे पती माझ्या काळजीपोटी दिवसभरात ठराविक अंतराने मला कॉल करून माझी विचारपूस करत असतात आणि माझी आई दररोज मला कॉल करून मी काही खाल्ले आहे की नाही, याबाबत विचारते, माझी काळजी घेते. अशी खास माणसे माझ्या अवतीभोवती असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते. अशा अद्भुत व्यक्तींची साथ देण्यासाठी मी देवाचे आभार मानते.
कुटुंबामध्ये तुम्ही जगायला, इतरांसोबत संवाद साधायला आणि तुमच्या वैश्विक दृष्टिकोनाला आकार द्यायला शिकता. कुटुंबपद्धती व्यक्तीला कौटुंबिक व घरगुती वातावरणाच्या सुरक्षित कवचांतर्गत सामाजिक व भावनिक कौशल्ये विकसित करण्यामध्ये साह्य करते. सध्या मी ‘ॲण्ड टीव्ही’वरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत भूमिका साकारत आहे.
कलाकाराचे जीवन नेहमी व्यग्र असते, पण मी वेळात वेळ काढून माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करते. माझे पती रांचीमध्ये काम करतात आणि महिन्यातून एकदा मला भेटण्यासाठी मुंबईला येतात. त्यांच्या अनुपस्थितीत माझी आई, भाऊ व वहिनी माझी काळजी घेतात. माझे आई-वडील आपण मुलांच्या सहवासात राहावे यासाठी वाराणसीवरून मुंबईमध्ये स्थलांतरित झाले आहेत. आम्ही सर्व एकमेकांच्या जवळ असण्यासाठी एकाच इमारतीमध्ये राहतो. माझ्या मते, या मायेसाठी आई-वडिलांहून खास कोणीच नाही.
मला माझ्या कुटुंबाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारे अनेक क्षण आहेत. मात्र, एका क्षणाबाबत सांगायचे झाल्यास नुकतेच मी महाशिवरात्रीदरम्यान काशी विश्वनाथ येथे भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी वाराणसीला गेले होते. मात्त, तिथे, माझ्या आई-वडिलांशिवायचे माझे घर पाहून माझा हिरमोड झाला. माझ्या आई-वडिलांनी आपल्या मुलांसोबत आपण राहावे यासाठी त्यांच्या आरामदायी वास्तव्याचा त्याग केला आगे. माझा विश्वास आहे, की प्रत्येकवेळी त्यांची काळजी घेण्याबरोबरच त्यांना वेळ देणे ही माझी जबाबदारी आहे आणि ती कायम राहील. आपल्या कुटुंबासोबत नाते अधिक दृढ करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे मला वाटत नाही. माझ्या मते, एकमेकांप्रती असलेले प्रेम, विश्वास आणि सामंजस्यामुळे त्यांच्यासोबतचे नाते दृढ होते.
नाती दृढ करण्यासाठी...
सर्वांनी एकत्र येऊन वेळ व्यतीत करावा.
चांगल्या-वाईट काळामध्ये एकमेकांना साथ द्यावी.
कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मत ऐकले जात असल्याची खात्री करावी.
एकत्र भोजनाचा आस्वाद घ्यावा.
एकमेकांच्या भावनांचा आदर करावा आणि एकमेकांना प्रेरित करत राहावे.
(शब्दांकन - अरुण सुर्वे)