बँकेकडून ‘केवायसी’चा मेसेज येतोय? जाणून घ्या त्यामागील कारण

केवायसी म्हणजे नेमकं काय?
KYC
KYC
Updated on

- अतुल कहाते

बॅंकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असते. खोट्या नावाने किंवा बनावट कागदपत्रांचा वापर करून खाते उघडणे, पैशांचे अवैधरित्या हस्तांतर करणे, दुसऱ्या माणसाच्या नावाने आपण व्यवहार करणे असे प्रकार वारंवार होत असतात. त्यांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या नियमांनुसार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याच संदर्भात घडत असलेल्या घडामोडींना अनुसरून भारतामध्येही ‘नो युवर कस्टमर (केवायसी)’ ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. अनेकदा आपल्याला ‘तुमचे केवायसी झाले आहे का?’ असा प्रश्न विचारला जातो. त्याचा सोपा अर्थ म्हणजे बॅंकेला आपली पुरेशी ओळख पटलेली आहे का? आता फक्त बॅंकाच नव्हे, तर पोस्ट ऑफिस, विमा, शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर सर्व आर्थिक व्यवहारांसाठीसुद्धा ‘केवायसी’ अनिवार्य करण्यात आलेले आहे.

फसवणूक टाळण्यासाठी तसेच आपल्या खात्याचा गैरवापर टाळण्यासाठी ‘केवायसी’ची प्रक्रिया केली जाते. त्यात आपण आपली वैयक्तिक माहिती बॅंकेला एका फॉर्ममध्ये भरून देणे अपेक्षित असते. याच्या जोडीला आपण पॅन कार्ड, आधार कार्ड, वीज बिल, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट यासारखी ओळख पटवून देणारी काही कागदपत्रेसोबत नेणे गरजेचे असते. ती तपासून आणि त्यांच्या प्रती फॉर्मला जोडून बॅंक ‘केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण करते. यासाठी आपण तिथे प्रत्यक्ष हजर असणेही गरजेचे असते. यामुळे आपणच आपले खाते उघडत आहोत ना किंवा त्यासंबंधीचे व्यवहार करत आहोत ना, याची बॅकेला खातरजमा करता येते. नियमांनुसार दर काही वर्षांनी नव्याने ‘केवायसी’ची प्रक्रिया राबवणे गरजेचे असल्यामुळे ग्राहकांसाठी हे बरेचदा त्रासदायक ठरू शकते. तसेच प्रत्येक बॅंकेकडे आणि वित्तसंस्थेकडे स्वतंत्रपणे ‘केवायसी’ पूर्ण करण्याचे बंधन असल्यामुळे कधीकधी ग्राहक वैतागून जातात.

अलिकडच्या काळात बॅंका आणि इतर वित्तसंस्था यांनी ‘केवायसी’ची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. त्यात आपण आपल्या कागदपत्रांच्या प्रती संबंधित संस्थेच्या वेबसाइटवर ‘अपलोड’ करणे अपेक्षित असते. त्यानंतर व्हिडीओ कॉलद्वारे संबंधित संस्थेचा प्रतिनिधी आपल्याशी संवाद साधून आपण दाखल केलेल्या कागदपत्रांची तसेच आपली ओळख पटवून घेतो. साहजिकच, हा जास्त सोयीचा आणि कमी खर्चिक मार्ग ठरत आहे.

या संदर्भातील एक विनोद म्हणजे बॅंका ‘केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण करीत असल्या तरी ग्राहकांना बॅंकांची पुरती ओळख आहे का, असा ‘रिव्हर्स केवायसी’ प्रश्न अनेक जण बुडणाऱ्या बॅंकांमुळे विचारताना दिसतात!

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com