
राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
आपल्या घरी काही पाहुणे आधी सांगून येतात, तर काही अचानक येतात. आज आपण ‘आधी सांगून येणारे’ पाहुणे आणि मुलं याबाबत बोलणार आहोत.
पाहुणे घरी येणार आहेत हे कळतं, तेव्हा पुढील पाच गोष्टींवर चर्चा होतेच. एक, आता घर आवरायला पाहिजे. दोन, मुलांनी नीट वागलं पाहिजे. पाहुण्यांसमोर हट्ट करता कामा नये. तीन, पाहुणे आले आहेत म्हणून मुलांना अभ्यासात सूट मिळणार नाही किंवा शाळेला दांडी मारता येणार नाही. चार, पाहुणे घरी असतील तेव्हा मुलांनी (नेहमीप्रमाणे) जेवताना कार्टून पाहणं किंवा इतर कुणी मालिका पाहत बसणं शक्य नाही. घरातली मोठी माणसं अधूनमधून बातम्या पाहतील किंवा पाहुण्यांच्या आवडीचे कार्यक्रम टीव्हीवर सुरू असतील. पाच, सांगून येणारे पाहुणे हे एकतर नातेवाईक असतात किंवा मोठ्यांचे मित्र. घरातील मोठी माणसं पाहुण्यांशी बोलत असताना लहान मुलांनी त्यांच्या मध्ये-मध्ये बोलू नये.