दोनशेहून अधिक अभंग लिहिणारे निवृत्तीनाथ कोण होते ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nivruttinath

दोनशेहून अधिक अभंग लिहिणारे निवृत्तीनाथ कोण होते ?

संत निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म इ.स. १२७३ (माघ वद्य प्रतिपदा, शके ११९५ ) ला आळंदी येथे कुलकर्णी कुळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई. निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत हे विरक्त संन्यासी होते.

विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला होता आणि ते काशीला निघून गेले होते. विवाहित असल्याने त्यांच्या गुरुनी त्यांना परत पाठवले. गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला व कालांतराने त्यांना चार अपत्ये झाली. त्यांना निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई हे अपत्य होते.

एक वारकरी सांगत आहे संत निवृत्तीनाथ म्हणजे काय ?

प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले, वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे सकल तीर्थ, ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी श्रीमद्भगवद्गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश निवृत्तीनाथ महाराजांंनी दिला होता, असे सांगितले जाते.

निवृत्तीनाथांना श्रीगुरू गहिनीनाथांकडून महान अशा नाथ परंपरेचा वारसा लाभला होता. नाथ परंपरेचे निवृत्तीनाथ हे शिष्य होते. संत ज्ञानेश्वरांनी अनेक संतमंडळींसोबत केलेल्या तीर्थयात्रेत निवृत्तीनाथ त्यांच्या सोबत होते.

त्यावेळी निवृत्तीनाथांनी व्यक्त केलेले भाव नामदेवांनी शब्दबद्ध करून ठेवले आहेत. त्याचप्रमाणे संत सेना महाराज, संत तुकाराम महाराज, संत चोखोबा, संत एकनाथ, जनाबाई, कान्होपात्रा, सोपान असो कि मुक्ताई, या सर्व संतानी निवृत्तीनाथांचे गुणगायन केले आहे.

संत निवृत्तीनाथ यांनी रचलेले अभंग रसाळ असून पंढरपूर या तीर्थ क्षेत्राची महती, योगपर, अद्वैतभक्तीपर, कृष्णभक्तीवर्णनात्मक असे विषय हाताळले आहेत. निवृत्तीनाथांनीही दोनशेहून अधिक अभंग लिहिले, हरिपाठ रचले.

संत निवृत्तीनाथ समाधी कुठे आहे?

सर्व संतमंडळी निवृत्तीनाथांना समाधी देण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाली होती. प्रत्यक्ष पांडुरंगाने स्वतः संतांचे पूजन केले.

“सुंदरनारायण गोरविला फार | केला नमस्कार वैष्णवांनी ||

गोदावरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर | चालले भार वैष्णवांचे ||”

निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वताच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य द्वादशी शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. याच ठिकाणी त्यांना गहिनीनाथांकडून ज्ञानप्राप्ती झाली होती. ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे.

Web Title: Who Was Nivruttinath Who Wrote More Than 200 Abhangs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top