esakal | RT-PCR चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह का येतात?

बोलून बातमी शोधा

RT-PCR चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह का येतात?
RT-PCR चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह का येतात?
sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोनाची सामान्य लक्षणं जरी जाणवली तरीदेखील तात्काळ कोरोना टेस्ट करणं गरजेचं आहे. यामध्येच सध्या कोविड चाचणीसोबत RT-PCR चाचणी करण्यावर अनेकांचा भर आहे. मात्र, अनेक जणांच्या RT-PCR चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना खोकला, ताप, अशक्तपणा यासारखी कोविडची लक्षण जाणवत असतात. यामध्येच ‘HRCT’चा अहवाल मात्र पॉझिटिव्ह येणे किंवा सीटी स्कॅनमध्ये छातीमध्ये जंतूसंसर्ग आढळणे अशा घटना समोर येत आहेत. म्हणूनच अन्य चाचण्या पॉझिटिव्ह येणं आणि RT-PCR चाचणी निगेटिव्ह येण्यामागचं कारण काय ते जाणून घेऊयात.

रुग्ण पॉझिटिव्ह असूनही कोविडची ‘RT-PCR’ चाचणी निगेटिव्ह आलेली का दिसते?

सध्याची ‘RT-PCR’ चाचणी ही मूलत: विषाणूच्या ‘आरएनए’ची तपासणी करते. कोरोनाच्या सर्व नवीन रूपांमध्ये आरएनए हे विषाणूसारखेच आहेत, केवळ त्यांचे ‘स्पाइक प्रोटीन’ बदलले जातात. सध्याच्या सर्व चाचण्यांमध्ये कोरोना विषाणूची नवीन रूपेदेखील शोधली जात आहेत. परंतु, खरी समस्या अशी आहे, की ‘आरटी-पीसीआर’चा संवेदनशीलता दर (परिणामकारकता दर) हा केवळ ६० ते ७० टक्के आहे. याचा अर्थ असा, की ‘RT-PCR’ चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, तरी संबंधित रूग्ण हा पॉझिटिव्ह असण्याची शक्यता ३०ते ४०टक्के इतकी असतेच.

हेही वाचा: हवेतील ऑक्सिजन व मेडिकल ऑक्सिजनमध्ये नेमका फरक काय?

‘रॅपिड अॅंटीजेन टेस्ट’चा संवेदनशीलता दर ५०ते ६०टक्के आहे. तो तर ‘आरटी-पीसीआर’पेक्षाही अगदी कमी आहे. याचा अर्थ असा, की जर एखाद्या रुग्णाच्या ‘रॅपिड अॅंटीजेन टेस्ट’चा अहवाल निगेटिव्ह आला, तरी तो रूग्ण कोविड पॉझिटिव्ह असण्याची शक्यता ४० ते ५० टक्के असते. म्हणूनच, चाचणीसाठी उच्च संवेदनशीलता दर विचारात घेतल्यास, ‘आरटी-पीसीआर’ चाचणीची शिफारस वैद्यकीय व्यावसायिक करीत असतात. खरे पाहता, चांगले वैद्यकीय उपचार आणि निदान यांसाठी कोविड चाचणीचा संवेदनशीलता दर ९० टक्क्यांहून अधिक असायला हवा.

व्यक्तीला खरंच कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर कायम कोविड चाचणी किंवा आरटी-पीसीआर चाचणी करण्याचा सल्ला देतात. एखादा रुग्ण ‘आरटी-पीसीआर’ चाचणी पुन्हा करीत असेल, तर त्या चाचणीची संवेदनशीलता वाढते. एका चाचणीचा संवेदनशीलता दर ६० ते ७० टक्के असेल, तर दुसरी चाचणी दोन दिवसांच्या काळात केल्यास हा दर ८० टक्के असू शकतो. त्याचप्रमाणे तीन चाचण्यांचा संवेदनशीलता दर ९० टक्के येऊ शकतो.

आपल्या निदानाबद्दल दुपटीने खातरजमा करण्यासाठी रॅपिड अॅंटीजेन टेस्ट’, ‘एचआरसीटी टेस्ट’ आणि रक्ताच्या इतर चाचण्या यांच्यामधून व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होते. ‘रॅपिड अॅंटीजेन टेस्ट’ व ‘एचआरसीटी टेस्ट’ या डायग्नोस्टिक लॅब किंवा रुग्णालयांमध्ये केल्या जाऊ शकतात. ‘रॅपिड अॅंटीजेन टेस्ट’चा निष्कर्ष १० ते १५ मिनिटांत मिळू शकतो, अर्थात, संबंधित डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कामाचा किती भार आहे, यावर हा कालावधी अवलंबून असतो. ‘एचआरसीटी’ चाचणीच्या अहवालासाठीदेखील कामाच्या भारानुसार २-३ तासांचा वेळ लागू शकतो.

( डॉ.भारेश देढिया हे खार येथील हिंदुजा हॉस्पिटल अॅंड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये हेड – क्रिटिकल केअर आहेत.)