साक्षीत्व ध्यान

योगासनांपैकी दिसायला सोपं आसन म्हणजे शवासन, त्याचप्रमाणे ध्यानप्रकारात करायला सोपं म्हणजे ‘साक्षीत्व ध्यान’ होय.
yoga
yogasakal

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

योगासनांपैकी दिसायला सोपं आसन म्हणजे शवासन, त्याचप्रमाणे ध्यानप्रकारात करायला सोपं म्हणजे ‘साक्षीत्व ध्यान’ होय. साक्षीत्व ध्यानामधे मनातल्या विचारांकडे अलिप्तपणे पाहायचं आहे. त्यासाठी काही गोष्टी समजून घेऊया. मन म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न हजारो वर्षांपासून सुरू आहे. आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या घटना, प्रसंग घडत असतात.

हे सगळे प्रसंग, व्यक्ती यांच्याविषयी प्रतिसाद, प्रतिक्रिया, पडसाद आपल्या आत उमटतात. त्यांना विचार, वृत्ती, भावना, तरंग असं म्हणतात. या विचारांचा एक अखंड ओघ, प्रवाह आत सुरू आहे, त्यालाच मन असं म्हणूया. या प्रवाहाकडं, म्हणजेच मनाकडं आपण पहात राहणार आहोत. मनाकडं, म्हणजे नक्की कुठं पाहायचं? या ध्यानासाठी म्हणून ‘माझं मन भ्रुमध्यापाशी आहे’ असं लक्षात ठेवूया.

कसं करा ‘साक्षीत्व ध्यान’

आपल्याला दहा मिनिटं सहजपणे बसता येईल अशा स्थितीत बसावं. डोळे शांत मिटलेले, शरीर शिथिल, श्‍वसन संथ आणि मन शांत अशी स्थिती धारण करण्याचा प्रयत्न करावा.

या ध्यानाचा पहिला टप्पा म्हणजे ‘शरीराचं स्थिरीकरण’. ध्यान करताना शरीरच स्थिर नसल्यास मन स्थिर होणं अवघड वाटतं. शरीर स्थिर व्हावं यासाठी आपल्या पाठीच्या कण्याकडं पाहावं. कसा आहे हा कणा? तेहेतीस मणक्यांची ही साखळी आहे.

लहानपणी आपण लगोरीचा खेळ खेळायचो. त्यात लाकडी दांड्याभोवती चकत्या रचलेल्या असायच्या. तशी या कण्याची रचना आहे. हा कणा आता आपल्याला अगदी स्थिर आणि सरळ ठेवायचा आहे. (सहजपणे, ‘सरळ’ ठेवावा. ''ताठ'' नाही. काही जण तो ताठ ठेवायला जातात, आणि मग पाठ भरून आल्यानं लक्ष तिकडेच जात राहतं.)

मनात वेगवेगळे विचार येत राहतील, ते येऊ द्या. त्यांना अडवू नका. मनात आलेल्या विचारांना मुद्दाम बाजूला सारायचं नाही. मात्र त्या विचारांवर विचारही करायचा नाही. या विचारांकडं तटस्थपणे पाहतापाहता आपल्याला विचारातीत (विचारांच्या पलीकडं) व्हायचं आहे.

साक्षीत्व ध्यानात काय होतं?

आपण स्वस्थ, शांत, स्वेच्छेने बसलेले असतो. मन मात्र चौखूर उधळतं. काळजी करू नका! हा अनुभव सगळ्यांनाच येतो. हिंडायला लागलंच, तरी एक टप्पू देऊन आपण त्याला लगेचच कामाच्या ठिकाणी आणतो ना!

जेजे काही समोर येतंय, त्याकडं नुसतं पाहात राहायचं. याच्याकडं मी पाहाणार नाही, असं म्हणायचं नाही. मात्र, जे दिसतं आहे त्याविषयी राग, लोभ अशा कुठल्या प्रतिक्रियाही द्यायच्या नाहीत. चांगलं, वाईट असं त्या विचारांना कुठलं लेबलही लावायचं नाही. असं दररोज, न कंटाळता थोडाथोडा वेळ बसत राहिलं, की आपल्याला ध्यानाची सवय लागते, आवड निर्माण होते. हळूहळू मनात येणाऱ्या विचारांची संख्या आणि गती कमी व्हायला लागते. कधीतरी एक क्षण असा येतो, मनात एकही विचार नाही. मनाची ही स्थिती अतिशय आनंददायक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com