Amol Kolhe : कोल्हेंची आघाडीची चढती शिडी

शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी यंदा पहिल्यांदाच शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील धान्य गोदामात ठेवण्यात आली.
Amol Kolhe
Amol Kolhesakal

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी यंदा पहिल्यांदाच शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील धान्य गोदामात ठेवण्यात आली. दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण झालेल्या पहिल्या दहा फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे सातत्याने आघाडी घेत असल्याचे निदर्शनास येताच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हळूहळू काढता पाय घेतला आणि ते या परिसरातून निघून गेले. याउलट डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.

या मतमोजणीच्या परिसरात सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. त्यातच मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत असल्याने, या मतमोजणी परिसरात मतमोजणी प्रतिनिधी, पोलिस, सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त फारशी गर्दी दिसत नव्हती. त्यामुळे या परिसरात अगदी दुपारपर्यंत कार्यकर्त्यांची ना गर्दी, ना उत्साह, ना जल्लोष, असे चित्र पाहावयास मिळाले. अगदी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनीही दुपारपर्यंत अनुपस्थित राहणेच पसंत केले.

दुपारी तीन वाजता डॉ. कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे या मतमोजणी केंद्रात दाखल झाल्या. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर भंडारा आणि गुलाल उधळत जल्लोष केला. दुपारी चारच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे मतमोजणी केंद्रात दाखल झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना पेढा भरवत, मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर विजयी मिरवणूक काढली.

सुविधांबाबत तक्रार

शिरूर लोकसभा मतमोजणी केंद्रात बसण्यासाठी चांगली सोय नव्हती. तसेच स्वच्छतागृहांचीही व्यवस्था नसल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गटाकडून तक्रार करण्यात आली. आढळराव यांच्या गटाने तक्रार केल्यानंतर काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता.

प्रतिकूल परिस्थितीत जनता माझ्यासोबत : कोल्हे

खोडद : ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा हा विजय आहे, कारण सर्वसामान्य मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती. मायबाप जनतेने पुन्हा एकदा दाखवलेला विश्वास आणि महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हा विजय झाला आहे,’’ अशा भावना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरमधील विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या.

Amol Kolhe
Loksabha Elections Vidarbha : विदर्भात महाविकास आघाडीची मुसंडी!

ते म्हणाले, ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनता माझ्यासोबत राहिली. एकीकडे सर्व दिग्गज राजकीय नेते एका बाजूला होते, तर एका बाजूला घटक पक्षातील कार्यकर्ते होते. तरीही सर्वसामान्य जनता माझ्यासोबत होती. अनेक वादळे छातीवर झेलून उभं कसं राहावं, हे शरद पवार यांनी दाखवून दिलं आहे. यातून त्यांची पुन्हा एकदा संघर्ष युद्धाची वृत्ती दिसून आली आहे. मी एक बाब आधीपासूनच आवर्जून म्हणत होतो की, महाराष्ट्र दिल्लीसमोर आतापर्यंत कधी झुकला नाही आणि झुकणार नाही. हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने दाखवून दिले आहे. त्यासाठी मला प्रत्येक मराठी माणसाचा मनापासून अभिमान आहे.’’

नवीन पक्ष, नवीन चिन्ह, परंतु ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राहुल गांधी आणि इतर सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आशीर्वाद, तसेच सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास हेच माझ्या विजयाचे गमक आहे.

- डॉ. अमोल कोल्हे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com