Aam Aadmi Party : आम आदमी पक्षाला न्यायालयाचा दिलासा ; संजय सिंह यांना सहा महिन्यांनंतर जामीन

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे एकापाठोपाठ एक नेते तुरुंगात जात असताना आणि त्यांचे जामीन नाकारले जात असताना या पक्षाचे खासदार संजय सिंह यांना आज सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला.
Aam Aadmi Party
Aam Aadmi Partysakal

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे एकापाठोपाठ एक नेते तुरुंगात जात असताना आणि त्यांचे जामीन नाकारले जात असताना या पक्षाचे खासदार संजय सिंह यांना आज सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. मागील सहा महिन्यांपासून तिहार तुरुंगात असलेल्या सिंह यांना आज जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे उत्साह वाढलेल्या ‘आप’च्या आमदारांनी आज केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांची भेट घेत, केजरीवालांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती केली.

बहुचर्चित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात संजय सिंह यांच्यासह ‘आप’च्या काही नेत्यांवर आरोप आहेत. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि आता अरविंद केजरीवाल असे पक्षाचे बडे नेते सध्या चौकशीसाठी तिहार तुरुंगात आहेत. आज खासदार सिंह यांच्या जामीनअर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली ‘सिंह यांना अजूनही कोठडीत ठेवण्याची गरज आहे का,’ अशी विचारणा न्या. संजीव खन्ना, न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. पी. बी. वराले यांच्या खंडपीठाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) केली. यावर ‘कोठडीची गरज नसल्याचे’ ‘ईडी’कडून सांगण्यात आले. त्यानंतर खंडपीठाने सिंह यांचा जामीन अर्ज मंजूर केला. मद्यधोरण प्रकरणात हवाला व्यवहार झाला असल्याचे स्पष्ट झालेले नाही, तसेच पैसा कोठून आला, कोठे गेला याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे संजय सिंह यांना जामीन दिला जावा, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली, ती मान्य झाली.

सत्याचा विजय : आप

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इतर महत्त्वाचे नेते तुरुंगात असताना संजय सिंह बाहेर पडल्याने ‘आप’ला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीमध्ये चार मे रोजी मतदान होणार आहे. सिंह यांना जामीन मिळाल्याने ‘सत्याचा विजय’ झाल्याचा दावा ‘आप’ नेत्यांनी केला आहे. हा लोकशाहीसाठी मोठा दिवस आहे. सरकारने केलेले आरोप हे काही जणांकडून वदवून घेतलेल्या जबाबाच्या आधारावर करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिली आहे.

Aam Aadmi Party
Loksabha Election 2024 : महायुती अन् मविआ पेचात ; चर्चेच्या फेऱ्यांनंतरही जागावाटपाचा तिढा सुटेना

बाहेर वक्तव्य करू नये

राज्यसभेचे खासदार असलेल्या संजय सिंह यांना ईडीने गतवर्षीच्या ऑक्टोबरमध्ये अटक केली होती. संजय सिंह तुरुंगात असताना राज्यसभेवर निवडून गेले होते. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात नियमित जामीन मिळणारे संजय सिंह हे ‘आप’चे पहिले नेते ठरले आहेत. जामिनावर बाहेर असताना या प्रकरणाशी संबंधित कोणतेही वक्तव्य करू नये, असे निर्देश न्यायालयाने सिंह यांना दिले आहेत. तपास संस्थेने सिंह यांना दिलेली सूट ही परंपरा ठरू नये, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाच्या आदेशानुसार, सुनावणी सुरु असेपर्यंत संजय सिंह हे न्यायालयाने घालून दिलेल्या अटी पाळत तुरुंगाबाहेरच राहतील. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला असला तरी छाप्यांदरम्यान कोणतीही रक्कम आढळून आली नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले होते.

भाजपमध्ये येण्यासाठी दबाव : आतिशी

भाजपमध्ये सामील व्हा, नाहीतर येत्या काही दिवसांत ‘ईडी’कडून अटक केली जाईल, असा इशारा भाजपने आपल्याला दिला होता, असा खळबळजनक दावा ‘आप’च्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या,‘‘माझ्या एका निकटवर्तीच्या माध्यमातून भाजपने माझ्याशी संपर्क साधला होता. राजकीय कारकिर्द वाचवायची असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा आणि तसे केले नाही तर येत्या काही दिवसांत ईडीकडून अटक होऊ शकते, असा इशारा मला देण्यात आला. केंद्रातील भाजपकडून आमच्या पक्षाच्या नेत्यांना धमकाविण्या प्रकार सुरू आहे. मात्र, आम्ही अरविंद केजरीवाल यांचे सैनिक आहोत, भाजपला घाबरणार नाहीत.’’ येत्या दोन महिन्यांत स्वत:सह राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज आणि दुर्गेश पाठक या चार नेत्यांना ‘ईडी’ अटक करणार आहे, असा आरोपही आतिशी यांनी केला.

सुनीता यांचे वाढते प्रस्थ

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातील मुक्काम वाढल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी ‘आप’वर नियंत्रण ठेवले. आपच्या अनेक आमदारांनी सुनीता केजरीवाल यांची आज शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. २१ मार्चला मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाल्यापासून सुनीता केजरीवाल या पक्षामध्ये सक्रिय झाल्या आहेत. केजरीवाल यांनी तुरुंगातून पाठविलेले दोन संदेश सोशल मीडियावर वाचून दाखविण्याची जबाबदारी सुनीता यांनीच पार पाडली. नुकत्याच झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या सभेत त्यांची उपस्थिती ठळकपणे अधोरेखित झाली. ‘आप’चे अनेक मंत्री मागच्या रांगेत बसलेले असताना सुनीता पहिल्या रांगेत बसल्या होत्या. यावरून सुनीता केजरीवाल या अरविंद केजरीवाल यांच्या उत्तराधिकारी राहतील एवढे स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे. तसेच अरविंद केजरीवालांनी राजीनामा देऊ नये, अशी मागणीही काही नेत्यांनी सुनीता यांच्याकडे केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com