BJP Lok Sabha Election : आता मोदी सरकार नाही तर.... भाजपच गर्वाचं घर खाली का आलं? जाणून घ्या कारणे

पंतप्रधान मोदी यांना आता तारेवरची कसरत करावी लागणार...!
lok sabha election 2024 result pm narendra modi
lok sabha election 2024 result pm narendra modisakal

Why BJP did not get 400 seats Lok Sabha Election : लोकसभेच्या 18 व्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आश्चर्यजनक लागले आहेत. निवडणुकीपूर्वी सातत्याने `भाजप 370 पार व एनडीए 400 पार’ असे सांगणारे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील मतदाराने केवळ 240 जागा देऊन लगाम लावला. निकाल येण्यापूर्वी मोदी व भाजप धार्जिण्या (गोदी मिडिया) वाहिन्यांनी जाहीर केलेले सारे एक्झिट पोल्स धादांत खोटे ठरले. एक्झिट पोल्स वर सट्टाबाजार खेळणाऱ्यांनी कोट्यावधी रूपये इकडून तिकडे केले, रोखे बाजार उसळला. प्रत्यक्षात, भाजप बहुमताच्या आसपासही (272) पोहोचत नाही, असे दिसताच 4 जूनला रोखेबाजार घसरला. 2014 ते 2024 ही दहा वर्षे अनभिशिक्त सत्ता गाजविणाऱ्या मोदींना आता तेलगू देसम, जद (यू) या दोन पक्षांच्या कुबडया घेऊन सरकार चालवावे लागणार आहे, ते त्यांना वेठीस धरणार. अर्थात, याबाबत मोदींच्या समर्थकांचा जळफळाट होणे सहाजिक. याचे आणखी एक कारण म्हणजे, येते सरकार हे केवळ भाजप वा मोदींचे नसून संमिश्र सरकार असेल.

तथापि, या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष असेल, याबाबत कुणाच्या मनात शंका नव्हती. घटनेनुसार, सर्वाधिक जागा मिळणाऱ्या पक्षाच्या नेत्याला सरकार बनविण्यास राष्ट्रपती प्रथम आमंत्रण देतो. त्या नेत्याकडे 272 जागा आहेत की नाही, याची खात्री राष्ट्रपतींना तत्पूर्वी करावी लागते. त्यानुसार, मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, याबाबत दुमत नव्हते. प्रश्न आहे, तो मोदी यांना नव्या कार्यकालात सरकार चालविण्यासाठी घटक पक्षांवर अवलंबून राहावे लागणार, हा आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 22 प्रादेशिक घटक पक्ष होते. परंतु, 2019 नंतर गृहमंत्री अमित शहा व पक्षाध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी `विडा’ उचलल्याप्रमाणे ``विरोधक व प्रादेशिक पक्षांची देशाला गरज नाही, त्यांना नष्ट केले जाईल,’’ अशा प्रकारची जाहीर विधाने करणे सुरू केले. भारत हे संघराज्य (फेडरल) आहे, याचा त्यांना विसर पडला. उलट, विऱोधक व प्रादेशिक पक्षांना संपविण्यासाठी मोदी व शहा यांनी दुहेरी धोरण अवलंबिले. जे बऱ्या बोलाने भाजपमध्ये सामील होणार नाही, त्यांना फोडायचे अथवा त्यांच्याविरूद्ध सीबीआय, आयकर विभाग व इडी यांचा ससेमिरा लावून त्याना परेशान करायचे, अटका करायच्या. त्यांना भ्रष्ट ठरवायचे. आणि त्यांचा काटा काढायचा.

त्या धोरणानुसार महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्यात आले. मोदी व भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांच्यावर कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचे जाहीर आरोप केले होता. त्यांना चौकशी संघटनांचा धाक दाखवून पक्षात घेतले, चांगल्या जागा दिल्या व साऱ्या आरोपातून मुक्त केले. याबाबत खुद्द भाजपमध्ये नाराजी होती. ``भाजप वॉशिंग मशीन आहे,’’ असे बोलले जाऊ लागले. झारखंड मध्ये माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरूंगात टाकले. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरूंगात टाकले. प्रत्यक्षात निवडणूक रोख्यांचा कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला तो मोदी यांनी. `इंडिया आघाडी’ला आता 233 जागा मिऴाल्याने ``रोख्यांबाबत चौकशी करावी, संसदीय समिती स्थापन करावी,’’ या मागण्या लौकरच पुढे येणार आहेत. 

मोदी व भाजपच्या पराभवाची कारणे काय आहेत?

2014 ते 2024 या दहा वर्षात मोदी देशाच्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले. स्वतःला विश्वगुरू समजू लागले. देशाला 2047 चे स्वप्न दाखवू लागले. पण, जनतेला चिंता वर्तमानाची होती. त्यात काही  गुणात्मक बदल होत नव्हता. बेरोजगारीचा कहर झाला. मोदी यांनी सर्वाधिक प्रहार केला तो राहुल गांधी यांच्यावर. राहुल गांधीही प्रतिहल्ला करीत होते. मोदींच्या नारेबाजीकडे पहा, ``काँग्रेस इज डाईंग, पकिस्तान इज क्राईंग,’’ ``काँग्रेस व विरोधक निकाल येण्यापूर्वीच हारले आहेत.’’ ``निकाल लागताच गांधी परिवार इटलीला पलायन करील.’’ ``काँग्रेसला राहुल गांधीच्या वयाइतक्याही (53) जागा मिळणार नाहीत.’’ प्रत्यक्षात काँग्रेसला 99 जागा मिळाल्या.

राहुल गांधी यांनी भारताच्या उत्तर दक्षिण व पूर्व-पश्चिम अशा सुमारे आठ हजार कि.मी. केलेल्या पदयात्रेची खिल्ली भाजप व गोदी मिडियाने उडविली. त्यांच्यावर कायमचा `पप्पू’ असा शिक्का लावला. आपण व भाजप हे ``धुतळ्या तांदळा सारखे, पण सारे विरोधक भ्रष्ट’’ असा प्रचार केला. शेतकरी आंदोलनात सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या आंदोलनाला पायदळी तुडविण्याची एकही संधि मोदी यांनी सोडली नाही, की शेतकऱ्यांविषयी सहानुभूतीचा एक शब्द उच्चारला नाही. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा अजय मिश्रा याने लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर हल्ला करून चार शेतकऱ्यांना ठार मारल्यानंतरही त्याच्यावर कारवाई केली नाही. 2024 च्या निवडणुकात अजय मिश्रा टेनी खेरी मतदार संघातून पराभूत झालेत.

शहीनबागेत आंदोलन करणाऱ्या मुस्लिम महिलांना ``पाकिस्तानचा पाठिंबा आहे’’, असा प्रचार केला. सातत्याने हिंदु विरूद्ध मुस्लिम अशी तेढ निर्माण करण्याची भाषा केली. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला हिंदुत्वाची शेखी मिरविणाऱ्या मोदी यांनी खऱ्या अर्थाने हिंदु धर्माचे रक्षण करणाऱ्या चार पीठातील एकाही शंकराचार्याला आमंत्रित केले नाही. मुसलमानांची संख्या वाढणार व हिंदूंची कमी होणार, असे भूत कायम हिंदु समाजापुढे ठेवले. रामाच्या नावावर मतं मागणाऱ्या भाजपला खुदद अयोध्येतील निवडणुकीत अपयश आले, आणखी नामुष्की ती काय?   

मोदी यांची वाटचाल ``एक नेता, एक पक्ष व एक निवडणूक’’ या दिशेने म्हणजेच चीन व रशियन राजकीय प्रणालीच्या दिशेने चालू असल्याचे देश पाहात होता. त्यासाठी राज्यघटना बदलण्याचे घाटत होते. ते ही जनतेच्या ध्यानात आल्याने तो मुद्दा इंडिया आघाडीतील पक्षांनी उचलून धरला. बेरोजगारीने शिखऱ गाठले असता त्या विषयी चकार शब्द बोलण्यास मोदी तयार नव्हते. ज्या महिला ऑलिम्पिक खेळाडूंनी देशाची शान राखली, त्यांना कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी लैंगिक वागणूक देऊनही मोदी त्यांना  गोंजारत बसले. `बेटी बचाव’ नारा देऊनही मणिपूरमध्ये दिवसाढवळ्या महिलांना नग्न करून त्यांची विटंबना करणाऱ्यांना अददल घडविली नाही, की तेथील दंगलीत शंभरावर अधिक लोक ठार होऊनही छप्पन्न इंच छाती फुगविणाऱ्या मोदी यांनी एकदाही मणिपूरला भेट दिली नाही. ते मुख्यमंत्री असताना 2002 मध्ये झालेल्या मुस्लिमांवरील हल्ल्यात बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्या अकरा हिंदू गुन्हेगारांना तुरूंगातील शिक्षेचा कालावधि पूर्ण न करताच सोडून देण्यात आले व ``ते सारे सुसंस्कृत आहेत’’ अशी घोषणा करीत मिठाई वाटण्यात आली.

प्रत्येक कामगिरीचे श्रेय ते स्वतः कडे घेऊ लागले.``गेल्या साठ सत्तर वर्षात जे झाले नाही, ते गेल्या दहा वर्षात साध्य झाले, असे सांगू लागले.’’ रस्ते बांधायचे नितिन गडकरी यांनी, उद्घाटन करायचे मोदींनी. गडकरींना त्यांनी खड्यासारखे दूर ठेवले होते. चंद्रयान पाठवायचे इस्त्रोच्या भारतीय शास्त्रज्ञांनी. त्याचेही श्रेय घ्यायचे मोदींनी. ज्या लोकशाहीच्या पायावर ते व भारतीय जनता पक्ष निवडून आला, तिची जोपासना करणाऱ्या महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यावर लायकी नसणाऱ्या भाजपच्या नेत्यांकडून निर्भत्सना होऊ लागली. ब्रिटिश कालीन देशद्रोहाचा कायदा एकाएकी जागा झाला. त्याचा गैरवापर स्वतंत्र विचारसरणीच्या लोकांविरूद्ध होऊ लागला. पीएमएलए व यूएपीए हे कायदे हत्यारासारखे विरोधकांविरूद्ध वापरले जाऊ लागले. यामुळे जनमत संतापले होते. त्याचा परिणाम म्हणजे मोदी सरकारमधील तब्बल 13 मंत्र्यांना मतदारांनी धूळ चारली. हे सारे पराभूत झाले.

या साऱ्या घटना मोदी व भाजपच्या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यांचा एकत्र परिणाम मतदानावर झाला. राष्ट्रीय राजकारणात विरोधक व प्रादेशिक पक्षांची प्रासंगिकता या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाली. निवडणुकीत ना मोदी लाट होती, ना राम लाट होती. परंतु, युवक (बेरोजगारी) शेतकरी (वाढता अत्याचार)  दलित - मुस्लिम (पक्षपाती धोरण) व बऱ्याच प्रमाणात महिला (महागाई वाढल्याने, घरगुती गॅसचे भाव पाचशेवरून सिलिंडर मागे 11 शे ते 12 शे रूपयांपर्यंत वाढल्याने) यांची नाराजी मतपेटीतून पुढे आली. जनतेच्या नाराजीची सूप्त लाट भाजपच्या नेत्यांच्या ध्यानी आली नाही. अमित शहा यांचे 2014 व 2019 मध्ये सफल झालेले सोशल इंजिनियरिंग 2024 मध्ये फिके पडले. `शायनिंग इंडिया’ चा प्रचार करूनही वाजपेयी यांचा पराभव झाला होता. तसेच, भारताच्या आर्थिक प्रगतीचा ढोल बडवूनही भाजपला यंदा 2019 सारखे मतदान लोकांनी केले नाही. परिणामतः मतदाररूपी लव-कुश यांनी मोदींचा रथ 240 जागांवर अडविला. लोकशाही जिंकली, एकाधिकारीशाही पराभूत झाली.

मोदींसाठी या निवडणुकीतील जमेची बाजू म्हणजे, ओडिशात भाजपला मिळालेले अभूतपूर्व यश. दिल्लीत भाजपने सातही जागा पुन्हा जिंकल्या. अरूणाचलमध्ये त्यांचे सरकार आले.      

देश व जग पादाक्रांत करावयास निघालेल्या मोदी यांना आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे. देशाची वाटचाल पुन्हा एकदा संघराज्याच्या (फेडरल) दिशेने होणार, ही समाधानाची बाब होय. या निवडणुकीत एनडीए आघाडीतील 292 पैकी भाजपला 240 व सहकारी पक्ष तेलगू देसम (16), जद यू (12), शिंदे शिवसेना (7), लोकजनशक्ती पक्ष (5), जद संयुक्त (2), वायएसआर काँग्रेस (4), जनसेना (2) हिंदुस्तानी आवामी मोर्चा (1) असे वाटप झाले असून, दुसरीकडे इंडिया आघाडीला एकूण 233 जागात काँग्रेस (99), समाजवादी पक्ष (37), तृणमूल काँग्रेस (29), द्रमुक (22), उद्धव ठाकरे शिवसेना (9) राष्ट्रवादी काँग्रेस व डावे पक्ष प्रत्येकी (8), राष्ट्रीय जनता दल (4), झारखंड मुक्ती मोर्चा व आम आदमी पक्ष प्रत्येकी (3) यांचा समावेश आहे. मतदाराने सत्तारूढ व विरोधक या दोघांनाही इशारा दिला आहे. 

`इंडिया आघाडी’ने विरोधात बसायचे ठरविल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी जाहीर केले. हे स्तुत्य होय. याचे एक कारण म्हणजे, इंडिया आघाडीकडे सरकार बनविण्याइतके संख्याबळ नव्हते, जे मोदींकडे सध्या 2तरी आहे. परंतु, त्यांना पाठिंबा देणारे पक्ष मोदी व भाजपचे राजकीय लचके घेतल्याशिवाय थांबणार नाहीत. सरकारला राज्यघटनेत हवे तसे बदल करता येणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातील सुमारे 15 ते 20 खात्यांना भाजपला मुकावे लागेल. मोदी यांनी विरोधी व प्रादेशिक पक्षांना नष्ट करण्यासाठी जसे त्यांचे लचके तोडले, तेच धोरण त्यांच्यावर बुमरँगसारखे उलटले आहे. त्यांच्या गर्वाचे घर खाली झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com