मतदारराजा ‘फतवा’ ऐकणार का?

‘मनसे’साठी आखलेली राजकीय गणिते यशस्वी होण्याविषयी शंका
mns raj thackeray support bjp modi shah vote lok sabha election 2024 politics
mns raj thackeray support bjp modi shah vote lok sabha election 2024 politicsSakal

‘मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या राजकारणात दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन भाजप खेळवतंय. मी कोणत्याही पक्षाच्या दावणीला माझा पक्ष बांधणार नाही,’ अशी भूमिका घेतेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बघता बघता महायुतीसाठी सभा घेऊ लागले.

त्यांनी महायुतीसाठी घेतलेल्या पुण्याच्या सभेतून महाराष्ट्र विकास आघाडीला मतदान कऱण्यासाठी मुस्लिम फतवे काढत असतील तर हिंदुंनीही भाजपला मतदान करण्यासाठी फतवा काढावा, असा स्वयंघोषित नाराच मतदारांना दिला.

मात्र तसे असले तरी मनसेच्या अठरा वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक वेळा स्वतः राज ठाकरे यांनी राजकीय व सामाजिक भूमिका बदलल्यामुळे पक्ष अधोगतीला पोहोचला असताना हा नवीन फतवा मनसे कार्यकर्ते व मतदार मान्य करतील का, या फत्तव्याचा उपयोग महायुतीला होईल का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात पडला आहे.

‘मनसे’ची स्थापनाच राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून राज्यातील सत्ताधारी कॉँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या कारभाराला विरोध करत केली होती. त्यानंतर शिवसेनेशी (उध्दव ठाकरे) जवळीक साधण्याचा केलेला प्रयत्न, २०१४ साली भाजपला पाठिंबा, पुन्हा २०१९ साली अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्यावर टोकदार टीका करताना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत राज ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून रान उठवले होते.

त्यावेळी मनसेने काँग्रेस, राष्ट्रवादीची जवळीक साधली होती. सर्व प्रसारमाध्यमे नरेंद्र मोदी यांनी खरेदी केली आहेत. त्यामुळे मीडिया पूर्णपणे भाजपच्या बाजूने असल्याची खरमरीत टीकाही ठाकरे यांनी केली होती. त्याचबरोबर मुंबई - अहमदाबाद या बुलेट ट्रेनलाही विरोध करताना एकही वीट रचू न देण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

एक लाख कोटी एक दोन शहरांसाठी हे कसे खर्च करतात असाही प्रश्न ठाकरे यांनी त्यावर उपस्थित केला होता. त्याचबरोबर मुंबईतील शिवस्मारक, मोदी सरकारच्या अनेक योजना व धोरणांवर सडकून टीका ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणूक प्रचारात केली होती. पुलवामा हल्ल्यावरूनही मोदींवर संशय व्यक्त केला होता.

नोटबंदीमुळे देशातील लोक कंगाल झाले तर भाजपकडे कोठून पैसे आले, असा सवाल करत नोटबंदीतून भाजपने मोठा पैसा मिळवल्याचा आरोपही केला होता. यावेळी मात्र अचानक व नेहमीप्रमाणे ठाकरे यांनी पुन्हा गिरकी घेत लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देत आपले राजकीय गणित साधण्याचा ठाकरे यांचा मानस दिसत आहे.

लोकसभा निवडणूक मनसे लढवणार नसल्याचे ठाकरेंनी जाहीर केले. मात्र, भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभाही घेण्यास राज यांनी सुरुवात केली आहे. मात्र अशा सभा घेऊन पक्षाच्या पदरात नेमके काय, अशी भावना कार्यकर्त्यांत होत आहे.

बदलत्या भूमिका

मोदी-शहा यांना महाराष्ट्रात येऊ देऊ नका, असे म्हणणारे राज ठाकरे पुन्हा त्यांच्याच मांडीला मांडीला मांडी लावून बसताना मराठीचे हित ते हिंदुत्व, नरेंद्र मोदींची स्तुती ते त्यांना केलेला कडवा विरोध, शरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक ते भाजपशी संधान बांधण्याचा प्रयत्न आणि आता पुन्हा भाजपला थेट पाठिंबा, ते अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केले नाही, इथपर्यंतच्या ठाकरे यांच्या प्रवासाला मतदार किती साथ देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मनसेची वाटचाल

  • मनसेचे १३ आमदार २००९ मध्ये निवडून आले. त्यानंतर मात्र फारसे यश नाही

  • गेली दहा वर्ष लोकसभेसाठी मनसे फक्त प्रचारातच सामील

  • सत्तेपासून दूर असल्याने मनसेची वाताहत

  • कायमच बदलत्या भूमिकेने स्वतःचा कमवलेला मतदार दूर

  • कधी धर्मनिरपेक्ष तर कधी हिंदुत्ववादी भुमिकांमुळे कार्यकर्तेच संभ्रमात

  • पक्ष व नेत्यांच्या बदलत्या भूमिकेवर राज्यातील मतदार नाराज

  • महायुती, आघाडी दोन्हींचा प्रचार करूनही दहा वर्षांमध्ये फायदा नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com