Manoj Jarange : जरांगेंच्या इशाऱ्यामुळे नाशिकचा पेच ; ओबीसी व मराठा दोन्ही वर्गांचा लाभ घेण्याचा होता भाजपचा प्रयत्न

अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असतानाही नाशिक मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार ठरत नाही. आरक्षणाच्या प्रश्नावरील संघर्षामुळे नाशिकच्या जागेवर पेच निर्माण झाला.
Manoj Jarange
Manoj Jarange sakal

मुंबई : अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असतानाही नाशिक मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार ठरत नाही. आरक्षणाच्या प्रश्नावरील संघर्षामुळे नाशिकच्या जागेवर पेच निर्माण झाला. महायुतीने छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात थेट प्रचार करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिल्यामुळे नाशिकचा पेच निर्माण झाल्याचे सूत्रांकडून समजते.

नाशिकच्या जागेवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असताना त्यांची उमेदवारी रोखून धरण्यात आली. याठिकाणी अचानक छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले. माळी-धनगर-वंजारी या ओबीसी समाजघटकातील तीन प्रमुख जातसमूहांचे संघटन करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न होता.

त्याचमुळे परभणीत महादेव जानकर, बीडमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाशिकमधून भुजबळ यांचे नाव पुढे आले. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला होता. तरीसुद्धा त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. उमेदवारीची शक्यता धूसर झाली तेव्हा स्वतः भुजबळ यांनीच माघार जाहीर केली. मात्र भुजबळ यांनी माघार घेतली तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्यावतीने आपण नाशिकवरील दावा सोडला नसल्याचे जाहीर करण्यात आले.

Manoj Jarange
Loksabha Election 2024 : उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपासणीचे वेळापत्रक जाहीर

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच अनेक पर्याची नावे पुढे येत होती. दरम्यानच्या काळात भुजबळ यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज घेऊन दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. शांतिगिरी महाराज यांनीही नाशिकमधून अर्ज भरला असून शिवसेनेची उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. हा पेच सोडवण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये जाऊन अनेकांशी चर्चा केली, त्यात भुजबळ यांचाही समावेश होता.

भाजपला एकीकडे ओबीसींचे संघटन करताना दुसरीकडे मराठा समाजाला दुखावण्याची भूमिकाही घ्यायची नव्हती. अशातच भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास आपण नाशिकमध्ये थेट त्यांच्याविरोधात प्रचार करण्याचा इशारा मनोज-जरांगे पाटील यांनी दिला होता. जरांगे यांच्या या इशा-यामुळे भुजबळ यांचे नाव मागे पडले.

जरांगेंच्या भीतीनेच भुजबळांची उमेदवारी मागे

भुजबळांना उमेदवारी दिली तरी ती सुरक्षित असल्याची महायुतीला खात्री नव्हती. तरीही महायुतीकडून धाडस केले जाणार होते. त्यामुळे जरांगे-पाटील यांच्या प्रचाराला घाबरण्याचे कारण नव्हते. परंतु जरांगे-पाटील यांनी एका मतदारसंघात जरी महायुतीच्या उमेदवाराविरोधात प्रचार केला, तरी संदेश संपूर्ण राज्यभर जाईल आणि त्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसेल या भीतीने भुजबळ यांची उमेदवारी मागे घेण्यात आली.

नाशिकचे मतदान पाचव्या टप्प्यात होणार असले तरी चौथ्या टप्प्यातील काही मतदारसंघांमध्येही मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसू शकला असता. भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी त्यांना नाशिकच्या जागेवर आपल्या पसंतीचा उमेदवार हवा आहे. त्याचमुळे तिथे पेच निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com