Lok Sabha 2024 : 'आंबेडकरी पक्ष एका बाजूला, समाज दुसऱ्या बाजूला'; ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांचं मत

भाजपकडून लोकशाहीलाच नख लावण्याचा प्रयत्न होतोय. समतेच्या चळवळींना खोडा घालून त्या अडचणीत आणल्या जात असल्याने भाजपपुरस्कृत महायुतीचा पराभव करणे हेच आंबेडकरी समाजापुढे ध्येय आहे.
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024eSakal

महाराष्ट्राच्या राजकारणात आंबेडकरी समाजाची भूमिका नेहमीच चर्चेत राहिली आहे. प्रमुख नेते वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि गटांमध्ये विभागले असताना आंबेडकरी समाजाची भूमिका काय असू शकते, यासंदर्भात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन जनशक्तीचे अध्यक्ष अर्जुन डांगळे यांची मुलाखत.

- संजीव भागवत

प्रश्न : आंबेडकरी समाजाची वर्तमानातील राजकीय भूमिका काय आहे?

उत्तर : यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आंबेडकरी राजकीय पक्ष, गट-तट एका बाजूला आहेत. आणि आंबेडकरी समाज दुस-या बाजूला उभा असल्याचे चित्र दिसते. पक्ष संघटना या आपले हितसंबंध जपण्यापुरता मर्यादित विचार करीत असल्याने आंबेडकरी समाजाने आपली राजकीय भूमिका वेगळी घेतलेली दिसते. भारतीय संविधान बदलण्यासाठी आणि ते संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

देशात हुकूमशाही लादली जात आहे. त्यामुळे फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांची जपणूक करणारा राज्यातील आंबेडकर समाज भाजप-महायुतीच्या विरोधात भूमिका घेतोय. भाजपकडून लोकशाहीलाच नख लावण्याचा प्रयत्न होतोय. समतेच्या चळवळींना खोडा घालून त्या अडचणीत आणल्या जात असल्याने भाजपपुरस्कृत महायुतीचा पराभव करणे हेच आंबेडकरी समाजापुढे ध्येय आहे.

प्रश्न : यावेळची निवडणूक ही संविधान वाचवण्यासाठीची लढाई असल्याचे म्हटले जाते, ते कितपत रास्त आहे?

उत्तर - पक्ष संघटना आणि राजकारणापुढे जाऊन आंबेडकरी समाजाने यावेळी भारतीय लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी भावनिक होऊन भूमिका घेतली आहे. देशात मनुवादी फॅसिझमची वाटचाल सुरू असून तिला रोखणे खूप महत्त्वाचे आहे. भाजपचे अनंतकुमार हेगडे नावाच्या नेत्याने संविधान बदलण्यासाठी आम्हाला चारशे खासदारांची गरज असल्याचे उघडपणे सांगितले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणाचा वापर करून त्यांना अडचणीत आणले जाते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देखील संकोच होतो. भाजप भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन त्यांना पाठबळ देते. त्यामुळे सध्याची ही लढाई केवळ भ्रष्टाचार विरोधातच नव्हे तर हुकूमशाही विरोधात लढाई आहे. भारतीय संविधान हा जीवनमार्ग आहे. मात्र त्यातील मूल्यव्यवस्था नष्ट करण्यासाठी भाजप प्रयत्न करते. यासाठीच जाती-धर्माचे राजकारण करून समाजामध्ये एक दूषित वातावरण निर्माण केले जात असल्याने या एकूणच प्रवृत्तीला पराभूत केले पाहिजे ही आंबेडकरी समाजाची यावेळीची भूमिका आहे.

प्रश्न : महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांमध्ये यावेळी फूट पडली...

उत्तर : भाजपवाले केंद्रातील सत्तेचा वापर करून कोणताही पक्ष फोडतात, भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेतात. महाराष्ट्रात यापूर्वी असे कधीही प्रकार घडले नाहीत ते भाजपकडून करण्यात आले. महाराष्ट्रातील जनता सुसंस्कृत आहे. ती प्रागतिक विचारधारा जपणारी आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे पक्ष फोडून भाजपाने आपली एक प्रवृत्ती महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणून दिली. त्या विरोधात जनतेच्या मनामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीत दिसून येईल.

प्रश्न : महाराष्ट्राच्या दृष्टीने ही निवडणूक किती महत्त्वाची आहे?

उत्तर : देशात आणि राज्यातही महागाई, बेरोजगारी कंत्राटीकरण आणि खाजगीकरण हे मुद्दे प्रचंड मोठे आहेत. आरक्षणाचे तत्त्व पायदळी तुडवून सरकारी नोकरभरती बंद केली जात आहे. अदानी-अंबानींसारख्या उद्योगपतींच्या घशात मुंबई घातली जात आहे. महाराष्ट्राला एकूणच कंगाल करण्याचा हा एक प्रयत्न होत असल्याने ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची देखील लढाई आहे. ती लढण्यासाठी यामध्ये केवळ आंबेडकरी जनताच नाही तर शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, बेरोजगार वंचित आदी सर्व घटकांचा देखील सहभाग असणार आहे.

प्रश्न : साहित्यिक, कलावंतांच्या राजकीय भूमिकेबद्दल काय सांगाल?

उत्तर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये साहित्यिक, लेखक, कलावंत तसेच विविध साहित्यिक, सांस्कृतिक संस्था एकत्र येत आहेत. विविध प्रकारच्या साहित्यिक, कलावंत मंडळांच्या बैठका सुरू आहेत. बहुसंख्य संस्था, मंडळे आणि जनतेने महायुतीच्या विरोधात स्वयंस्फूर्तीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी विचारवंत, साहित्यिक, कलावंत यावेळी आपली भूमिका बजावतील आणि या देशातील धर्मांधशक्ती आणि मनुवादीशक्तीला रोखतील असा विश्वास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com