Shirur Loksabha Constituency : प्रमुख आश्‍वासनांची पूर्तता : कोल्हे

‘‘मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महामार्गावरील बाह्यवळण रस्ते मार्गी लावणे, बैलगाडा शर्यती सुरू करणे, राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे मंजूर करणे, ही तीन प्रमुख आश्वासने मी दिली होती.
Shirur Loksabha Constituency
Shirur Loksabha Constituency sakal

नारायणगाव : ‘‘मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महामार्गावरील बाह्यवळण रस्ते मार्गी लावणे, बैलगाडा शर्यती सुरू करणे, राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे मंजूर करणे, ही तीन प्रमुख आश्वासने मी दिली होती. या तिन्ही आश्वासनांची पूर्तता करण्यात मी यशस्वी झालो आहे. त्यानुसार राजगुरुनगर, खेड घाट, मंचर, कळंब आणि नारायणगाव बायपासची कामे पूर्ण होऊन ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत, तर आळेफाटा बाह्यवळणाचे काम प्रगतिपथावर आहे. शेतकऱ्याचा आवाज संसदेत मांडला. त्यामुळे जनता माझ्यावर पुन्हा विश्‍वास ठेवून एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला पुन्हा दिल्लीच्या संसदेत पोहोचवतील,’’ असा विश्‍वास शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

आगामी पाच वर्षांत शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी काय कामे करणार आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आपले काय व्हीजन याबाबत डॉ. कोल्हे यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कोणतीही राजकीय पार्श्वभूमी, राजकीय अनुभव नसताना पहिल्याच टर्ममध्ये तीनवेळा संसदरत्न पुरस्कार, पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांमध्ये देशात तिसरा क्रमांक मला मिळाला. संसदेतील दोन वर्षे कोविडच्या संकटात गेली. अनेक मर्यादा आल्या तरीही शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडून त्यांची सोडवणूक करून घेतली. मतदारसंघातील पाच लाख नागरिकांना मोफत कोविड लसीकरण केले. कोविडसाठीच्या औषधांची किंमत १०३ रुपयांवरून ७५ रुपये इतकी कमी करून जनतेचे कोट्यवधी रुपये वाचवले. त्याचबरोबर रुग्णालयांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडर अशा विविध आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. परदेशात अडकलेल्या विद्यार्थी, नागरिकांना परत मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न केले. बेड उपलब्ध करून देणे, धान्यवाटप वैद्यकीय किट्स वाटप केले.

आरोग्य व्यवस्था सक्षम करणार

सरकारी आरोग्यव्यवस्था सक्षम व्हायला हवीच, पण त्याचबरोबर अत्याधुनिक उपचार सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात असायला हवेत, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून मांडलेल्या इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प तीनशे एकरावर साकारणार असून, यामध्ये २४ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, ६ मेडिकल कॉलेज,१ डायग्नॉस्टिक सेंटर असणार आहेत. चाकण एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांची कामगार विमा रुग्णालय बांधण्याची मागणी पूर्ण केली. लवकरच चाकण एमआयडीसीत ईएसआय कॉर्पोरेशनचे सुसज्ज रुग्णालय होणार आहे. वनौषधींचे जतन, संशोधन व संवर्धन करण्याबरोबरच वनौषधींवर प्रक्रिया व त्यातून स्थानिक तरुणांना रोजगारनिर्मिती हे उद्दिष्ट असलेल्या या प्रकल्पाचा डीपीआर केंद्रीय आयुष मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. इंद्रायणी मेडिसिटी, राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प, भक्ती-शक्ती कॉरिडॉर, अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे.

बिबट्याच्या प्रश्‍नासाठी पाठपुरावा

माझ्या मतदारसंघातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांत बिबट्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. बिबट प्रजनन रोखणे हाच त्यावरचा उपाय आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. केरळच्या धर्तीवर राज्य आपत्ती जाहीर करावी, ही मागणी सातत्याने करतोय. पण राज्य सरकार याकडे पूर्णतः डोळेझाक करत आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

ऐतिहासिक स्थळे जोडणारा कॉरिडॉर

शिवनेरी गडावर रोपवेचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लि. यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी ‘शिवसंस्कार सृष्टी’ उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही युगपुरुषांच्या जाज्वल्य पराक्रमाची व कर्तृत्वाची आठवण करून देणाऱ्या शिवजन्मस्थान शिवनेरी आणि शंभूतीर्थ असलेले वढू बुद्रुक या दोन्ही शक्तिस्थळांना जोडणारा ‘शिव-शंभू’ कॉरिडॉर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे डॉ कोल्हे यांनी सांगितले.

Shirur Loksabha Constituency
Shirur Loksabha Constituency : शिरूरसाठी व्‍हिजन;आढळराव पाटील

वाहतूक कोंडी सोडविणार

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर असून हा प्रकल्प शिरूर लोकसभा मतदारसंघाची भाग्यरेषा बदलणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘कॉम्प्रेसिव्ह मोबॅलिटी’चा विचार करून पुणे-नाशिक महामार्गाच्या प्रकल्पासह तब्बल १९ हजार ५०० कोटी रुपयांच्या पुणे-नाशिक, पुणे-नगर व तळेगाव चाकण-शिक्रापूर या मार्गावरील ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुणे मेट्रोचा विस्तार वाघोली आणि लोणी काळभोरपर्यंत करण्यासाठी पाठपुरावा केला आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com