INDIA: काँग्रेसला ‘नव्वद पार’ही पुरेसे? मोदींना खाली खेचण्यासाठी काय असेल इंडिया आघाडीचे संख्याबळाचे गणित

तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी सार्वत्रिक निवडणुकीतील निकालाकडे भारतीय जनता पक्षाऐवजी काँग्रेसच्या संभाव्य कामगिरीतून बघण्याची नवी दृष्टी दिली आहे.
congress tally loksabha
congress tally loksabhaesakal

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या चर्चेला केवळ भाजपकडून अपेक्षेच्या मोठ्या पात्रात उकळी दिली जात आहे. आता हे समीकरण उलटे करून ‘हरणाऱ्या’ पक्षाच्या कामगिरीबद्दल विचार केला तर?

तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी सार्वत्रिक निवडणुकीतील निकालाकडे भारतीय जनता पक्षाऐवजी काँग्रेसच्या संभाव्य कामगिरीतून बघण्याची नवी दृष्टी दिली आहे. एका सविस्तर मुलाखतीत रेड्डी म्हणतात की, पुढील सरकार बनवण्यासाठी त्यांच्या पक्षाला फक्त १२५ जागांची गरज आहे तर भाजपला किमान २५० जागा मिळवाव्या लागतील.

मला माहीत आहे आता तुमच्यापैकी बरेच जण काँग्रेस हा आकडा कसा गाठणार? असा प्रश्न विचारतील. त्यामुळे कृपया थोडा धीर धरा. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, काँग्रेसकडे मित्रपक्ष आणि या पक्षांचा भरवसाही आहे.

भाजपकडे हे दोन्हीही नाही. इतिहास असे सांगतो की खासदारांची १५० एवढी संख्या गाठणारा पक्ष देशात आघाडीचे सरकार स्थापन करू शकतो. २००४ च्या निवडणुकीत भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसने १४५ जागा जिंकल्या होता.

यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत आले कारण भाजपपेक्षा अधिक मित्रपक्ष काँग्रेस आघाडीत सामील होण्यास इच्छुक होते. त्यामुळे काँग्रेस १२५ हा आकडा कसा गाठेल? या प्रश्नाच्या उत्तरात सारे दडले आहे.

संख्याबळाचे गणित

मतमोजणीला तीन आठवड्यांचा कालावधी असताना भाजपमध्ये ज्या ‘नंबर’ची चर्चा सुरू आहे तो ३७० असू शकतो. जे मोदी यांचे प्रारंभीचे लक्ष्य होते. मित्रपक्षांच्या ३० जागांच्या बळावर चारशे पार जाणार, असे त्यांना वाटते.

मात्र, भाजपला २०-३० जागा कमी मिळाल्या वा २०१९ मधील ३०३ पेक्षा २०-३० कमी मिळाल्या तर भाजप २७२ च्या खाली जाऊ शकतो का? आता या समीकरणाकडे ‘हरणाऱ्या’ पक्षाच्या दृष्टिकोनातून बघू. देशभरात आजवरच्या सगळ्यात कमी म्हणजे केवळ ३२८ जागांवर काँग्रेस लढत आहे.

त्यामुळे निकालानंतर काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष राहण्याची शक्यता तशी कमीच आहे. २०१५ आणि २०१९ मध्ये काँग्रेसने अनुक्रमे ४४ आणि ५२ तर भाजपने २८२ आणि ३०३ जागा जिंकल्या. भाजपला जर ३०३ मध्ये भर घालायची असेल तर यातील बहुतांश जागा गैर-काँग्रेस पक्षांकडून याव्या लागतील. यात राष्ट्रवादी, शिवसेना,

आप, टीएमसी, बीआरएस, बीजेडी, डीएमके आणि आंध्रमधील वायएसआरसीपी यांचा समावेश असू शकतो. मात्र, २०१९ मध्ये काँग्रेसने या पक्षांच्या विरोधात ९२ टक्के जागा जिंकून कमाल केली आहे. त्यामुळे काँग्रेसकडे गमावण्यासारखे जवळजवळ काहीही नाही.

आता हे समीकरण उलटे करून बघू. भाजपऐवजी काँग्रेसकडे जिंकता येऊ शकेल असे काय आहे? उत्तरेत हिमाचल, उत्तराखंड, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात काँग्रेसला जवळपास प्रत्येक जागी भाजपने मात दिली आहे.

या राज्यांमध्ये लढविलेल्या एकूण २४१ जागांपैकी काँग्रेसला केवळ नऊ जागा जिंकता आल्या. त्यामुळे येथे गमावण्यासारखे आणखी काही नाही. त्यांनी जिंकलेल्या जागांपैकी बहुतांश ठिकाणी भाजप हा त्यांचा प्रतिस्पर्धी नव्हता.

उदाहरणार्थ केरळ आणि तमिळनाडू. यंदा काँग्रेस ३२८ जागांवर निवडणूक लढत असून, त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपच आहे. याचा अर्थ असा की नरेंद्र मोदी-भाजपचा अश्वमेध थांबवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षावर आहे.

म्हणूनच काँग्रेसने यातील कोणत्याही जागा जिंकल्यास भाजपच्या अंतिम संख्याबळावर त्याचा ताण येईल. भाजपचे संख्याबळ कमी करण्यासाठी जेव्हा ९० जागा पुरेशा ठरतात तेव्हा १२५ जागांची गरज नसते. कसे ते आता बघू.

समीकरण प्रत्यक्षात सरळ आहे. जर काँग्रेसची संख्या ८० च्या वर गेली तर भाजपला २०१९ च्या तुलनेत २५-३० जागांचा फटका बसेल. अर्थात ओडिशा, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि आंध्रमध्ये बिगर-काँग्रेस पक्षांकडून फायदा होईल, असे भाजप आणि त्याचे समर्थक म्हणतील आणि ते बरोबर असू शकेल.

याउलट ठाकरे, शरद पवार आणि तेजस्वी यादव यांच्याही पक्षांच्या भाजपवर काहीसा ताण आहे. यात युक्तिवादासाठी आपण सुरक्षितपणे म्हणू शकतो की ५२ च्या वर काँग्रेससाठी १० अतिरिक्त जागा म्हणजे भाजपसाठी १० कमी असतील. उदाहरणार्थ, काँग्रेसने ९० चा आकडा गाठला तर भाजपला २७२ च्या खाली ठेवण्याची चांगली संधी या पक्षाला आहे.

काँग्रेसच्या शंभर जागा राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देतील. हे असेच होईल किंवा होऊ शकते असे मी म्हणत नाही. भाजपला अतिरिक्त ३० जागा मिळून ते ३३० च्या वर गेल्यास पुढील सरकारच्या ताकदीवर काहीही फरक पडणार नाही.

मात्र, ३० कमी जागांचे ​अनेक मोठे परिणाम दिसतील. त्यासाठी काँग्रेसने किमान ३० किंवा आणखी काही जागा जोडल्या तरच हे होऊ शकते. ७० पेक्षा वरची काँग्रेसची प्रत्येक जागेत राजकारणात फेरसंतुलन स्थापन करण्याची शक्यता राखणारी राहील.

पक्षाचा दावा काहीही असला तरी हा मोठा प्रश्न आहे. कारण यापैकी बहुतेक ठिकाणी त्यांना भाजप, अधिक स्पष्टपणे सांगायचे तर मोदींना पराभूत करावे लागेल. २०१९ मधील मतांची तफावत बघता याची सुरुवात मोठ्या तुटीने होत आहे, हे स्पष्ट आहे.

अतिरिक्त ३० जागांसाठी काँग्रेसला संधी आहे ती २०१९ मध्ये ज्या राज्यांमध्ये पक्षाने आपले सर्वस्व गमावले वा आता सध्या राज्य सरकारांमध्ये जिथे काँग्रेसची युती आहे किंवा काँग्रेसचेच सरकार आहे त्या राज्यांमध्ये. यात कर्नाटक आणि तेलंगण प्रथम क्रमांकावर आहेत. जिथे काँग्रेसला अनुक्रमे २८ आणि १७ पैकी फक्त १ आणि ३ मिळाल्या होत्या.

नव्या मित्राची मदत निर्णायक

महाराष्ट्रात भाजपचे मित्रपक्ष तुटले आहेत आणि काँग्रेसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या रूपाने नवा मित्र मिळाला आहे. बिहारमध्ये भाजपचा मित्रपक्ष कमकुवत आहे आणि काँग्रेसला तेजस्वी यांच्या रूपाने अधिक बलवान सहकारी लाभला आहे.

झारखंडमध्ये पुन्हा सहयोगी घटक काम करू शकतो. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, दिल्ली, चंडीगड आणि हिमाचल प्रदेशात २२ पैकी काँग्रेसकडे सध्या फक्त एक जागा आहे. ५० टक्क्यांहून अधिक मतांसह भाजपने यापैकी एक वगळता सर्व जागी विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि आपची आता युती झाली आहे.

याचा विशेषत: हरियानामध्ये त्यांना फायदा होईल काय? या यादीवर पुन्हा नजर टाकली तर ३० किंवा त्याहून थोड्या अधिक जागा जोडणे काँग्रेससाठी अशक्य नाही. पण लक्षात ठेवा, ही शक्यता असल्याचे मी म्हटलेले नाही.

कारण मला माहीत आहे की काँग्रेस ५२ पेक्षा कमी जागा घेऊ शकते. भाजपचा अंतिम आकडा काँग्रेसच्या तुलनेत कमी मजेशीर राहील, असा अंदाज आहे. आता तुम्हाला समजेल की या निवडणुकीच्या निकालाबाबत रेवंथ रेड्डींनी दाखविलेला मार्ग वेगळा का आहे ते.

(अनुवाद : किशोर जामकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com