Losabha 2019 : दक्षिण भारतात 'युपीए'ची आघाडी

South Indian Political Leaders
South Indian Political Leaders

प्रादेशिक पक्षांना महत्त्व 
दक्षिण भारतातील राज्यांचा निवडणुकीचा बाजच निराळा आहे. उत्तर भारतात भाजपचा जोर असला, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता त्यांना फारसा शिरकाव करता आलेला नाही. दक्षिणेकडील बहुतेक राज्यांत प्रादेशिक पक्ष वरचष्मा टिकवून आहेत. देशपातळीवरील आघाडीच्या राजकारणात दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांनी गेल्या तीन दशकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

अटलबिहारी वाजपेयी यांचे तेरा महिन्यांचे सरकार अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी पाठिंबा मागे घेतल्याने एक मताने पडले. तर, द्रमुक नेत्यांची नावे स्पेक्‍ट्रमच्या कथित गैरव्यवहारात आल्यामुळे डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार अडचणीत सापडले. त्याचाच प्रचारात वापर करीत भाजप सत्तेवर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा काढून घेत तेलगू देशम एनडीएतून बाहेर पडला. आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करीत त्यांनी मोदी यांच्या सरकारविरुद्ध अविश्‍वास ठराव मांडला, तर याच मुद्द्यावर वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी लोकसभेचे राजीनामे दिले. 

दक्षिणेतील सर्व राज्यांत मिळून 130 जागा आहेत. तेथील प्रत्येक राज्यांत निवडणुकीचा पॅटर्न स्वतंत्र असून, त्यांचा परस्परांशी फारसा संबंध नाही. केरळात दरवेळी काँग्रेस व डाव्या पक्षांना आलटूनपालटून सत्ता मिळते. तमिळनाडूतही द्रमुक आणि अण्णा द्रमुक पक्षांत अशीच परिस्थिती आहे. 75 टक्के मते या दोन पक्षांतच विभागली जातात. आंध्र प्रदेशात पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, तीन दशकांपूर्वी त्यांच्याविरुद्ध चित्रपट अभिनेते एनटी रामाराव यांनी उठाव करीत तेलगू देशमची स्थापना केली व सत्ता मिळविली. आंध्र प्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांची निर्मिती झाल्यानंतर, काँग्रेसची ताकद क्षीण झाली, अन्‌ तेलगू देशम व वायएसआर काँग्रेस, तसेच तेलंगणा राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षांनी त्यांची जागा व्यापली. कर्नाटकात पूर्वी जनता पक्षाने काँग्रेसला टक्कर दिली, तर गेल्या दोन दशकांत भाजपने तेथे भक्कमरित्या पाय रोवले आहेत. 

आंध्रप्रदेश व तेलंगणातील मतदान झाले. तमिळनाडूतील 39 आणि पाँडेचरीतील निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. दोन दिवसांची या जागांबरोबरच कर्नाटकातील निम्म्या जागांसाठी 18 एप्रिलला मतदान होईल, तर कर्नाटकातील उर्वरीत 14 जागा आणि केरळातील सर्व वीस जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराचा शेवटचा आठवडा असल्यामुळे, तेथील प्रचार शिगेला पोहोचला आहे. 

तमिळनाडूत द्रमुकची आघाडी 
तमिळनाडूची जयललिता आणि करुणानिधी या दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे राज्यात पोकळी निर्माण झाली आहे. अण्णाद्रमुककडे राज्याची सत्ता असली, तरी मुख्यमंत्री ई पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची राज्याच्या राजकारणावर पकड बसलेली नाही. जयललिता यांच्या निकटवर्ती शशिकला यांचा भाचा टी. टी. दिनकरन यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्या तुलनेत द्रमुकमध्ये करूणानिधीनंतर पक्षाची सुत्रे त्यांचा मुलगा माजी उपमुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे आली. त्यांनी पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांना पाठिंबा देत काँग्रेसला नऊ जागा दिल्या. सीपीआय, सीपीएम यांनाही प्रत्येकी दोन जागा, तसेच चार स्थानिक पक्षांना सहा जागा देत द्रमुकची आघाडी भक्कम केली. तीसपेक्षाची अधिक जागा ही आघाडी जिंकेल, अशी सध्याची स्थिती आहे. 
अण्णाद्रमुक पक्षाने गेल्या निवडणुकीत 37 जागा जिंकल्या, तर एनडीएतील भाजप व पीएमके यांनी प्रत्येकी एक जागा मिळविली. या तीन पक्षांसह डीएमडीके व अन्य स्थानिक पक्षांची यंदा आघाडी आहे. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव पडण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. 

चित्रपट अभिनेते रजनीकांत व कमल हासन यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. कमल हासन यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव नाही. भाजप व काँग्रेस या पक्षांना अनुक्रमे तीन व चार टक्के मतदान होते. त्यांचा तमिळनाडूत फारसा प्रभाव नाही. यंदा मात्र येथील दोन मतदारसंघांत भाजप व काँग्रेसची थेट लढत आहे. कन्याकुमारीत भाजपच्या खासदाराविरुद्ध त्यांचे काँग्रेसचे गेल्या वेळचेच उमेदवार रिंगणात आहेत, तर शिवगंगा येथे काँग्रेसचे उमेदवार क्रांती चिदंबरम यांना भाजपने आव्हान दिले आहे. दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळेल, असा अंदाज आहे. पाँडेचरी या केंद्रशासित प्रदेशातही काँग्रेस विजयी होण्याची स्थितीत आहे. 

कर्नाटकात भाजप तुल्यबळ 
भाजपला 1998 पासूनच्या निवडणुकीत दरवेळी दक्षिणेकडील राज्यांत 18 ते 21 जागा मिळाल्या. त्यात गेल्या तीन निवडणुकीत कर्नाटकातच 17 ते 19 जागा मिळाल्या. राज्यात पाच वर्षांपूर्वी काँग्रेसने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली, तरी भाजपने लोकसभेला जास्त जागा मिळविल्या. गेल्या वर्षी राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस व जनता दल (सेक्‍युलर) यांच्या आघाडीने लोकसभेसाठी अनुक्रमे वीस व आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसच्या देशपातळीवरील 44 खासदारांमध्ये सर्वांधिक नऊ जागा कर्नाटकातील असल्याने काँग्रेसचे लोकसभेतील नेतेपद मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आले. मात्र, या दोन पक्षांतील कार्यकर्त्यांत समन्वयाचा अभाव आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 17, तर विरोधकांचे 11 खासदार होते. यावेळीही भाजपच्या खासदारांची संख्या फारशी घटणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. 

केरळात राहूल गांधी 
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने, केरळसह लगतच्या तमिळनाडू व कर्नाटकात त्याचे चांगले पडसाद उमटले. केरळात डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने 12, तर डाव्या आघाडीने आठ जागा जिंकल्या. यावेळी भाजपने तिरुअनंतपुरम या एका मतदारसंघात काँग्रेसचे शशी थरूर यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. केरळात काँग्रेस व डावी आघाडी यांना आलटून पालटून सत्ता मिळते. देशपातळीवरील वातावरण व राहूल गांधीची उपस्थिती यांमुळे काँग्रेसच्या जागा गेल्या वेळेपेक्षा वाढण्याची चिन्हे आहेत. 

आंध्रात प्रादेशिक पक्षांचा जोर 
आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देशम (टीडीपी) आणि जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्ष यांच्यात विधानसभेसाठी जोरदार लढत झाली. 77 टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुकीतही याच दोन पक्षांचा बोलबाला असेल. गेल्या निवडणुकीत भाजप व तेलगू देशमच्या आघाडीने 17 जागा जिंकल्या होत्या. मात्र, विशेष राज्याचा दर्जा देण्यावरून आघाडी तुटली. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत तेलगू देशमने काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र, त्यांचा जोरदार पराभव झाला. त्यामुळे, दोघेही स्वतंत्र लढत आहेत. यावेळी जगनमोहन रेड्डी बाजी मारतील, अशी चिन्हे दिसून येत आहेत. तरीदेखील लोकसभा निवडणुकीत या दोन प्रादेशिक पक्षांचेच खासदार निवडून येणार असून, राष्ट्रीय पक्षांना एखाददुसरी जागा मिळेल. त्यामुळे लोकसभेला त्रिशंकू स्थिती झाल्यास, या दोन्ही पक्षांना महत्त्व येणार आहे. त्याचमुळे रेड्डी यांनी काँग्रेससोबत वाद नसल्याचे नुकतेच स्पष्ट केले. 

तेलंगणात चंद्रशेखर राव यांचा दबदबा 
तेलंगणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) 70 टक्के जागा जिंकत राज्यात पुन्हा सत्ता मिळविली. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 17 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला दोन, भाजप व तत्कालिन मित्रपक्ष तेलगू देशमने प्रत्येकी एक, तसेच एमआयएम आणि वायएसआर काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. यावेळी अन्य पक्षांच्या जागा वाढण्याची शक्‍यता खूप कमी आहे. चंद्रशेखर राव यांनी देशात प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. एनडीएला बहुमताला जागा कमी पडल्यास, टीआरएसची त्यांना मदत होऊ शकते. 

दक्षिणेतील राज्यात गेल्या निवडणुकीत तेलगू देशममुळे एनडीएला 39 जागा मिळाल्या होत्या. त्या यंदा कमी होतील. द्रमुकच्या मदतीने युपीएच्या जागा दुपटीने वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या निवडणुकीत युपीएला 23, तर प्रादेशिक पक्षांना 68 जागा मिळाल्या होत्या. तमिळनाडू, कर्नाटक व केरळात युपीएमध्ये प्रादेशिक पक्ष असल्यामुळे, तसेच जयललिता यांच्या अनुपस्थितीमुळे अण्णाद्रमुकच्या जागा घटतील. त्यामुळे आंध्रप्रदेश व तेलंगणा वगळता प्रादेशिक पक्षांच्या स्वतंत्र जागा कमी असतील. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com