व्हायचं होतं 'किंग मेकर'; मग Exit Polls आले अन् सगळंच उध्वस्त झालं!

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मे 2019

- "टीआरएस'च्या तंबूत नैराश्‍य 
​- "किंगमेकर' बनण्याच्या इच्छेला कल चाचण्यांचा सुरुंग 

हैदराबाद: राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा एकदा सत्ता मिळण्याचा अंदाज जवळपास सर्वच कल चाचण्यांनी वर्तविल्याने भाजपेतर सरकारमध्ये "किंगमेकर'ची भूमिका बजाविण्याच्या तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) इच्छेला धक्का बसला आहे. 

निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याचा दावा करीत "टीआरएस'चे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी या परिस्थितीत आपला पक्ष सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा प्रचार केला होता. त्यांनी कॉंग्रेस आणि भाजपला वगळून प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, कल चाचण्यांमध्ये भाजप आघाडीला तीनशेच्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त झाल्याने राव यांच्या प्रयत्नांवर पाणी पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळेच पक्षाच्या गोटात निराशेचे वातावरण आहे.

राव यांनी या नव्या आघाडीची संकल्पना मांडत गेल्या वर्षीपासूनच द्रमुक, अण्णा द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षांच्या नेत्यांशी चर्चेला सुरवात केली होती. गेल्या महिन्यात त्यांच्या या प्रयत्नांना जोर आला होता. "एनडीए'ला बहुमत मिळेल, ही एक शक्‍यता वगळून त्यांनी इतर सर्व शक्‍यता आजमावत त्यानुसार डावपेच आखण्यास सुरवात केली होती. मात्र, ज्या शक्‍यतेकडे त्यांनी दुर्लक्ष केले, नेमकी तीच परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कल चाचण्यांनी वर्तविल्याने "टीआरएस'चे नेते खचले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा