Loksabha 2019 : रणरणत्या उन्हातही सहाव्या टप्प्यात 63 टक्के मतदान

वृत्तसंस्था
रविवार, 12 मे 2019

टक्केवारी (रात्री 8 पर्यंत) 
बिहार 59.4 
दिल्ली 59.1 
हरियाणा 64 
झारखंड 65.2 
मध्य प्रदेश 60.06 
उत्तर प्रदेश 54.00 
पश्‍चिम बंगाल 80.2

नवी दिल्ली ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज 59 जागांसाठी मतदान झाले. रात्री आठ वाजता मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दिल्लीसह सात राज्यांत या टप्प्यात 63.3 टक्के मतदानाची नोंद झाली. हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.2 टक्के मतदान झाले. मात्र, त्या राज्याची 2014 मधील या टप्प्यातील मतदान टक्केवारी 85 टक्के होती. 

यंदाच्या सातपैकी सहा टप्प्यांचे मतदान आज पार पडल्याने जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव मावळतीकडे झुकला आहे. यापुढच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात 19 मे रोजी होणाऱ्या मतदानात पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीसह 59 जागांवरील उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद होणार आहे. 23 मे रोजी देशाची सत्ता कोणाच्या हाती जाणार वा कायम राहणार, याचा निकाल जाहीर होणार आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्याप्रमाणेच आजही मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. झारग्राममध्ये तृणमूल कॉंग्रेसचा उमेदवार गोळीबारात जखमी झाला, तर बांकुरा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या गाडीवर बॉंबहल्ला झाल्याचा आरोप पक्षाने केला. तृणमूल कॉंग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीत हिंसाचाराचा कळस गाठल्याचा आरोप करीत भाजपने सायंकाळी निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले. शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर व माध्यमप्रमुख अनिल बलुनी यांनी निवडणूक आयुक्तांना निवेदन देऊन सातव्या टप्प्यात राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व केंद्रीय राखीव सशस्त्र दले सर्व ठिकाणी तैनात करावीत, अशी जोरदार मागणी केली. जावडेकर यांनी "सकाळ'ला सांगितले की, ममता बॅनर्जी यांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्या हिंसाचाराचा आधार घेत आहेत. मात्र, 1977 प्रमाणेच 2019 ची निवडणूकदेखील देशाची जनताच लढवीत आहे व त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीच पुन्हा सत्तेवर येणार आहे. 

आजच्या निवडणुकीत राधामोहन सिंह, हर्षवर्धन, मेनका गांधी या केंद्रीय मंत्र्यांसह सपचे प्रमुख अखिलेश यादव, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह व ज्योतिरादित्य शिंदे आदींच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, हरियाणा 10, बिहार व मध्य प्रदेश प्रत्येकी 8 आणि दिल्ली व झारखंडच्या प्रत्येकी सात जागांसाठी मतदान झाले. 979 उमेदवारांचे भवितव्य एक कोटी 17 लाखांहून जास्त मतदारांच्या हाती आहे. आजच्या टप्प्यासाठी आयोगाने 1 लाख 13 हजार मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती. सहावा टप्पा भाजपसाठी सत्त्वपरीक्षा होती. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपने या 59 पैकी तब्बल 45 जागांवर विजय मिळविला होता. तृणमूल कॉंग्रेसने 8, कॉंग्रेसने 2 व सप आणि लोकजनशक्ती पक्षाने प्रत्येकी एकेक जागा जिंकली होती. 

उत्तर व मध्य भारतातील कडाक्‍याच्या उष्णतेच्या लाटेमुळे आज सकाळपासून मतदानाची टक्केवारी कमी होती. मात्र, दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढू लागले. दिल्लीत सायंकाळी पाच वाजता मतदान टक्केवारी 59, वर तर बंगालमध्ये 80.2 वर पोचली होती. बिहार व हरियाणात 59.4, झारखंडमध्ये 65.2, मध्य प्रदेशात 60.7 व उत्तर प्रदेशात 54 टक्के मतदानाची नोंद झाली. 

टक्केवारी (रात्री 8 पर्यंत) 
बिहार 59.4 
दिल्ली 59.1 
हरियाणा 64 
झारखंड 65.2 
मध्य प्रदेश 60.06 
उत्तर प्रदेश 54.00 
पश्‍चिम बंगाल 80.2


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 63.48% voting in sixth phase of Loksabha 2019