अमित शहांनी लोकसभेसाठी 301 मतदारसंघांत घेतल्या प्रचारसभा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

भाजपसाठी सर्व काही 
301 एकूण मतदारसंघ 
1.51 लाख कि.मी. प्रचारासाठी कापलेले अंतर 
17,541 कि.मी. अध्यक्षीय काळातील दर महिन्यातील प्रवास 
1,542 2014पासूनचे राजकीय कार्यक्रम 
567 दिल्लीबाहेरील राजकीय कार्यक्रम 

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 543 मतदारसंघांपैकी तब्बल 301 मतदारसंघांत प्रचारसभा घेतल्या आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी जानेवारी महिन्यापासून 1.51 लाख किलोमीटर प्रवास केला आहे.

शहा यांच्या राजकीय कार्यक्रमामध्ये 2019मधील निवडणूक प्रचार महत्त्वपूर्ण ठरला आहे. शहा यांनी ऑगस्ट 2014मध्ये भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची सत्ता कायम राहण्यासाठी शहा यांनी तेव्हापासूनच कार्यक्रमांचा धडाका लावला होता. त्यांनी आतापर्यंत एक हजार 542 कार्यक्रम घेतले आहेत, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी सोमवारी दिली. भाजपचे अध्यक्ष या नात्याने शहा यांनी 10.17 लाख किलोमीटर एवढा प्रवास म्हणजेच प्रत्येक महिन्याला 17 हजार 541 किलोमीटर एवढा प्रवास केला आहे. 

शहा यांनी 2014 पासूनच्या एक हजार 542 राजकीय कार्यक्रमांपैकी 191 कार्यक्रम हे 2014-16 मध्ये झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांसाठी झाले. विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी 2017 मध्ये 188 आणि 2018मध्ये 349 कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला. यात लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारातही त्यांचा सहभाग आहे. 

निवडणूक प्रचाराव्यतिरिक्त पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शहा सतत प्रयत्नशील असतात. यासाठी दिल्लीबाहेरच्या 567 राजकीय कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली, तर अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तीन-चार वेळा त्यांनी देशभरात दौरे केले. त्यांच्या एकूण प्रवासापैकी 41 टक्के प्रवास हा पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमांसाठी झाला, तर 59 टक्के प्रवास निवडणुकांसाठी होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भाजपसाठी सर्व काही 
301 एकूण मतदारसंघ 
1.51 लाख कि.मी. प्रचारासाठी कापलेले अंतर 
17,541 कि.मी. अध्यक्षीय काळातील दर महिन्यातील प्रवास 
1,542 2014पासूनचे राजकीय कार्यक्रम 
567 दिल्लीबाहेरील राजकीय कार्यक्रम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah Get campaign for 301 Lok Sabha seats