Loksabha 2019 : मंचावरून बोलू न दिल्याने नेता रडला ढसाढसा...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

मंचावरून बोलू न दिल्यामुळे रडू कोसळल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

पलवर (हरियाणा): भारतीय जनता पक्षाने येथील औरंगाबाद गावात विजय संकल्प रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान मंचावरून बोलू न दिल्यामुळे भाजपचे माजी आमदार लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागले. अखेर, नेत्यांनी त्यांची समजूत काढली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राम रतन असे रडू कोसळलेल्या माजी आमदाराचे नाव आहे. होडल मतदारसंघातून भाजपचे ते माजी आमदार राहिले आहेत. मंचावरून बोलू न दिल्यामुळे रडू कोसळल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या कार्यक्रमात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरदेखील उपस्थित होते. माजी आमदार राम रतन लहान मुलाप्रमाणे बराच वेळ रडत होते. दुसरीकडे मंचावरुन इतर नेते लोकांना संबोधित करत होते. राम रतन यांना रडताना पाहून इतर भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढली आणि शांत केले. मात्र, पक्षाविरोधात आपली कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फरीदाबादमधील भाजप खासदार कृष्णपाल गुर्जर यांनी सुरुवातीला हा व्हिडीओ जुना असावा असे सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे ते म्हणाले, 'मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राम रतन यांची गळाभेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना इतका आदर दिल्यानेही भावूक झाले असावेत, यामधून त्यांना रडू कोसळले असेल. आनंदाच्या भरात असे होत असते. यावेळी त्यांचा मुलगा आणि नातू होता.'

दरम्यान, लोकसभा निवडणूकीदरम्यान देशभरातील अनेक नेते कार्यक्रमादरम्यान मंचावरून रडले आहेत. मंचावरून रडण्याची विविध कारणे सांगितली जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp former mla ram ratan from hodal haryana crying on stage