Loksabha 2019 : 'शहा'नीतीला उदित राजही वैतागले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

 भाजप दलितांना धोका देणार नाही, अशी मला आशा आहे.

नवी दिल्ली : एखाद्या खासदाराचे तिकीट कापायचे असेल, तर त्या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणाच लांबवत नेऊन त्यांचा अंत पाहणे व त्यांनी स्वतःहूनच शर्यतीतून बाहेर पडल्याचे जाहीर करण्यासाठी डावपेच खेळणे... डॉ. मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन या दिग्गज नेत्यांवर भाजपच्या नव्या नेतृत्वाने कथितरीत्या केलेल्या या यशस्वी प्रयोगाचा खेळ आता राजधानी दिल्लीतच रंगला. वायव्य दिल्लीतील खासदार डॉ. उदित राज यांचे तिकीट जाहीर न झाल्याने वैतागून त्यांनी 'भाजप दलितांना धोका देणार नाही, अशी मला आशा आहे,' असे संतप्त उद्‌गार काढले आहेत.

उदित राज यांनी सनदी सेवेचा राजीनामा देऊन "भारतीय न्याय पक्षा'ची स्थापना केली होती. मात्र, 2009 मध्ये ते पराभूत झाले. 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आपला पक्ष भाजपच्या दावणीला बांधला व मोदी लाटेत ते दिल्लीतून निवडूनही आले. मात्र, काही काळातच त्यांचा भाजपबद्दल भ्रमनिरास झाल्याचे सांगितले जाते. गेली किमान दोन वर्षे उदित राज सूचक विधाने करून पक्षाच्या नेतृत्वाला शाब्दिक आहेर देत होते. त्याच वेळी त्यांचे तिकीट कापले जाणार, याची कुणकूण त्यांना लागल्याची चर्चा होती. आता तिकीट वाटपाच्या अखेरच्या टप्प्यात ती चर्चा खरी होण्याची शक्‍यता बळावली आहे. कारण भाजपने या मतदारसंघांतील उमेदवाराची घोषणा करण्याचे सोमवारीही टाळले. त्यामुळेच राज यांनी विद्रोहाचा सूर काढला आहे.

राज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की अमित शहा यांच्याशी मी अनेदकदा बोलण्याचा प्रयत्न केला, मेसेज पाठविले. पंतप्रधानांचीही वेळ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला भेट मिळाली नाही. पक्ष विसर्जनानंतर माझे कोट्यवधी समर्थक आता बेचैन झाले आहेत. भाजप दलितांना धोका देणार नाही, अशी आशा मी करतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP rejected the senior leaders candidature