Loksabha 2019: 'भाजपला स्वबळावर 301 जागा मिळणार' 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

- लोकसभा निवडणुकीत भाजप स्वतःच्या बळावर 301 जागा जिंकेल
- बिहारमधील 40 पैकी 39 जागी रालोआचे उमेदवार विजयी होतील
- भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांचा दावा
- देशभरातील मोदी लाट आणि सर्व विरोधकांच्या विरोधात लाट असल्याचेही मत

पाटणा ः लोकसभा निवडणुकीत भाजप स्वतःच्या बळावर 301 जागा जिंकेल, तर बिहारमधील 40 पैकी 39 जागी राष्ट्रीय लोकशीही आघाडीचे (एनडीए) उमेदवार विजयी होतील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी रविवारी (ता.12) केला. देशभरातील मोदी लाट आणि सर्व विरोधकांच्या विरोधात लाट असल्याने भाजपला निर्विवाद यश मिळेल, असेही ते म्हणाले. 

हुसेन म्हणाले, "यंदा दशभरात मोदी लाट असल्याने आणि मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात सुरू झालेल्या विकासकामांमुळे जनता "एनडीए'च्या उमेदवारांना मत देत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी प्रभावी कारकीर्द पाहून आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पर्याय म्हणून 2014मध्ये लोकांनी मोदींना मत दिले होते. त्या वेळी मोदींनी 274 पेक्षा जास्त जागांवर भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले होते, मतदारांनी त्यांना 283 जागा मिळवून दिल्या होत्या.'' 

"यंदा मात्र भाजपला स्वबळावर 301 जागा मिळणार आहेत. बिहारमध्ये आम्ही (एनडीए) सुस्थितीत आहे. तेथे 40 पैकी 39 जागा मिळतील. गेल्या वेळच्या निवडणुकीत "जेडीयू' "एनडीए'चा भाग नव्हता. या वेळी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) पाठिंब्यामुळे बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी अतिशय बळकट झालेली आहे,'' असे हुसेन म्हणाले. 

हा तर भारताचा अपमान
'द टाइम' मासिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर "इंडियाज डिव्हाडर इन चीफ' या शीर्षकाने मुख्य लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याबाबत बोलताना हुसेन म्हणाले, की हा लेख पंतप्रधानांविरोधात लिहिला असल्याने हा देशाचा अपमान व अनादर आहे. कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी पंतप्रधानांविरोधात राबविलेली बदनामाची मोहीम व अपप्रचारामुळेच मूळ पाकिस्तानी असलेल्या या लेखकाचे मत अशा प्रकारे बनल्याचा आरोप त्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will win 301 Lok Sabha seats on its own says Shahnawaz Hussain