Loksabha 2019 : 'काँग्रेसमध्ये निष्ठावंतांपेक्षा गुंडांना दिले जाते प्राधान्य'

वृत्तसंस्था
बुधवार, 17 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे.

नवी दिल्ली: महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिले जात आहे, असे काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त करताना पक्षाला घरचा आहेर दिला आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे.

चतुर्वेदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मी पक्षासाठी टीकेचा सामना केला. दगड झेलले. मात्र, तरीही उलट पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्या दिल्या. जे लोक धमक्या देत होते, ते वाचले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. काही माणसं मेहनत करुन पक्षात आपलं स्थान निर्माण करतात. मात्र, त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींना पक्षात प्राधान्य दिलं जाते.' या संदर्भातले एक पत्रदेखील त्यांनी रिट्विट केले आहे.

दरम्यान, या पत्रामध्ये जो मजकूर आहे, त्यानुसार प्रियांका चतुर्वेदीच्या तक्रारीवरुन पक्षातील या नेत्यांचे निलंबन करण्यात आले होते. पण आता ज्योतिरादित्य सिंधियांच्या हस्तक्षेपानंतर या नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सिंधिया काँग्रेसचे सरचिटणीस असून त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राफेल डील संबंधी प्रियांका चतुर्वेदींची मथुरेमध्ये पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी त्यांच्या बरोबर गैरवर्तनाचा हा प्रकार घडला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Spokesperson Priyanka Chaturvedi slams party for reinstating workers