Loksabha 2019 : राहुल गांधींमुळे केरळात काँग्रेसमध्ये उत्साह

ज्ञानेश्‍वर बिजले 
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

वायनाड मतदारसंघातून राहूल गांधी यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने केरळात वातावरण काँग्रेसला आणखी अनुकूल झाले. हे एकमेव राज्य असे आहे, की तेथे मोदी यांच्यापेक्षा गांधी अधिक लोकप्रिय आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णयाचा केरळ आणि लगतच्या तमिळनाडू राज्यांवर मोठा परीणाम होणार आहे. देशातील सत्ताधारी भाजपला या दोन्ही राज्यांत फारसे स्थान नाही. तमिळनाडूत काँग्रेस व डीएमके यांची आघाडी झाल्याने, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला यंदा येथे मोठ्या प्रमाणात जागा मिळणार आहेत. 

भाजपने केरळमध्ये शिरकाव करण्याचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. शबरीमला मंदीरात महिलांना प्रवेश देण्याचा मुद्दा गेल्या वर्षी खूप तापला होता. भाजप व त्यांच्या पाठिराख्या संघटनांनी या प्रश्‍नावर आंदोलनाचा पवित्रा घेतला. तरीदेखील या राज्यात खरी लढत काँग्रेस आघाडी विरुद्ध डावी आघाडी अशीच आहे. या दोन्ही आघाड्यांतील पक्ष देशपातळीवर मात्र भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र आहेत. लगतच्या तमिळनाडूतही द्रमुकसोबत काँग्रेस व डावे पक्ष एकत्र लढत आहेत. 

भाजपने उत्तर भारतात विरोधकांना नामोहरम केले असले, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता अन्य राज्यात त्यांना फारसे स्थान मिळविता आले नाही. केरळमध्ये डावी आघाडी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यकर्त्यांनी भांडणे, हिंसाचार ही नित्याची बाब झाली आहे. त्या वातावरणात भाजप तेथे स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. 

काँग्रेसचा गेल्या लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाला असला, तरी केरळमध्ये त्यांना आठ जागा, तर त्यांच्या मित्रपक्षांना चार जागा मिळाल्या होत्या. या राज्यातील उर्वरीत आठ जागा डाव्या आघाडीला मिळाल्या. शबरीमला मंदीराचा विषय निवडणूक प्रचारात वापरण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. गेल्या वर्षी केरळात आलेल्या पुरामुळे प्रचंड हानी झाली. शेतीचे तीव्र झालेले प्रश्‍न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचे ठरणार आहेत. 

वायनाड मतदारसंघातून राहूल गांधी यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने केरळात वातावरण काँग्रेसला आणखी अनुकूल झाले. हे एकमेव राज्य असे आहे, की तेथे मोदी यांच्यापेक्षा गांधी अधिक लोकप्रिय आहेत, असे एका सर्वेक्षणात आढळून आले. काँग्रेसची सत्ता डाव्या आघाडीने 2016 मध्ये त्यांच्याकडे घेतली. मात्र, आता या राज्यात काँग्रेस आघाडीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज आहे. 

डाव्या आघाडीच्या हाती केरळ हे एकमेव राज्य उरले आहे. पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यातील डाव्यांची सत्ता संपुष्टात आली. विधानसभा निवडणुकीत 140 सदस्यांच्या सभागृहात डाव्या आघाडीचे 91 आमदार निवडून आले. राज्याची सत्ता त्यांच्या हाती आहे. तरीदेखील, त्यांना लोकसभेला जादा जागा मिळण्याची शक्‍यता कमी आहे. 

थरुर पुढे भाजपचे आव्हान
तिरुअनंतपूरम या एकमेव मतदारसंघात भाजपने उमेदवार के. राजशेखरन यांनी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. भाजपचे राज्यातील एकमेव आमदार ओ. राजगोपाल याच मतदारसंघातील आहेत. गेल्या निवडणुकीत ते थरूर यांच्याविरुद्ध वीस हजार मतांनी पराभूत झाले आहे. वायनाडनंतर या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरली आहे. या दोन्ही ठिकाणी सीपीआयचे उमेदवार आहेत. 

Web Title: Dnyaneshwar Bijale Writes about Kerala Election