Loksabha 2019 : साध्वी प्रज्ञासिंहांच्या विधानांमुळे भाजपची दिल्लीत पंचाईत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

- प्रज्ञासिंह ठाकूर यांचे हुतात्मा झालेल्या हेमंत करकरेंबद्दल अपशब्द
- दिल्लीत भाजपची स्थिती अवघडल्यासारखी
- भाजपवर आपल्याच उमेदवाराच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगण्याची वेळ

नवी दिल्ली: मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने दिल्लीत भाजपची स्थिती अवघडल्यासारखी झाली. "भाजप सर्व हुतात्म्यांचा सन्मान करतो,' अशा गुळमुळीत शब्दांत प्रतिक्रिया देणाऱ्या भाजपवर आपल्याच लोकसभा उमेदवाराच्या निंदनीय वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगण्याची वेळ आली. 

भोपाळमधून भाजपने उमेदवारी दिलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यामुळे दिल्लीत भाजपची विचित्र अवस्था झाली. कॉंग्रेसने या मुद्द्याचा वापर करून निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावल्याने आयोग काय कारवाई करणार, याकडे आता लक्ष लागले आहे. बॉंबस्फोट खटल्यातील एका आरोपीला संघाच्या दबावातून तिकीट द्यावे लागल्याचे सांगितले जाते.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भोपाळमध्ये बोलताना हुतात्मा करकरे यांच्याबद्दल अपशब्दांचा वर्षाव केला व त्यावरील प्रश्‍नांच्या फैरींना तोंड देणे दिल्लीतील भाजपचे सारे नेते-प्रवक्ते टाळत असल्याचे दिसले. अखेर पत्रकारांच्या फैरींना तोंड देण्यासाठी भाजपने शहानवाज हुसेन यांना पुढे केले. हुसेन यांनी प्रज्ञासिंह यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचे सूचकपणे सांगितले. ते म्हणाले, की देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सर्वांनाच आम्ही हुतात्मा मानतो. आम्ही त्यांच्या सर्वोच्च त्यागावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Sadhvi Pragya Singhs statement BJP facing Problem in delhi