भाजपच्या दणदणीत विजयाची ही घ्या पाच कारणं..!

Narendra Modi
Narendra Modi

लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशातील समस्त राजकीय विश्‍लेषक आणि विरोधी पक्षांचे अंदाज धुळीस मिळवित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. गेल्या निवडणुकीतील यश हे 'मोदी लाट' म्हणून गणले गेले होते आणि त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत अशी लाट नसल्याचेही ठासून सांगण्यात आले. पण गेल्या निवडणुकीपेक्षाही दणदणीत यश मिळवून भाजपने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. 

भाजप आणि एनडीए का जिंकले, याची ही प्रमुख पाच कारणे : 

1. पंतप्रधानपदाचा ठाम पर्याय 
गुजरातचे मुख्यमंत्रीपद आणि पाच वर्षे पंतप्रधानपद सांभाळून मोदी यांनी आपणच देशाच्या प्रमुखपदासाठीचा समर्थ पर्याय असल्याचे सिद्ध करून दाखविले होते. विरोधकांकडे असा कोणताही चेहरा नव्हता. राहुल गांधी यांना काँग्रेसवगळता एक-दोन मित्रपक्षांनीच पंतप्रधान म्हणून मान्यता दिली होती. खुद्द राहुल यांनीही कधीही उघडपणे पंतप्रधानपदासाठी तयारी दर्शविली नव्हती. याशिवाय, ममता बॅनर्जी, मायावती, मुलायमसिंह यादव हेदेखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येण्यासाठी उत्सुक होते. 

2. दुभंगलेले विरोधक 
कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस सरकारच्या शपथविधीच्या सोहळ्यात देशभरातील भाजपविरोधक एकाच मंचावर आले होते. त्यावेळी मोदींविरोधात देशात एकच आघाडी उभी करण्याच्या घोषणा झाल्या होत्या. अवघ्या काही महिन्यांतच त्या आघाडीला सुरुंग लागला. उत्तर प्रदेशमध्ये मायावती-अखिलेश यादव यांनी राहुल गांधी यांना बाजूला ठेवत आघाडी केली. केरळ आणि पश्‍चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस यांनीही हातमिळवणी केली नाही. मायावती यांनी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेससोबत जाण्यास नकार दिला. 

3. नकारात्मक विरोधक 
राहुल गांधी यांनी सुरवातीच्या टप्प्यात प्रचाराचा जोर 'चौकीदार चोर है'वर ठेवला होता. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप जनतेने फेटाळून लावला आहे. 'चौकीदार चोर है'च्या नकारात्मक प्रचाराचा फटका विरोधकांना जोरात बसला आहे. 

4. महिलांची साथ 
'स्वच्छ भारत'पासून 'उज्ज्वला योजने'पर्यंतच्या केंद्र सरकारच्या योजनेमुळे भाजप सरकारने महिलांची मते आपल्याकडे वळवून घेतली. या योजनांचा थेट फायदा महिलांपर्यंत पोचत असल्याने मतदारांमधील हा एक महत्त्वाचा घटक भाजपच्या बाजूने आला. याशिवाय, तोंडी तलाकच्या प्रश्‍नावर केंद्र सरकारने घेतलेली भूमिकाही भाजपच्या फायद्याची ठरली आहे. 

5. अचूक राजकीय व्यवस्थापन 
अमित शहा यांचे राजकीय व्यवस्थापन वाखाणण्याजोगे आहे. गेल्या निवडणुकीमध्ये सत्तेत दाखल झाल्यानंतर लगेचच भाजपने या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. 2014 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविला होता. यंदा त्याची पुनरावृत्ती होणे अवघड असल्याचे ओळखून चाणाक्ष शहा यांनी गेली किमान तीन वर्षे या जागा भरून काढण्याची तयारी केली होती. ईशान्य अणि पूर्वेकडील राज्यांवर लक्ष केंद्रीत करत भाजपने मतांची टक्केवारी वाढविण्यावर भर दिला. यंदा त्यांचे उत्तर प्रदेशमध्ये अपेक्षित नुकसान झाले नाही आणि त्याचमुळे त्यांनी 2014 पेक्षा चांगली कामगिरी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com