Loksabha 2019: '...म्हणून हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

सुरेंद्र नगर येथे आज (शुक्रवार) सभा घेत असताना व्यासपीठावर आलेल्या तरुण गुर्जरने हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी तरुण गुर्जरला पकडले व व्यासपीठावरच बेदम मारहाण केली.

अहमदाबाद (गुजरात) : पाटीदार समाज व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारसभेत त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे कानशिलात लगावली, अशी प्रतिक्रिया तरुण गुर्जर या हल्लेखोराने दिली.

सुरेंद्र नगर येथे आज (शुक्रवार) सभा घेत असताना व्यासपीठावर आलेल्या तरुण गुर्जरने हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी तरुण गुर्जरला पकडले व व्यासपीठावरच बेदम मारहाण केली. तरुण गुर्जरला दुखापत झाली असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान तरुण गुर्जर म्हणाला, 'हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरं जावे लागल्यामुळे कानशिलात लगावली. पहिल्यांदा पाटीदार आंदोलन झाले त्यावेळी माझी पत्नी गर्भवती होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच्या आंदोलनामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, मी तेव्हाच ठरवले होतं की या व्यक्तीला मी मारणार. मला कोणत्याही परिस्थितीत त्याला धडा शिकवायचा होता. अहमदाबाद आंदोलनानंतर जेव्हा मी माझ्या मुलासाठी औषध आणायला गेलो होतो, पण सगळं बंद झाले होते. त्याचा मनात येईल तेव्हा रस्ते बंद करतो, गुजरात बंद करतो. तो कोण आहे? तो काय गुजरातचा हिटलर आहे का? गेल्या तीन वर्षांपासून हार्दिक पटेल माझ्या निशाण्यावर होते. मी हुतात्मा होण्यासाठी तयार आहे.'

दरम्यान, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल यांनी 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हार्दिक निवडणूक लढवणार होते. पण 2015 मध्ये मेहसाणामध्ये दंगल घडवल्याप्रकरणी जुलै 2018 मध्ये सत्र न्यायालयाने हार्दिक पटेल यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत दोषी सिद्ध झाले होते. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. या प्रकरणात झालेली शिक्षा रद्द करावी, अशी मागणी करणारी हार्दिक पटेल यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे हार्दिक पटेल यंदा लोकसभा निवडणूक लढवू शकत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I had faced problems during Patidar agitation then I had decided to hit him says man who slapped Hardik Patel