Loksabha 2019 : देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय, हे सांगणारा भाजप कोण?: उर्मिला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मार्च 2019

देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावं' असे म्हटले जाते, मात्र हे प्रेम कुठे आहे? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?

मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्षावर टीका करायला सुरवात केली आहे. उर्मिला म्हणाली, 'युतीच्या सरकारनंतर देशात विकासापेक्षा हिंसक वातावरण वाढले आहे. देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावं' असे म्हटले जाते, मात्र हे प्रेम कुठे आहे? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे? विकासाची स्वप्न दाखवली गेली, मात्र प्रत्यक्षात परीकथा नसून पिशाच्चकथा झाली आहे. भाजपने जी आश्वासने दिली, तो काळा पैसा, नोकऱ्या कुठे गेल्या?'

'पिंजर', 'मैंने गांधी को नहीं मारा' यासारख्या चित्रपटातून मी सामाजिक विषय हाताळले आहेत. 'मैंने गांधी...' चित्रपटाच्या वेळी आठ वर्षांपूर्वी भाजप सरकार नव्हते, मात्र गांधीजींच्या विचारांना कसे मारले गेले, हे मी बोलले होते. महिलांचे प्रश्न, कर, बेरोजगारी, मराठी माणसांचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचे विषय आहेत. धर्म-जात याआधारे विचारले जाणारे प्रश्न बिनबुडाचे आहेत, व्यक्ती कोण आहे, ती काय बोलते, हे महत्वाचे आहे. निवडणुकांमध्ये प्रचार करुन विचारसारणी लोकांपर्यंत पोहचवणार आहे, असेही उर्मिला म्हणाली.

माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या असून, फक्त निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे उर्मिला म्हणाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Urmila Matondkar slams BJP after joining congress