Loksabha 2019 : बिहारचा लेनिन - जगदेव प्रसाद

प्रकाश अकोलकर
मंगळवार, 7 मे 2019

लालूप्रसाद बाहेर असते तर...
महाआघाडीत सारेच काही आलबेल नाही. राहुल यांच्या सभांना जाण्याचे तेजस्वी यादव टाळत आहेत, असा समज तमाम बिहारमध्ये पसरला आहे. मात्र, एकच विचार सर्वत्र पोचायला हवा, म्हणूनच वेगवेगळ्या आणि स्वतंत्र सभा होत आहेत, असे ‘राजद’चे संजय यादव यांनी सांगितले. मूळ प्रश्‍न हा आहे की लालूप्रसाद बाहेर असते (म्हणजेच गजाआड नसते) तर चित्र वेगळेच दिसले असते, यात मात्र शंका नाही.

अवघ्या पाच दशकांपूर्वीपर्यंत डाव्या विचारांचे बऱ्यापैकी प्राबल्य असलेला बिहार आजमितीला नरेंद्र मोदी तसेच नितीश कुमार यांच्या प्रभावाखाली कसा गेला, याची ही कहाणी आहे. डॉ. राममनोहर लोहिया यांनी १९६७ मधील निवडणुकांमध्ये प्रखर काँग्रेसविरोधापोटी केलेल्या आघाड्यांत जनसंघाला सामावून घेतले, तेव्हा जगदेव प्रसाद नावाच्या एका समाजवादी कार्यकर्त्याने डाव्या विचारांवरील प्रखर श्रद्धेपोटी काँग्रेसबरोबर जाणे पसंत केले. ‘प्रसोपा ने बांधी गांठ, पिछडा पावे सौ मे साठ!’ अशी घोषणा दिली, तेव्हा जगदेव प्रसाद यांनी ‘शोषित समाज दल’ नावाने नवा पक्ष काढला आणि ‘...पिछडा पावे सौ में नब्बे!’ असे प्रत्युत्तर दिले.

सामाजिक न्याय, समता, तसेच धर्मनिरपेक्षता यांची सांगड घालणारे जगदेव प्रसाद हे केवळ बिहारमधीलच नव्हे, तर देशभरातील पहिले नेते होते, असे आजही सांगितले जाते. त्यांची डाव्या विचारांवरील श्रद्धा इतकी अतूट होती, की त्यांना ‘बिहारचा लेनिन!’ म्हणूनच ओळखले जायचे. 

आता हे सारे वातावरण आरपार बदलून गेले आहे. डाव्या चळवळी थंडावल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांत कोणासाठीच कसलेही आंदोलन या कम्युनिस्ट पक्षाने केलेले नाही. जगदेव प्रसाद हे कुशवाह समाजातील होते आणि अवघ्या चार वर्षांपूर्वी मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामील झालेले उपेन्द्र कुशवाह हे आपल्या ‘राष्ट्रीय लोक समता पक्षा’सह महाआघाडीबरोबर असले, तरी त्याचा फारसा फायदा या आघाडीस होणार नाही; कारण हे सारे संधिसाधू लोक आहेत, हे बिहारच्या जनतेला समजून चुकले आहे, असा दावा  बिहार प्रदेश भारतीय जनता दलाच्या कार्यालयात बसलेले प्रवक्‍ते डॉ. निखिल आनंद सांगत होते. हे सारे दावे अर्थातच राष्ट्रीय जनता दलाचे महासचिव संजय यादव यांनी खोडून काढले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Bihar Narendra Modi Jagdev Prasad Politics