Loksabha 2019 : देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? हे बघा

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 18 मे 2019

देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी..

देशाच्या राजकारणात महाराष्ट्र कुठंय? या प्रश्‍नाला विविध पक्षांत कार्यरत मराठी नेतृत्वाने, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे ते आपल्या कृतिशीलतेने. विविध राज्यांत ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याविषयी...

महाराष्ट्र ही कार्यकर्त्यांची खाण आहे, असे महात्मा गांधींनी नमूद केले होते. समाजकारणाविषयीचे गांधीजींचे वचन आज राजकारणाबाबतही खरे ठरते आहे. महाराष्ट्रातील नेते लोकसभा निवडणुकीत अन्य राज्यांतील घडामोडींचे सारथ्य करीत आहेत. 

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे राष्ट्रीय स्तरावरील पक्ष. या दोन्हीही पक्षांनी देशातल्या प्रत्येक राज्यात निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्या त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षसूत्रात बांधण्याची महत्त्वाची कामगिरी महाराष्ट्रात नावारूपाला आलेले नेते, कार्यकर्ते करीत आहेत. २०१४ मध्ये भाजपच्या पदरात १०० टक्‍के जागांचे माप टाकणारी हिंदीभाषक भागातील राजस्थान आणि मध्य प्रदेश ही महत्वाची राज्ये. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर राजस्थानची जबाबदारी सांभाळत आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव भाजपच्या वाट्याला आला. राज्य भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे ते कार्यक्षेत्र. 

काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांतही मराठी आणि महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश आहे. मुकुल वासनिक सातत्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समवेत असतात. युवक काँग्रेसचे अध्यक्ष या पदावर असताना राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे असणारे अन्‌ आताही काँग्रेसमध्ये अध्यक्षांच्या घनिष्ट संबंधात असणारे राजीव सातव यांच्यावर गुजरातची जबाबदारी आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे राज्य. तेथे भाजपला विधानसभा निवडणुकीत आव्हान देण्याची जबाबदारी सातव यांनी नेटाने पार पाडली. आताही गुजरातेत उत्तम कामगिरीची अपेक्षा केली जाते आहे. 

हर्षवर्धन सपकाळ आणि वर्षा गायकवाड हे तरुण आमदार मध्य प्रदेशात सक्रिय आहेत. अविनाश पांडे हे मूळ नागपूरचे. ते निष्ठावंत काँग्रेसी. इंदिरा गांधींच्या पाठोपाठ त्यांचे सोनिया गांधींशीही उत्तम संबंध. त्यांच्यावर राजस्थानात कमळ फुलू न देण्याची जबाबदारी आहे. अविनाश पांडे यांच्या गावपातळीवरील व्यवस्थापनामुळेच विधानसभेत काँग्रेसला संधी मिळाली होती. आताही त्यांच्याकडे बूथ पातळीवरील समन्वयापासून सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. भाजपसाठी प्रकाश जावडेकर आणि काँग्रेससाठी अविनाश पांडे राजस्थान सांभाळत होतो. दोघेही महाराष्ट्रातले. जावडेकर पुण्याचे अन्‌ अविनाश पांडे नागपूरचे एवढाच काय तो फरक. 

कल्याणचे संजय दत्त हे गांधी घराण्याच्या निकटचे. त्यांच्यावर तमिळनाडू आणि नंतर हिमाचल प्रदेशची मदार आहे. रजनीताई पाटील हिमाचलच्या प्रभारी आहेतच. महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांची रसद देशभर पोचवली जाते आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भूपृष्ठविकास मंत्री नितीन गडकरी आज राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू प्रचारात सक्रिय आहेतच. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सभांनाही सर्वत्र मागणी आहे. एकूण काय मराठी पाउल (राजकारणात) पुढे पडते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 India Politics Maharashtra