Loksabha 2019 : उत्तर प्रदेशात 'मोदी फॅक्टर' तारणार?

शरत प्रधान
मंगळवार, 21 मे 2019

तो पराभव ठरेल
‘एक्‍झिट पोल’च्या दाव्यांनुसार केंद्रात भाजपच सत्तेवर येईल. उत्तर प्रदेशात पक्षाला चांगले यश मिळेल. काहींच्या मते भाजपला ६० जागाही मिळू शकतात. हे खरे मानले, तर भाजपला हटविण्यासाठी एकत्र आलेल्या ‘महागठबंधना’चा तो पराभव ठरेल, हे निश्‍चित.

दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे. 

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात टाकून मोदींच्या दिल्ली विजयाचा मार्ग सुकर केला होता. यंदाही मोदींची जादू चालेल आणि भाजपला जास्त जागा मिळतील, असा विश्‍वास सर्वसामान्यांना वाटतो. मात्र, गेली २५ वर्षे एकमेकांचे शत्रू असलेल्या आणि आता एकत्र आलेल्या समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाचे ‘महागटबंधन’ हा मोदींच्या मार्गातील यंदाचा मोठा अडथळा आहे. त्यावर भाजपने आणि मोदींनीही राजकारणाच्या ध्रुवीकरणाची खेळी केली. गेल्या निवडणुकीत असेच होऊन भाजपला यश लाभले होते. 

हे सगळे असले, तरी २०१४ च्या निवडणुकीत मोदींनी दिलेल्या आश्‍वासनांचे काय, हा प्रश्‍न उरतोच. त्यातच २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून भाकड गुरांचा वाढलेला प्रश्‍न हाही ऐरणीवरचा मुद्दा आहे. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. ही भटकी जनावरे शेतांत घुसून पिके फस्त करत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. गावांमध्ये हा प्रश्‍न तीव्र झाला आहे. आदित्यनाथांच्या गो-प्रेमामुळे अनेक ठिकाणी जमावाकडून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. ‘छोट्या शेतकऱ्यांकडे थोडीशी जमीन असते आणि त्यातून जेमतेम कुटुंबाला पुरेल एवढे पीक मिळते. भाकड गाई सोडून देण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे पिके फस्त होत आहेत,’ अशी तक्रार राधेलाल या शेतकऱ्याने केली. 

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि रोजगारनिर्मितीची आश्‍वासने पूर्ण करण्यात मोदींना अपयश आल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे; पण तरीही मोदींना पंतप्रधानपदाची दुसरी संधी देण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्रिपदी नकोत, असेही ते म्हणतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Result Uttar Pradesh Modi Factor Politics