Loksabha 2019 : ‘अंडरग्राउंड’ सोशल आर्मी

BJP
BJP

भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालय ‘६ डीडीयू मार्ग’ येथे स्थलांतरित झाल्यावर ११, अशोका रस्त्यावरील जुन्या मुख्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. हेच भाजपच्या पथ्यावर पडले. मोदी-शहा जोडीने येथेच २०१९ ची वॉर रूम बनवण्याचे मागच्याच वर्षी ठरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ पक्षाच्या या वॉर रूमला अहोरात्र चालणाऱ्या धगधगत्या यज्ञकुंडाचे स्वरूप आलंय. अशोक रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना भाजपच्या या कार्यालयात काय चाललंय याची यत्किंचितही कल्पना येत नाही, इतके इथले काम ‘अंडरग्राउंड’ स्वरूपाने चालते. पूर्वीच्या दोन निवडणुकांत ज्या तुघलक रस्त्यावर भाजपची वॉर रूम होती, ते अनंतकुमार आता नाहीत. पण तेव्हाची आणि आताची भाजपची वॉर रूम यातही प्रचंड अंतर जाणवते. आता इथे ‘बाहेरच्या’ कोणालाही प्रवेशच नाही.

इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे, नंतर सोशल मीडियासह नव माध्यमांची नेमकी ताकद ओळखणारा भाजप देशातला पहिला राष्ट्रीय पक्ष मानावा लागेल. ‘आयटी’ शक्ती असल्याचे संघटनमंत्री रामलाल पूर्वीपासून सांगत. १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा निवडल्या, त्याच वर्षी स्थापलेल्या भाजपने पहिल्यापासूनच नवमाध्यमांची ताकद ओळखली. ही माध्यमे प्रचाराचे, लोकांशी थेट भिडण्याचे सशक्त माध्यम असल्याचे ओळखले. १९९० च्या दशकात दूरचित्रवाणीवर पक्षप्रवक्ते पाठवणारा पहिला पक्ष भाजप ठरला. दिवंगत प्रमोद महाजनांच्या कल्पक नजरेने याची ताकद ताडली. नवीन मुख्यालय आणि नवीन महाराष्ट्र सदन याच्या जागा ज्यांनी धडाकेबाजपणे राज्याच्या व पक्षाच्या पदरात पाडून घेतल्या त्याच नितीन गडकरींच्या काळात, २००७-०८ मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पहिला आय टी सेल स्थापन झाला.

तत्कालीन अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या हस्ते ८ एप्रिल २००६ रोजी भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेलचे उद्‌घाटन झाले. लगेचच दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रासह निवडक राज्यांत त्यांची स्थापन झाली. २००८ मध्ये देशातील चार-पाच राज्यांत आयटी सेल प्रमुख नेमून त्यांची बैठक दिल्लीत घेतली. यात विनीत गोयंका (महाराष्ट्र), प्रद्युत बोरा, सुनील पाल, शिशीर सहानी (दिल्ली), के. चंद्रकांत (कर्नाटक), यादव (गुजरात), आर. रमण (तमिळनाडू) यांच्यावर विविध राज्यांची जबाबदारी आली. मात्र मोदींच्या नेतृत्वाखालील गुजरात आणि गडकरींच्या महाराष्ट्राने मोठी आघाडी घेत दिल्लीलाही दिशादर्शन केले. २००८ च्या नवरात्रीत नागपुरातील गडकरी वाड्यातून गडकरींनी भाजपच्या राज्यभरातील शहाराध्यक्षांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केले. त्याच्या संचालनात गोयंका आघाडीवर होते. २००८ मधे ‘बीजेपी, ओआरजी’ हे संकेतस्थळ स्थापन झाले.

बळ डेटा बॅंकेचे
२०१३ पासून भाजपच्या आयटी सेलने मोठी झेप घेतली. योगी आदित्यनाथ ऊर्फ ठाकूर अजयसिंह बिश्‍त यांचे वर्तमान समाज माध्यम सल्लागार असलेले संजय सिंह, गोयंका, अमरेश माडीवाल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आयटी संयोजन समितीने देशातील गावागावांतून सरकारी योजनांबाबतचा मोठा डेटा जमा केला. तो पाच वर्षांत मोदी सरकारसाठी शिदोरीसारखा उपयुक्त ठरला. २०१४ मध्ये शहा पक्षाध्यक्ष झाल्यावर त्यांनी आयटी सेलला लोकाभिमुख बनवले. अमित मालवीयांच्या नेतृत्वाखालील सध्याची वॉर रूम आणि त्यात काम करणारे २५० ते ३०० तरुण आयटी प्रोफेशनल्स भाजपच्या राज्याराज्यांतील आयटी सेलना मिनिटा-मिनिटाला दिल्लीतून दिशादर्शन करतात. मोदी-शहांच्या वेगळ्या सोशल मीडिया टीम्स आहेतच. पण अशोका रस्त्यावरूनही त्यांना मोलाची मदत होते. भाजपच्याच नव्हे; तर विरोधी नेत्यांच्याही भाषणाचा बारकाईने अभ्यास, पक्षनेतृत्वासाठी भाषणांचे मुद्दे काढणे, मंत्री व पक्षप्रवक्‍त्यांना संदर्भ तात्काळ देणे, देशभरातील सोशल मीडियावर मोदी व भाजपबद्दल जे जे प्रसारित होते, त्या क्षणाक्षणाच्या माहितीवर बारीक नजर यासाठी राष्ट्रीय व राज्य वॉर रूम्स आहेतच; मात्र त्यांना देशभरातील १० लाख सदस्यांची टीम वेळोवेळी मदत करते. यात राज्याराज्यांतील ज्येष्ठ पत्रकारही आहेत. निवृत्त पत्रकारांना जाळ्यात ओढण्याची कला भाजपइतकी कोणालाच अवगत नसावी! महिला आघाडी, अल्पसंख्याक आघाडी याप्रमाणे भाजपमध्ये आता फेसबुक आघाडी, व्हॉटस्‌ॲप आघाडीदेखील कार्यरत आहेत.

बारीकसारीक, तपशीलवर माहिती
दिल्लीच्या वॉर रूमचे काम २४ तास अखंड चालू असते. राज्याराज्यांतून माहितीचा महापूर येतो. तेवढीच माहिती येथूनही पुरवली जाते. नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथसिंह, जेटली, स्वराज आदींच्या सभा-बैठका ज्या-ज्या राज्यांत असतील तेथील राज्य वॉर रूमला दिल्लीहून रसद मिळते. काँग्रेस, प्रादेशिक पक्षांचे किमान दशकभरातले जाहीरनामे येथे आहेत. अगदी मोदींच्या सभा होणाऱ्या राज्यांत हवामानाचा अंदाज कसा असेल, सभेसाठी काय काळजी घ्यावी याचीही माहिती वॉररूममध्ये संकलित होते.

विरोधकाचा एखादा नेता मूर्खासारखा बोलला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून सोशल मीडियावरील मजकूर, विनोद यांची पेरणीही येथून होते. विविध नेत्यांना इनपुट देण्याचे कामही होते. प्रचाराची रणधुमाळी असताना... आहुती बाकी यज्ञ अधुरा, याच भावनेने भाजपच्या प्रचारासाठीची सामग्री याच वॉर रूममध्ये तयार करून, पुरविली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com