Loksabha 2019 : ‘रिअल टाइम’ युद्धभूमी

अजय बुवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

सोशल मीडिया, डिजिटल यंत्रणा आणि त्याद्वारे येणारा माहितीचा खजिना वापरून प्रचार यंत्रणा, मोहिमा राबविण्यात भाजपचा हातखंडा आहे. काहीसे मागे पडलेल्या काँग्रेसनेही यात मुसंडी मारली आहे. देशभर नेत्यांचे दौरे, सभा, रॅलीने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघालेले असताना देशाची राजधानी दिल्लीत या दोन्हीही पक्षांच्या वॉररूम त्यासाठी प्रचार दारूगोळा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, टीकास्त्रे पुरविणे, बचावाच्या ढाली बनविणे आणि विविध अनुभवांतून नवीन प्रचार नीती बनविणे आणि यंत्रणा सज्ज ठेवण्याचे कार्य करीत आहे. त्याविषयी...

देशावर सहा दशके अधिराज्य गाजवूनही मागील लोकसभा निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस जागांवर घसरल्याचे शल्य काँग्रेसमध्ये खोलवर रुतले होते.

गुजरातच्या निवडणुकीतून संघर्षासाठी धैर्य वाढले. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लढाईमधील विजयाने ते द्विगुणित झाले. आताची लोकसभा निवडणूक युद्धासारखी लढण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. त्यासाठी पक्षाने युद्धभूमीही सुसज्ज केली. ही युद्ध भूमी म्हणजे ‘१५ जीआरजी’ ऊर्फ ‘काँग्रेस वॉररूम’. म्हणजेच, दिल्लीतल्या गुरुद्वारा रकाबगंज मार्गावरील १५ क्रमांकाचा बंगला.

‘यूपीए’ सरकारच्या काळापासूनच काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकांचे केंद्रस्थानी राहिलेले हे ठिकाण आता ‘वॉररूम’ बनलेय. उपाध्यक्ष ते अध्यक्षपद हा राहुल गांधींचा प्रवास आणि संघटनात्मक स्थित्यंतरेदेखील येथेच घडली. नेत्यांच्या अनौपचारिक चर्चा, राज्यनिहाय आढावा बैठका, निवडणुकीचे उमेदवार ठरविण्यासाठी छाननी समित्यांच्या बैठकांचे ठिकाणही हेच होते. अपवाद फक्त सोनिया गांधी, डॉ. मनमोहनसिंग या नेत्यांच्या समावेशाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकींचा. मागील लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांचे व्यवस्थापन, राहुल आणि प्रमुख प्रचारकांचे दौरे ठरविणे, या नियोजनाचा केंद्रबिंदू ‘१५ जीआरजी’च होते. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव, आताचे खजिनदार अहमद पटेल, जयराम रमेश ही मंडळी या नियोजनावर लक्ष ठेवून होती.

जुन्यांचा अनुभव, नव्यांचा दम
यंदाच्या निवडणुकीत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची जोड मिळणार आहे. निवडणुकीच्या रणनीतीत जुन्यांचा अनुभव, नव्यांचा ताजा दम, यांची सांगड घालताना काँग्रेसने या वेळी विशेष भर दिलाय तो सोशल मीडियावर. त्याच्या बळावर पक्षाची ताकद वाढविण्याची व्यूहरचना आहे. सोशल मीडिया पूर्णपणे दिव्य स्पंदना यांची टीम हाताळते. त्याचा अहवाल राहुल गांधींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी निखिल अल्वांच्या टीमकडे असल्याचे कळते. प्रियांकांचेही स्वतंत्र कार्यालय येथे आहे.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा चाणाक्षपणे वापर केला होता (खरेतर याचे पहिले श्रेय जाते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या ‘आप’कडे). या वेळी कोणतीही जोखीम पत्करायची नाही, असा प्रयत्न काँग्रेसचा आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये या माध्यमांची ताकद आणि त्याचे फायदे काँग्रेसने अनुभवलेत. राहुल गांधींचे ट्‌विटरवर आगमन आणि त्यातून रोजच भाजप नेतृत्वाला खिंडीत पकडणारे मुद्दे, चर्चा, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरणे, हा नियोजनाचाच भाग होता. आता निवडणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर आणि माहिती विश्‍लेषणातून सूक्ष्म पातळीवर प्रचाराचे, मतदारांना आकर्षित करण्याचे ‘नालिसीस’चे काम देशपातळीवर होणार असल्याने काँग्रेसच्या ‘हायटेक वॉररूम’मध्ये राज्यनिहाय कक्षदेखील आहेत.

मोदी, भाजपवर करडी नजर
भाजपचा प्रचार मोदींभोवतीच आहे. सहाजिकच, काँग्रेसची सोशल मीडिया मॅनेजर मंडळीदेखील त्यांनाच लक्ष्य करते. मोदींची आताची भाषणे, जुन्या भाषणांमधील ठळक मुद्दे, त्यातील विरोधाभास, केंद्रीय आणि राज्य नेत्यांची वक्तव्ये, आश्‍वासने आणि प्रत्यक्ष कार्यवाहीतील तफावत, याकडे लक्ष वेधणारे व्हॉट्‌सॲप संदेश, चित्रफिती, खिल्ली उडविणारे संदेश म्हणजेच मिम्स बनविण्यासाठी पथकच कामाला आहे. याखेरीज केंद्र, राज्य, प्रदेश आणि मतदारसंघनिहाय आपल्या तसेच स्पर्धकांच्या प्रचाराच्या मुद्द्यांचे विश्‍लेषण, नव्या तपशिलांची जोड, उमेदवारांना आणि प्रचारार्थी नेत्यांना प्रचाराचा मसाला पुरविणे, यासाठी सोशल मीडिया तज्ज्ञ आणि स्वयंसेवकांची फौज आहे. यात व्हॉट्‌सॲप ग्रुप बनविणे, टार्गेटेड मतदारांपर्यंत म्हणणे पोहचवणे, टीव्ही, रेडिओ, होर्डिंग्ज सोबतच ट्विट, फेसबुक व्हिडिओ संदेशांचा मारा ही वॉररूमवर जबाबदारी आहे.

प्रचारसाहित्यातून आचारसंहिताभंगाचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी कायदेशीर सल्लागारांचीही फौज आहे. जिल्हा, मतदारसंघांपर्यंतही छोटेखानी वॉररूम बनविण्यातही कसर ठेवलेली नाही.

घर घर काँग्रेस
काँग्रेसशी मतदारांना जोडण्यासाठी ‘घर घर काँग्रेस’ ॲप बनवलेय. दिवसाला किती मतदारांशी, घरांशी संपर्क साधला, याचा दैनंदिन तपशील त्याद्वारे वॉररूममध्ये मिळतो. मतदात्याचा मोबाईल क्रमांकही मिळविणे आवश्‍यक आहे. सोशल मीडियावर हॅशटॅग ठरविणे, आयत्या वेळचे मुद्दे, नेत्यांची विधाने, घटनांवर तत्काळ प्रतिक्रिया, यासाठी ‘१५ जीआरजी’शी राज्यातील वॉररूम समन्वयकांनी संपर्कात राहणे आवश्‍यक असेल. 

काँग्रेसने आपले बलस्थान असलेले मतदारसंघ, आणखी मेहनतीचे मतदारसंघ, मित्रपक्षांचे तसेच विरोधकांचे शक्तिकेंद्र असलेले मतदारसंघ यांची अ, ब, क श्रेणीत वर्गवारी केली आहे. त्यावर स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रतिसाद, सोशल मीडिया टीमकडून मिळणारा आढावा, त्या त्या मतदारसंघांमध्ये कशी रसद पुरवता येईल, यावरही लक्ष ठेवले जातेय.

मतदारसंघांचा आतापर्यंतचा राजकीय कल, जातीय समीकरणे याचा तपशील ठेवतानाच बूथनिहाय कसे लक्ष केंद्रित करता येईल, कार्यकर्त्याशी संपर्क साधणे, याचे नियोजन राज्यांमधील वॉररूम संचालकांकडून केंद्रीय वॉररूमकडे पुरविण्याचेही नियोजन आहे. यातून येणाऱ्या ‘रिअल टाइम’ प्रतिसादाच्या आधारे प्रचार युद्ध लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Warroom Politics Congress Social Media Publicity