Loksabha 2019 : राजधानी दिल्ली यंदा कुणाची?

Delhi-Parliament
Delhi-Parliament

राजधानी दिल्ली हे भारताचे लघुरूप आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण, गेल्या काही वर्षांत दिल्लीचे सामाजिक स्वरूप बदलत गेलेले दिसते. त्यामुळेच दिल्ली भाजपच्या अध्यक्षपदी भोजपुरी सुपरस्टार, गायक मनोज तिवारी विराजमान झाले आहेत. दिल्लीत ‘पूर्वांचली’ म्हणजेच पूर्वी उत्तर प्रदेश आणि त्यास लागून असलेला पश्‍चिमी बिहारचा भाग येथून स्थलांतर केलेल्या लोकांची संख्या वाढताना दिसते. अशा या दिल्लीचा २०१९ मधील कौल कुणाला असेल, याची चर्चा सर्वत्र आहे.

दिल्लीमधील लोकसभेच्या सातही जागा भाजपने २०१४ मध्ये  जिंकल्या होत्या. ‘आम आदमी पक्षा’ने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती आणि काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. आम आदमी पक्षाच्या उदयानंतर दिल्लीच्या राजकारणाला तिसरा कोन प्राप्त झाला. २०१४च्या भाजपला अनुकूल अशा वातावरणात दिल्लीकरांनी सातही जागांचे भरघोस दान भाजपच्या झोळीत टाकले होते. परंतु, त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र दिल्लीतल्या मतदारांनी चक्क आम आदमी पार्टी - ‘आप’ला निवडून देऊन एक वेगळाच चमत्कार केला होता. यात काँग्रेसचे अस्तित्व शून्य झाले, तर भाजपचे अस्तित्व फक्त तीन जागांपुरते राहिले. 

आता दिल्लीतील राजकारणाचा हा तिसरा ‘आप’ रूपी कोन एवढा प्रभावी झाला आहे, की त्यांची दखल घेतल्याशिवाय दिल्लीच्या राजकारणाचे समीकरण विचारात घेता येणार नाही.

हरियानातही आघाडी हवी
आम आदमी पक्ष  दिल्लीपुरता मर्यादित असला, तरी या पक्षाने भाजप-विरोधी राष्ट्रीय आघाडीतील एक प्रमुख पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. त्यामुळेच दिल्लीत कमजोर काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन मुकाबला केल्यास दिल्लीत भाजपला रोखणे शक्‍य असल्याचे दिसून आल्यानंतर ‘आप’ने आघाडीची कल्पना मांडण्यास सुरुवात केली.  ‘आप’ने दिल्लीच्या सातही जागांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी एकट्याने जाण्याची तजवीज केलीच आहे. परंतु, काँग्रेसशी राजकीय ताळमेळ जुळविण्याच्या दृष्टीनेही त्यांनी तयारी दाखविलेली आहे. काँग्रेसने दिल्लीच्या सातपैकी तीन जागांची मागणी केलेली आहे. यामध्ये नवी दिल्ली, चांदणी चौक आणि वायव्य दिल्ली यांचा समावेश आहे. ‘आप’ने यात पेच टाकलेला आहे. केवळ दिल्लीत नाही, तर हरियानातही काँग्रेसने ‘आप’बरोबर आघाडी करावी, अशी अट टाकण्यात आली आहे. काँग्रेस त्यासाठी तयार नाही.

काँग्रेसमधून विरोध
‘आप’ने हरियानातील भिवानी, हिस्सार आणि कर्नाल या तीन जागा मागितल्या आहेत. तसेच, ओमप्रकाश चौटाला यांचे बंडखोर नातू दुष्यंत चौटाला यांच्या गटालाही बरोबर घ्यावे, असा आग्रहही धरला आहे. काँग्रेसने त्याला तीव्र विरोध केला आहे. ‘आप’ला दोन जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. सध्या या मुद्द्यावर गाडी अडलेली आहे. दिल्लीत १२ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे अजून वाटाघाटींसाठी वाव आहे.

दिल्ली काँग्रेसमधला एक गट ‘आप’बरोबर आघाडी करण्याच्या विरोधात आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित याही या कल्पनेच्या विरोधात आहेत. राहुल गांधी या कल्पनेस अनुकूल असले, तरी पक्षातील एका मोठ्या गटाच्या विरोधात जाऊन आघाडी करणे कितपत शक्‍य आहे, याचा अंदाज त्यांना घ्यावा लागेल. त्यानंतरच याबाबत पुढे पाऊल टाकले जाईल. सध्या दिल्लीतील जागावाटपाची ही स्थिती आहे. भाजपने या समझोत्यावर आपले लक्ष ठेवलेले आहे. त्यानुसार त्यांचे उमेदवार जाहीर केले जातील, अशी अटकळ आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com