Loksabha 2019 : शेतकरी महत्त्वाचेच; पण जवानांचे बलिदानाकडे का दुर्लक्ष करायचं?

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तो मुद्दा निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनतो मग जेव्हा एक जवान देशासाठी हुतात्मा होतो तर तो निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?

नवी दिल्ली: देशात शेतकऱ्यांचा मृत्यू जेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे, तेवढाच देशभक्ती आणि हुतात्मा जवानाचे बलिदान निवडणूकीमधील महत्त्वाचा मुद्दा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हुतात्मा जवांनाचा उल्लेख करुन मतं मागितल्याचा आरोप मोदी यांच्यावर केला जात आहे. या आरोपांवर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले आहे. मुलाखतीत बोलताना मोदी म्हणाले, 'गेल्या 40 वर्षापासून देश दहशतवादाशी लढत आहे. देशातील लोकांसमोर जर आम्ही सांगितले नाही, देशातील दहशतवादावर आमचे विचार काय आहेत तर त्याला अर्थ काय राहणार? कोणताही देश देशभक्तीच्या भावनेशिवाय पुढे जाऊ शकतो का? हजारो भारतीय जवान देशासाठी हुतात्मा होत आहेत, मग हा मुद्दा निवडणुकीत का नको? जेव्हा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तो मुद्दा निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनतो मग जेव्हा एक जवान देशासाठी हुतात्मा होतो तर तो निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?'

मोदी यांनी गेल्या आठवड्यात लातूरमध्ये प्रचारादरम्यान पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांनी पहिलं मत हे देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित करावे, असे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या विधानावर विरोधकांनी आरोप केला होता. हुतात्मा जवानांच्या नावाचा वापर पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करुन याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला जात असून, पंतप्रधानांनी त्यावर उत्तर दिले आहे.

दरम्यान, मोदींच्या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून, निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाकडूनही मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ तपासला जात असून प्रथमदर्शनी नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalism martyrdom of soldiers as much a poll issue as farmer deaths says PM Narendra Modi