Loksabha 2019 : शरद पवारांच्या वक्तव्याने धक्का बसला : उत्पल पर्रिकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

तुम्ही स्वत: संरक्षण मंत्री होतात, त्यामुळे आपल्या सैनिकांना चांगली यंत्रणा देण्याचं महत्त्व तुम्हाला माहित आहेच.

पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राफेल करारामुळे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना गोव्यात पुन्हा परतावे लागले असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे पर्रिकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून याचे भावनीक उत्तर देणारे पत्र मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी शरद पवार यांना उद्देशून लिहिले आहे.

त्यात उत्पल पर्रिकर लिहीतात, माझ्या वडिलांविषयी तुमच्याकडून झालेल्या विधानामुळे पर्रिकर कुटुंबाला धक्का बसला आहे. निवडणुकीत राजकीय फायदा मिळविण्यासाठी माझ्या वडिलांच्या निधानंतर त्यांचे नाव खोटेपणाने वापरणे दुर्दैवी आहे. त्यांच्या जिवंतपणातही ते आजारांशी लढत असताना काही नेत्यांनी त्यांचा नावाचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न केला.

मनोहर पर्रिकर आपल्यात नसल्यामुळेच तुमच्याकडून त्यांच्याविषयी खोटे बोलले जात आहे. आपल्यासारख्या ज्येष्ठ व आदरणीय राजकारणी व्यक्तीकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. ''तुम्ही स्वत: संरक्षण मंत्री होतात, त्यामुळे आपल्या सैनिकांना चांगली यंत्रणा देण्याचं महत्त्व तुम्हाला माहित आहेच. आपल्या सैन्याच्या विरोधात चाललेल्या या घाणेरड्या प्रचाराचा तुम्ही भाग होत असल्याचे दुःख वाटते."

तुम्ही त्यांचे नाव घेतल्यामुळे त्यांच्याविषयी थोड बोलणे जरुरीचे आहे. माझे वडील मनोहर पर्रिकरांनी अत्यंत प्रामाणिकपणे शेवटपर्यंत देशाची सेवा केली. संरक्षण मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशभर चर्चा सुरु असलेल्या राफेल करार करण्यातही त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. परंतु, काही काळानंतर त्यांना गोव्याच्या जनतेने साद घातल्यामुळे ते पुन्हा गोव्यात परत आले होते.

परंतु, राफेल प्रकरणामुळे त्यांना गोव्यात परतावे लागले असे म्हणणे म्हणजे गोव्यातील जनतेचा पर्रिकरांवर असलेल्या प्रेमाचा अपमान आहे. अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रचाराचा भाग तुम्ही होत असल्याचे पाहून दु:ख होत असल्याची भावनीक सादही उत्पल पर्रिकर यांनी शरद पवारांना उद्देशू घातली. शरद पवारांनी अशा वक्तव्यापासून थोड दुर रहाण्याची विनंतही उत्पल पर्रिकरांनी केली आहे.
 

Web Title: Sharad Pawars statement on Manohar Parrikar was shocked Says Utpal Parrikar