Loksabha 2019 : 'योगी सरकार 'काम रोको'आजाराने ग्रस्त'

वृत्तसंस्था
रविवार, 21 एप्रिल 2019

- सुरक्षिततेकडे योगी सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
- अपघाताचा संदर्भ घेत अखिलेश यादव यांची टीका
- उत्तर प्रदेशात विकासकामे ठप्प झाल्याचाही आरोप

लखनौ : रस्त्यासाठी सरकार भरमसाट टोलवसुली करीत असताना मात्र सुरक्षितता आणि सुरक्षिततेकडे योगी आदित्यनाथ सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. काल मैनपुरी येथे आग्रा-लखनौ महामार्गावरच्या अपघातात सात जण ठार, तर 34 जण जखमी झाले होते. या अपघाताचा संदर्भ घेत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. उत्तर प्रदेशात विकासकामे ठप्प झाल्याचाही आरोप त्यांनी केला. 

इटवाह येथे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अपघातग्रस्तांची यादव यांनी भेट घेतली. यानंतर ट्विटरवर अखिलेश यादव यांनी म्हटले, की द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात टोलवसुली केली जात आहे. तरीही त्यावर लक्ष ठेवले जात नाही, पोलिसांची गस्त, सुरक्षित प्रवासासाठी आवश्‍यक खबरदारी न घेणे या कारणामुळे अपघात होत आहेत. राज्यात विकासकामाला चालना मिळत नसून भाजपला सध्या "काम रोको' आजाराने ग्रासले आहे.

आपल्या सरकारच्या काळात अनेक विकासकामे सुरू केली होती. विशेषत: महामार्गावर पोलिस गस्त वाढविणे, महामार्गाची देखभाल करणे आदींसाठी पुढाकार घेतला होता, मात्र आदित्यनाथ सरकारने पुढे काहीच हालचाल केली नाही, असा आरोप अखिलेश यांनी केला. सध्या भाजप काहीच करीत नसून केवळ देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासंबंधीचे प्रश्‍न मार्गी लागलेले नाहीत. त्याचे उत्तर त्यांना लोकसभा निवडणुकीतून मिळेल, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SP Chief Akhilesh Yadav targets UP CM Yogi Adityanath