Loksabha 2019 : कोलकात्यात 'राडा शो'; अमित शहांच्या 'रोड शो'त वाहनांची जाळपोळ 

Stone pelting clashes during Amit Shahs roadshow in Kolkata
Stone pelting clashes during Amit Shahs roadshow in Kolkata

कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा यांना "रोड शो' अर्धवट सोडून पोलिस संरक्षणात तेथून बाहेर पडावे लागले. 

अमित शहा यांच्या वाहनांचा ताफा कॉलेज स्ट्रीट मार्गावरून उत्तर कोलकात्यातील स्वामी विवेकानंद यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जात असताना त्यांच्या दिशेने जोरदार दगडफेक करण्यात आली. अमित शहा ज्या ट्रकवर उभे होते, त्या दिशेने काठ्या फेकण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ईश्‍वरचंद्र विद्यासागर महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थकांनी रॅलीवर दगडफेक केली. त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली. त्यामुळे विद्यासागर महाविद्यालयाच्या बाहेर हाणामारी सुरू झाली. महाविद्यालयाच्या बाहेर उभ्या केलेल्या अनेक मोटारसायकलींना आग लावण्यात आली. त्यात त्या भस्मसात झाल्या. महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याभोवती लावलेल्या काचा या दगडफेकीत फुटल्या. 

शहा यांच्या "रोड शो'च्या सुरक्षिततेसाठी तैनात केलेल्या पोलिसांच्या तुकडीने लगेच कारवाई करत दगडफेक करणाऱ्यांना पिटाळण्यास सुरवात केली. तत्पूर्वी, अमित शहा यांनी "जय श्री राम'च्या घोषणा देतच आपल्या "रोड शो'ला सुरवात केली. यासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. "रोड शो' कोलकाता विद्यापीठाच्या बाहेर आल्यानंतर डाव्या आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहांविरोधात घोषणाबाजी करायला सुरवात केली. या वेळी काही कार्यकर्त्यांनी शहांना काळे झेंडे दाखवीत "अमित शहा गो बॅक'चे पोस्टर्सही झळकावले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले. एकूण चार किलोमीटरचा "रोड शो' अमित शहा करणार होते; परंतु या हाणामारीमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. 

मुद्दाम मार्ग बदलला : शहा 
या सगळ्या घटनाक्रमामध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप अमित शहा यांनी नंतर दूरचित्रवाणी वाहिन्यांशी बोलताना केला. ""रोड शो''ला महाविद्यालयापर्यंतच परवानगी होती. त्यामुळे तेथून तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी अचानक रोड शोचा नियोजित मार्ग बदलला आणि गर्दी असलेल्या मार्गाने रोड शो वळविला. स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहण्यासाठी मला त्यांच्या निवासस्थानीही जाऊ देण्यात आले नाही, असा दावा अमित शहा यांनी केला. 

अमित शहा हे गुंड : ममता 
ममता बॅनर्जी यांनी या सर्व प्रकारानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची संभावना गुंड अशी केली. ""पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड करणाऱ्यांना गुंड याशिवाय दुसरे काय म्हणणार?,'' अशी टीका ममता यांनी बेहाला येथील रॅलीमध्ये बोलताना केली. ""मी तुमच्या विचारांचा, मार्गाचा द्वेष करते,'' असेही त्या म्हणाल्या. तसेच पं. विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याबद्दल गुरुवारी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. 

"भाजप कार्यकर्त्यांकडून मोडतोड' 
विद्यासागर महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम कुंडू म्हणाले, ""भाजपचे कार्यकर्ते झेंड्यासह माझ्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यांनी कागदपत्रे फाडली, कार्यालयात मोडतोड केली. पं. ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. महाविद्यालयाचे दार आतून बंद केले व दुचाक्‍या व मोटारसायकली जाळल्या. या सगळ्या प्रकारात काही विद्यार्थीही जखमी झाले.'' या घटनेनंतर तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांनी महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com