Loksabha 2019: राहुलवर 'राफेल'चे बुमरॅंग

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

न्यायालयाच्या निकालाबाबत राहुल सर्वत्र खोटी माहिती पसरवित आहेत. वारंवार खोटे बोलणे, खोट्यासाठी आकांडतांडव करणे, हा कॉंग्रेस पक्षाचा स्वभावच बनला आहे.
- अमित शहा, भाजप अध्यक्ष

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. याप्रकरणी 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने राहुल यांना देत नोटीस बजावली आहे.

राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून सरकारवर टीका करताना "मोदी यांनी चोरी केली', अशा अर्थाचे विधान करत असे निरीक्षण न्यायालयानेच निकालात नोंदविल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याबाबत भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी न्यायालयाच्या निकालाचा अवमान झाल्याची तक्रार करत याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज राहुल यांनी त्यांची निरीक्षणे न्यायालयाच्या निकालाचा भाग असल्याचे चुकीचे सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच, राफेल करारासंदर्भात दाखल झालेल्या कागदपत्रांच्या वैधतेबाबत खटला असल्याने अशी कोणतीही निरीक्षणे नोंदविण्याची न्यायालयाला कधीही गरज पडली नाही, असेही खंडपीठाने सांगितले आणि राहुल यांना त्यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले. राहुल यांनी 22 एप्रिलपर्यंत म्हणणे मांडायचे असून, याबाबतची पुढील सुनावणी 23 एप्रिलला होणार आहे.

राहुल यांनी त्यांचे वैयक्तिक आरोप न्यायालयाच्या तोंडी घालून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मीनाक्षी लेखी यांनी याचिकेत केला होता. राफेलबाबतच्या निकालानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना, सर्वोच्च न्यायालयाने निकालात "चौकीदार चोर आहे', हे स्पष्ट केल्याचे दावा केला होता.

न्यायालयाच्या निकालाबाबत राहुल सर्वत्र खोटी माहिती पसरवित आहेत. वारंवार खोटे बोलणे, खोट्यासाठी आकांडतांडव करणे, हा कॉंग्रेस पक्षाचा स्वभावच बनला आहे.
- अमित शहा, भाजप अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court Asks Rahul Gandhi To Explain Rafale Remark