रायगड, सिंधुदूर्ग-रत्नागिरी - गड आला, पण सिंह गेला

शिवप्रसाद देसाई
Friday, 24 May 2019

कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या डावपेचांसमोर शिवसेनेचे सात वेळा खासदार झालेल्या अनंत गीतेंना पराभवाचा धक्का बसला.

कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला, अशी स्थिती झाली. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या डावपेचांसमोर शिवसेनेचे सात वेळा खासदार झालेल्या अनंत गीतेंना पराभवाचा धक्का बसला.

नरेंद्र मोदी लाटेत देशभर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची सरशी होत असताना कोकणात नारायण राणेंविरोधातील पारंपरिक लढाई शिवसेनेने जिंकली; मात्र सुनील तटकरेंच्या व्यूहरचनेसमोर अनंत गीतेंना पराभव पत्करावा लागला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व होते.

नवा पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानच्या झेंड्याखाली डॉ. नीलेश राणे यांनी निवडणूक लढवणे हेच मुळात आव्हान होते. गेल्या वेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही त्यांचा दीड लाखांनी पराभव झाला होता.

नीलेश राणेंसाठी नारायण राणेंनी प्रचारात पूर्ण ताकद लावली. त्याला आमदार नीतेश यांनीही मोठी साथ दिली. इतर पक्षांतील नाराजांना जवळ करण्याचे छुपे डावपेच आखले. भाजप, राष्ट्रवादी, मनसेतील नाराजांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पूर्ण ताकद कामाला लावली; पण शिवसेनेची संघटनात्मक ताकद, मोदी फॅक्‍टर, शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्या जनसंपर्कासमोर हे डावपेच अपयशी ठरले. राणेंचा शिवसेनेला विरोध आणि भाजपला पाठिंबा या भूमिकांमुळे मतदार संभ्रमात पडल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभेत ताकद दाखवण्यासाठी स्वाभिमानला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. अर्थात नीलेश राणेंना मिळालेली जवळपास २ लाख ७० हजारांवर मते ही वैयक्तिक करिष्म्याची आहेत.

रायगडमध्ये शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना तटकरेंनी पराभवाचे पाणी पाजले आहे. खरे तर २०१४ च्या निवडणुकीतच गीतेंना निसटता विजय मिळाला होता; पण त्यातून धडा घेतला नाही. मंत्रिपद असूनही त्याचा मतदारसंघासाठी वापर केला नाही. पारंपरिक कुणबी मतांवर अवलंबून राहत मतदारसंघातील अनेक विषयांकडे दुर्लक्ष केले. उलट तटकरेंनी चुका दुरुस्त केल्या. गेल्या वेळी सुनील तटकरे नावाचा दुसरा उमेदवार उभा राहिल्याचा फटका त्यांना बसला होता. या वेळी अनंत गीते नावाचे तीन उमेदवार रिंगणात होते. गेल्या वेळी स्वतंत्र लढलेल्या शेकापने १,२९,७३० मते घेतली होती. त्यांना या वेळी तटकरेंनी आपल्यासोबत घेतले. 

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेंचे पुत्र नाविद अंतुले शिवसेनेत गेले तरी मुस्लिम मतदान त्यांच्यासमवेत जाऊ नये, यासाठीची दक्षता घेतली. भास्कर जाधवांसारख्या पक्षांतर्गत स्पर्धकांनाही जवळ केले. दापोली, गुहागर, अलिबाग, महाड, श्रीवर्धन, पेण या सहा विधानसभा मतदारसंघांवर या निकालाचा प्रभाव पडण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Results Raigad Sindhudurg Ratnagiri NCP Shivsena Politics