Loksabha 2019 : राऊतांनी उत्पन्नाची माहिती लपविल्याचा राणेंचा आरोप

राजेश कळंबटे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाबाबतची माहिती लपविल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा.

-  निलेश राणे, स्वाभिमानचे उमेदवार

रत्नागिरी -  प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाबाबतची माहिती लपविल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी जिल्हा निवडणुक अधिकार्‍यांकडे केली; मात्र छाननीत अर्जाबरोबरची कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याने या आक्षेपावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. उत्पन्नाची माहिती लपविणे ही गंभीर गोष्ट असून तो गुन्हा आहे, अशी माहिती स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणेंनी दिली.

रायगड निवास्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. श्री. राणे म्हणाले, शिवसेनेचे उमेदवार राऊत यांच्या अर्जावर आक्षेप घेतला असून त्याचे पुरावेही निवडणुक विभागाला सादर केले. त्यात राऊत यांनी कराची माहिती लपवली आहे. 2016-17 आर्थिक वर्षातील एकूण वार्षिक उत्पन्न 3 लाख 65 हजार 650 रुपये दाखवले आहे. खासदारांना प्रति महिना 1 लाख मानधन आणि अन्य खर्च 90 हजार रुपयांप्रमाणे वर्षाला 23 लाखापर्यंत रक्कम बँक खात्यात जमा होते. त्यावरील टीडीएस कापला जातो. त्यामुळे  या रक्कमेवर कर बसतो. त्याची माहिती अर्जात भरली गेलेली नाही. राऊत 2014 ला खासदार झाले. 2016-17 प्रमाणेच 2014-15, 2015-16 या दोन वर्षातही तसेच दिसते. ही गंभीर बाब असून निवडणुकीत माहिती लपविणे गुन्हा आहे. राऊत यांची शेतजमीन त्यातील उत्पन्नाची माहिती प्रतिज्ञापत्रात समाविष्ट नाही. बँक खात्यात 4 लाख रुपये जमा असल्याचे दाखवले आहे. त्यावरील व्याजाचा तपशील नाही. मुंबईत राऊतांची मालमत्ता असुन त्यात 30 टक्के व्यावसायिक भागिदारी आहे. त्याचे उत्पन्न यात दिलेले नाही. हे चार आक्षेप छाननीपुर्वी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आणि निवडणुक निरीक्षकांपुढे मांडले. तसेच राऊत यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवावा, अशी मागणी केली.

छाननीमध्ये अर्जाबरोबर जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते असे निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

राऊतांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेपाला काँग्रेसकडूनही समर्थन मिळाले आहे. बांदिवडेकरांचे प्रतिनिधी अशोक जाधव यांनीही तीच आपली तक्रार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. हा रडीचा डाव नसून जे खोटं आहे ते समाजापुढे आणायचे आहे. वारंवार राणेंच्या प्रॉपर्टीवर बोलायचं आणि आम्ही गप्प बसायचे हे कदापी शक्य नसल्याचेही श्री निलेश राणे यांनी ठणकावले.

राऊतांनी व्यासपीठावर येऊन इंग्रजी बोलावे

मॅट्रीक्युलेटसंदर्भात राऊतांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, राऊतांची नारायण राणेंवर बोलण्याएवढी क्षमता नाही. त्यांना दहा इंग्रजी वाक्य बोलता येतात का हे आधी पाहावे. एका व्यासपीठावर येऊन त्यांनी इंग्रजी वाक्य बोलून दाखवावीत. त्यातून आपला खासदार कसा आहे, हे सर्व लोकांना आणि शिवसेनेलाही समजेल. आपण त्या व्यासपीठावर शिक्षणावर, विकासावर बोलूया. राऊत राणेंवर बोलू शकत नाहीत, त्यांना निलेश राणेच पुरा पडेल.

प्रतिज्ञापत्रावरील माहिती खोटी 

राऊत कधी सेल्स टॅक्समध्ये होतो सांगतात तर कधी कपबशा विकल्यांचे सांगतात. त्यांचे नक्की व्यवसाय कोणते. त्यांच्याकडे आलेला पैसा नक्की कुठून आला. ज्या गाडीत फिरतात, ती कोठून आली. परिस्थिती पाहिली तर प्रतिज्ञापत्रावर दिलेली माहिती किती खोटी आहे, ते दिसून येते असा आरोप निलेश राणे यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilesh Rane comment on Vinayak Raut