Loksabha 2019 : भाजप सरकार मुस्लिमविरोधी - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण दिले, परंतु ओबीसी समाजाला त्यांच्या 27 टक्‍के आरक्षणाची चिंता लागली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण वेगवेगळे करून त्याचे लाभ निश्‍चित करण्याची गरज असल्याचे मत ऍड. आंबेडकर यांनी व्यक्‍त केले.

सोलापूर - मागील साडेचार-पाच वर्षांत आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवणारे भाजप सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सद्यःस्थितीत कॉंग्रेस हा आरएसएसच्या ताब्यात गेला असून, मोदींच्या इशाऱ्यावर नाचत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.

राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण दिले, परंतु ओबीसी समाजाला त्यांच्या 27 टक्‍के आरक्षणाची चिंता लागली आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण वेगवेगळे करून त्याचे लाभ निश्‍चित करण्याची गरज असल्याचे मत ऍड. आंबेडकर यांनी व्यक्‍त केले. संविधान बदलण्याची भाषा भाजप नेते करीत असतानाही कॉंग्रेस त्यावर काहीच बोलत नाही. भाजपचा मुस्लिमांना अगोदरपासूनच विरोध आहे, परंतु आता कॉंग्रेसही मुस्लिमांवर दबाव टाकत आहे. मात्र, आपण त्यांना भयमुक्‍त करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुटुंबशाही व राजेशाही संपुष्टात आणण्याच्या उद्देशानेच वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या मैदानात आहे. कॉंग्रेसबरोबर आमची स्पर्धा नाही, तर भाजपच्या उमेदवारांविरुद्ध लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईव्हीएम हॅक होऊ शकते
अमेरिकेतील मतदान प्रक्रियेचा डाटा लिक होऊ शकतो, मग ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही? कोणत्याही इलेक्‍ट्रॉनिक यंत्रात छेडछाड शक्‍य आहे. परंतु, कॉंग्रेस सत्तेवर असताना त्यांनी कधीही बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, असा विचार केला नाही. आता मात्र ईव्हीएम नको, अशी मागणी केली जात आहे. ईव्हीएम नकोच, अशी आमची भूमिका असल्याचे ऍड. आंबेडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Bjp Government Muslim Oppose Prakash Ambedkar Politics