Loksabha 2019 : काँग्रेस-‘राष्ट्रवादी’मध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 मार्च 2019

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची संपूर्ण तयारी सुरू झालेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत मात्र चर्चेचे गुऱ्हाळ संपण्याची चिन्हे नाहीत. बलाढ्य भाजपचे आव्हान उभे असताना आघाडीच्या नेत्यांमध्ये मात्र ‘दरबारी’ राजकारणाची कुरघोडीच सुरू असल्याचे चित्र आहे. जागावाटपाचे सूत्र ठरलेले असले तरी जागाबदलाचा निर्णय झालेला नाही.

त्यामुळेच नगरमध्ये सुजय विखे यांनी ऐन वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्या पक्षाकडे निवडून येण्याची पक्‍की खात्री असेल अशा उमेदवाराला मतदारसंघ सोडण्यासाठीची मानसिकता याअगोदर झालेली होती. त्यानुसार अनेक बैठकांचे फड रंगले, चर्चा झाल्या, आशा निर्माण केल्या गेल्या. मात्र, काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसने नगरच्या जागेचा दावा कायम ठेवला. आता औरंगाबाद व पुण्यासाठी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. औरंगाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली आहे. पण त्याबाबत काँग्रेसने अजूनही निर्णय घेतलेला नाही. पुण्यासाठी प्रवीण गायकवाड यांच्या नावाला काँग्रेस नेत्यांनी सहमती दिलेली असताना शरद पवार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी त्याबाबत मौन बाळगले आहे.

भाजप व शिवसेना युतीची प्रत्यक्ष प्रचाराची तयारी सुरू झाली आहे. या स्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत मात्र अद्यापही मतदारसंघ अदलाबदल व उमेदवारांची निवड यावरून परस्परांत कुरघोडी सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर तेथील उमेदवाराचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. आघाडीत सहभागी होण्याची प्रबळ इच्छा असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बाबत दोन्ही पक्षांचा कोणताही निर्णय झालेला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Congress NCP Discussion Politics