Loksabha 2019 : घरोघरी डिजिटल स्लिपा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

मतदान केंद्र, बूथ शोधणारे ॲप नाही
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर बूथची माहिती देणारी लिंक शोधली असता, तशी सुविधा त्यात आहे. पण तेथे मतदाराची वैयक्तिक माहिती भरावी लागते. पण आयोगाचे मतदान केंद्र आणि बूथ शोधणारे ॲप नसल्याचे आढळून आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘निवडणूक आयोगाकडून आम्हाला मतदारांच्या स्लिप आल्या आहेत, त्या बूथ अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक कुटुंबीयांपर्यंत पोचवत आहोत.’

पुणे - शहरीकरणाच्या वाढत्या विस्तारात अनेकदा मतदानाचे केंद्र कुठे आहे, याचा शोध घेणे जिकिरीचे होते. परंतु, त्यावर उमेदवारांनी उपाय शोधला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांच्या थेट घरी जाऊन यंत्राद्वारे मतदार स्लिप वाटण्यास सुरवात केली आहे. यामुळे मतदान केंद्र शोधणे सोईचे होणार आहे.

पुणे आणि बारामती मतदारसंघात मंगळवारी (ता.२३) मतदान होत आहे. यापूर्वी लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यादीत त्यांची नावे शोधून लेखी स्लिप घरोघरी पोचवत असत किंवा मतदाराला केंद्रावर जाऊन यादीतून बूथ शोधावे लागत होते. आता तंत्रज्ञानाचा फायदा घेत पक्षांनी डिजिटल स्लिपांचा पर्याय स्वीकारला आहे. त्यांनी कार्यकर्ते घरोघर पाठवून या स्लिपा वाटण्यास सुरवात केली आहे.

आंबेगाव बुद्रुक परिसरात कार्यकर्ते एका यंत्रावरून स्लिप काढून देत आहेत. त्याची प्रणाली समजून घेतली असता त्यांनी सांगितले, की सर्व मतदारांची माहिती असलेला ॲप तयार करून घेतला आहे. त्यामध्ये सर्व माहिती असते. एक छोटा वायरलेस प्रिंटर त्याला जोडलेला असतो. मतदाराचे नाव ॲपवर शोधले की, त्याचे मतदान केंद्र कोठे आहे, याची माहिती मिळत आणि ती प्रिंट करून आम्ही देतो. पुणे शहरातील उमदेवारांनीदेखील याच पद्धतीने स्लिप देण्यास सुरवात केली आहे. मतदारांना स्पिलद्वारे मतदान केंद्राची माहिती देण्याबरोबरच पक्षाची जाहिरात करण्याची संधीदेखील राजकीय पक्ष घेत आहे. या स्लिपवर वरती पक्षाचे चिन्ह आणि त्याखाली मतदाराच्या नावासह, त्याचा अनुक्रमांक, बूथ क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता आणि केंद्रातील कोणत्या रूममध्ये मतदानासाठी जायचे आहे, याची माहिती असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Digital Voting Slip Politics